आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामना आज म्हणजेच 8 मार्च रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात खेळला गेला. हा सामना 96 धावांनी जिंकत भारताने तिसऱ्यांदा टी-20 वर्ल्ड कप जिंकला आहे. फायनलमध्ये टीम इंडियाने न्यूझीलंडचा 96 धावांनी पराभव करत नवा इतिहास रचला आहे.
टी-20 वर्ल्ड कपचे जेतेपद कायम राखणारा (डिफेंड करणारा) भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे. अहमदाबादमध्ये खेळल्या गेलेल्या या अंतिम सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 255 धावा केल्या होत्या, प्रत्युत्तरात किवी संघ केवळ 159 धावाच करू शकला. आतापर्यंत वेस्ट इंडिज आणि इंग्लंडनेही प्रत्येकी 2-2 वेळा टी-20 वर्ल्ड कप जिंकला आहे, परंतु 3 वेळा हे जेतेपद पटकावणारा भारत हा पहिला देश बनला आहे. टीम इंडियाने 2007, 2024 आणि आता 2026 मध्ये हे विजेतेपद मिळवले आहे. यापूर्वी कोणत्याही संघाला सलग दोनदा टी-20 वर्ल्ड कप जिंकता आला नव्हता. ही कामगिरी करणारा भारत हा पहिलाच देश ठरला आहे.
टॉस गमावल्यानंतर भारतीय संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला होता. संजू सॅमसन, ईशान किशन आणि अभिषेक शर्मा यांनी धडाकेबाज फलंदाजी करत अर्धशतके झळकावली.
भारताने प्रथम फलंदाजी करताना 255 धावा केल्या. टी-20 वर्ल्ड कप फायनलच्या इतिहासातील ही सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे. यापूर्वीचा विक्रमही भारताच्याच नावावर होता, जेव्हा 2024 च्या वर्ल्ड कप फायनलमध्ये भारताने 176 धावा केल्या होत्या. आता टीम इंडियाने स्वतःचाच विक्रम मोडीत काढत 255 धावांचा डोंगर उभा केला.
256 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ कधीच विजयाच्या शर्यतीत दिसला नाही. टिम सायफर्टच्या 52 धावा आणि कर्णधार मिचेल सँटनरच्या 43 धावांच्या खेळीशिवाय इतर कोणत्याही किवी फलंदाजाला प्रभावी कामगिरी करता आली नाही. भारतासाठी जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तसेच अक्षर पटेलने 3 फलंदाजांना बाद केले. त्यांच्याशिवाय हार्दिक पांड्या, वरुण चक्रवर्ती आणि अभिषेक शर्मा यांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.






