आत्तापर्यंत भारताकडून २९६ खेळाडूंनी किमान एक तरी कसोटी सामना खेळला आहे. त्यातील अनेक खेळाडूंनी शानदार कामगिरी करत नाव कमावले. तर काही खेळाडू कमी कालावधीसाठी चमकून विस्मरणात गेले. एखाद्या विक्रमाची किंवा आकडेवारीची चर्चा होते. तेव्हाच अशा विस्मरणात गेलेल्या खेळाडूंचा उल्लेख होतो. असाच एक खेळाडू म्हणजे करुण नायर.
२८ वर्षीय करुण हा भारताकडून कसोटीत त्रिशतक करणारा विरेंद्र सेहवागनंतरचा केवळ दुसरा क्रिकेटपटू आहे. त्याने केवळ त्याचा तिसरा कसोटी सामना खेळताना हा कारनामा केला होता. त्याने २०१६ ला इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून कसोटीत पदार्पण केले होते. याच मालिकेत त्याने चेन्नई कसोटीत नाबाद ३०३ धावांची खेळी केली होती.
त्यावेळी त्याची तुलना अनेक दिग्गज क्रिकेटपटूंबरोबर व्हायला सुरुवात झाली होती. त्याची तुलना विरेंद्र सेहवागबरोबरही केली गेली. मात्र करुणला त्याचा हा फॉर्म कायम राखता आला नाही. त्याने या त्रिशतकानंतर पुढे आणखी ३ कसोटी सामने ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळले. यात त्याला केवळ ५४ धावा करता आल्या.
तसेच त्याआधी त्याला २ वनडे सामने खेळण्याचीही संधी मिळाली होती. पण त्याला छाप पाडता आली नाही. त्याने वनडेत केवळ ४६ धावा करता आल्या. २०१७ नंतर करुणला भारतीय संघात संधी मिळालेली नाही. सध्या तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये कर्नाटककडून खेळत असतो. तसेच तो भारतीय संघात पुन्हा संधी मिळण्याचीही वाट पहात आहे.
एका मुलाखतीदरम्यान जेव्हा करुणला भारतीय संघात संधी न मिळण्याबद्दल विचारण्यात आले होते तेव्हा तो म्हणाला, ‘मी चेन्नईमध्ये केलेल्या त्रिशतकी खेळीच्या विक्रमापासून आता खूप पुढे आलो आहे. मला वाटते लोकांना माझ्या क्षमतेबद्दल जाणतात. मला विश्वास आहे की मी आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगल्या धावा करु शकतो.’
तसेच तो म्हणाला, ‘मला फक्त एकाच गोष्टीचे वाईट वाटते की मी ती खेळी केल्यानंतर मला संघात निवडण्यात आले नाही. मला ती संधी मिळाली नाही जी मला मिळायला हवी होती. त्या खेळीनंतर मला ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेत ४ डाव खेळण्याची संधी मिळाली. २ डावात मला चांगली सुरुवात मिळाली. पण मी २ डावात अपयशी ठरलो. पण असे कोणाही बरोबर होऊ शकते. पण मला त्या मालिकेनंतर संघातून बाहेर करण्यात आल्याचे दु:ख आहे.’
ट्रेडिंग लेख –
हे ५ खेळाडू संघात असले म्हणजे सामना टाय व्हायचे चान्सेस वाढलेच समजा
१९८३ व २०११ क्रिकेटविश्वचषकाच्या बक्षीसाच्या रकमा आहेत विचार करायला लावणाऱ्या
टीम इंडियाचे ५ शिलेदार व त्यांच्या आवडत्या बाॅलीवूड अभिनेत्री