भारत विरूद्ध इंग्लंड पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला ४ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. मात्र, मालिका सुरु होण्यापूर्वीच युवा सलामीवीर शुभमन गिलला गुडघ्याची दुखापत झाली असून, तो या दौर्यातून बाहेर पडला असल्याची माहिती समोर येत आहे. त्याला पर्याय म्हणून श्रीलंका दौऱ्यावर असलेल्या दोन सलामीवीरांना इंग्लंडला पाठवण्यात यावे, अशी मागणी संघ व्यवस्थापनाकडून करण्यात आली आहे.
मात्र, निवड समिती अध्यक्ष चेतन शर्मा ही मागणी मान्य करतात का? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) एका पदाधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिली.
या खेळाडूंना इंग्लंडला पाठवण्यात यावे
भारताचा वरिष्ठ संघ सध्या इंग्लंडमध्ये आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात पराभूत झाल्यानंतर भारतीय खेळाडू विश्रांती घेत आहेत. याच दरम्यान युवा सलामीवीर शुबमन गिल हा दुखापतग्रस्त झाला. त्याची दुखापत गंभीर असून तो तीन महिने क्रिकेट खेळू शकणार नाही.
या सर्व घडामोडीवर बोलताना बीसीसीआयच्या एका अधिकार्याने नाव न सांगण्याच्या अटीवर म्हटले, “गिल इंग्लंड दौऱ्यावरून बाहेर पडला आहे. तो तीन महिने तरी क्रिकेट खेळू शकणार नाही. संघ व्यवस्थापनाला त्याचा पर्याय म्हणून पृथ्वी शॉ व देवदत्त पडिक्कल हे खेळाडू हवे आहेत. मात्र, निवड समिती काय निर्णय घेते हे सांगता येणार नाही. याबाबत अद्याप अधिकृत ई मेल संघ व्यवस्थापनाने बीसीसीआयला पाठवला नाही. परंतु, ही चर्चा नक्कीच झाली आहे.”
या सर्व प्रकरणांमध्ये निवडसमिती अध्यक्ष चेतन शर्मा यांची भूमिका सर्वाधिक निर्णायक राहणार असल्याचे स्पष्ट आहे. यासंदर्भात शर्मा हे बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली व बीसीसीआय सचिव जय शहा यांच्याशी चर्चा करू शकतात.
इंग्लंडमध्येच उपलब्ध आहेत पर्याय
सध्या भारताचा २० सदस्यीय संघ इंग्लंडमध्ये गेला आहे. तसेच, पाच राखीव खेळाडू देखील संघाचा भाग आहेत. गिल दौऱ्यातून बाहेर पडला असला तरी, भारतीय संघाकडे सध्या रोहित शर्मा, मयंक अगरवाल व केएल राहुल असे पर्याय उपलब्ध आहेत. याखेरीज राखीव खेळाडूंपैकी अभिमन्यू ईस्वरन हा देखील उपलब्ध असेल. मात्र, शॉ व पडिक्कल यांचा सध्याचा फॉर्म पाहता संघ व्यवस्थापन त्यांना इंग्लंडला बोलावू इच्छिते. हे दोन्ही खेळाडू सध्या भारताच्या दुसऱ्या संघासह श्रीलंकेमध्ये मर्यादित षटकांच्या मालिकांसाठी पोहोचले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
हजारो प्रेक्षकांच्या साक्षीने ‘या’ खेळाडूने प्रेयसीला केले प्रपोज, व्हिडिओ होतोय व्हायरल
युरो कप २०२०: उपांत्यपूर्व फेरीतील काही नेत्रदीपक गोल, पाहा व्हिडिओ