स्पेनचा महान टेनिसपटू राफेल नदालनं निवृत्ती जाहीर केली आहे. त्यानं गुरुवारी (10 ऑक्टोबर) इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करून चाहत्यांना ही माहिती दिली.
नदालनं व्हिडिओमध्ये सांगितलं की, त्यानं खूप विचार करून हा निर्णय घेतला. त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा सामना डेव्हिस कप फायनल असेल. ही तीच स्पर्धा आहे जिथून त्यानं 2004 मध्ये आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. राफेल नदालनं एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये त्यानं सांगितले की, गेली दोन वर्ष त्याच्यासाठी खूप कठीण गेली. तो कोर्टवर आपलं 100 टक्के देऊ शकला नाही. त्यामुळे त्यानं हा कठीण निर्णय घेतला. नदालनं ही पोस्ट 12 भाषांमध्ये केली आहे, ज्यात त्यानं सर्वांचं आभार मानलं.
38 वर्षीय नदालनं त्याचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले रॉजर फेडरर आणि नोव्हाक जोकोविचसोबत घालवलेल्या क्षणांचा व्हिडिओ शेअर केला. त्यानं त्याच्या आईचं देखील आभार मानलं. आईच्या बलिदानामुळेच इथपर्यंत पोहोचू शकलो, असं नदालनं सांगितलं. याशिवाय 19 वर्षांपासून त्याच्यासोबत असलेल्या पत्नी मेरीचंही त्यानं आभार मानलं.
राफेल नदालनं आपल्या कारकिर्दीत 22 ग्रँडस्लॅम जिंकले आहेत. यामध्ये 14 फ्रेंच ओपन, 2 ऑस्ट्रेलियन ओपन, 2 विम्बल्डन आणि 4 अमेरिकन ओपन विजेतेपदांचा समावेश आहे. याशिवाय त्यानं ऑलिम्पिकमध्ये दोन वेळा सुवर्णपदकही जिंकलं आहे. त्यानं 2008 च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये एकेरीत सुवर्णपदक आणि 2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये दुहेरीत सुवर्णपदक जिंकलं होतं. इतकंच नाही तर तो 2004, 2009, 2021 आणि 2019 मध्ये डेव्हिस कप जिंकणाऱ्या स्पॅनिश संघाचाही सदस्य होता.
नदाल वयाच्या 12 व्या वर्षापर्यंत टेनिस आणि फुटबॉल दोन्ही खेळ खेळायचा. परंतु त्याच्या काकांची इच्छा होती की त्यानं टेनिसमध्ये करिअर करावं. येथे नमूद करण्यासारखी बाब म्हणजे, नदालचे काका टोनी नदाल हे एक प्रसिद्ध फुटबॉलपटू आहेत.
राफेल नदालच्या नावे सर्वाधिक 14 फ्रेंच ओपन जेतेपदे जिंकण्याचा विक्रम आहे. त्याचा सर्वात मोठा प्रतिस्पर्धी असणाऱ्या रॉजर फेडररनं त्याच्या या यशाला ‘खेळातील सर्वात मोठी कामगिरी’ म्हटलं होतं. एकेरीत करिअर ‘गोल्डन स्लॅम’ पूर्ण करणाऱ्या केवळ तीन पुरुष खेळाडूंपैकी नदाल हा एक आहे. त्यानं 2010 मध्ये ही कामगिरी केली होती.
पुरुष एकेरीत सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचनं सर्वाधिक 24 ग्रॅन्डस्लॅम खिताब जिंकले आहेत. यानंतर राफेल नदालचा क्रमांक लागतो, ज्यानं 22 खिताब जिंकले. तिसऱ्या क्रमांकावर स्वित्जर्लंडचा रॉजर फेडरर आहे. त्यानं 20 ग्रँडस्लॅम खिताब जिंकले आहेत.
हेही वाचा –
घरच्या मैदानावर पाकिस्तानची नाचक्की! इतक्या वर्षांनंतर कसोटीत बनल्या 800 पेक्षा अधिक धावा
एक-दोन नव्हे तर इतक्या रेकॉर्ड्स, बांग्लादेशला हरवून भारताने केले मोठे विक्रम
रतन टाटा यांचं क्रिकेटशी होतं खास नातं, अनेक दिग्गजांच्या जडणघडणीत टाटांचा मोठा वाटा!