क्रिकेट हा असा खेळ आहे ज्यामध्ये एखादा सामान्य खेळाडू रातोरात प्रसिद्ध होऊ शकतो तर एखादा अफाट गुणवत्तेचा खेळाडू लोकांच्या नजरेत येत नाही. क्रिकेटच्या दीडशेहून अधिक वर्षांच्या इतिहासात असे अनेक खेळाडू इतिहासजमा झाले.
काही खेळाडू असे होते ज्यांनी खूप लवकर आपली क्रिकेट कारकीर्द सुरू केली आणि तितकेच लवकर खेळातून बाहेर देखील पडले. परंतु दरम्यानच्या काळात त्यांनी खूप यश मिळवले. त्यापैकी एक म्हणजे झिम्बाब्वेचा माजी कर्णधार ऍलिस्टर कॅम्पबेल (Alistair Campbell).
२३ सप्टेंबर १९७२ रोजी सॅलिसबरी येथे जन्मलेल्या कॅम्पबेलने क्रिकेटमध्ये प्रवेश करणे स्वाभाविक होते. कारण, त्याचे वडील इयान हे ज्युनियर क्रिकेटचे प्रख्यात प्रशिक्षक होते, ज्यांनी झिम्बाब्वेचा प्रसिद्ध खेळाडू ब्रेंडन टेलरलासुद्धा मार्गदर्शन केलेले आहे. अॅलिस्टरने आपला लहान भाऊ डोनाल्डच्यासह लहानपणापासूनच क्रिकेट खेळणे सुरू केले. डोनाल्ड यष्टीरक्षक म्हणून प्रथमश्रेणी क्रिकेट खेळला. सुरुवातीला अॅलिस्टर उजव्या हाताने फलंदाजी करत परंतु वडिलांनी त्याला डाव्या हाताने फलंदाजी करायला लावले. त्यांचा असा विश्वास होता की, डावखुऱ्या हाताचे फलंदाज अधिक उत्तम फटके खेळतात. कॅम्पबेल आपल्या कुटुंबाद्वारे चालवल्या जाणाऱ्या लिलफोर्डिया शाळेत दाखल झाला. सध्याचे झिम्बाब्वेचे प्रमुख क्रिकेटपटू मॅल्कम वॉलर आणि ब्रेंडन टेलर देखील याच शाळेचे विद्यार्थी होत.
शालेय व महाविद्यालयीन स्तरावर ऍलिस्टरची कामगिरी चांगली झाल्याने त्याला लवकरच प्रथमश्रेणी क्रिकेट मध्ये पदार्पणाची संधी मिळाली. कॅम्पबेलने वयाच्या १८ व्या वर्षी ऑक्टोबर १९९० मध्ये हरारे येथे पाकिस्तान ब संघाविरुद्ध आपला पहिला प्रथमश्रेणी सामना खेळला. कॅम्पबेलने दोन्हीही डावात २९ धावा केल्या. एप्रिल १९९१ मध्ये कॅम्पबेलने बुलावायो येथे झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर आलेल्या काउंटी क्लब ग्लॅमॉर्गन विरुद्ध नाबाद १०० धावांची खेळी केली. त्यावेळी, प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये झिम्बाब्वेकडून शतक झळकवणारा तो सर्वात युवा फलंदाज होता. पुढच्या डावात त्याने ६३ धावांची खेळी साकारली आणि आपल्या संघाला सामना जिंकून दिला.
झिम्बाब्वेच्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये ऍलिस्टर कॅम्पबेल हे नाव झळकू लागले होते. भविष्यातील तारा म्हणून सर्व त्याच्याकडे पाहत. आपल्या खेळाच्या जोरावर तो राष्ट्रीय संघाचे दार ठोठावू लागला. युवा ऍलिस्टरचा समावेश १९९२ विश्वचषकासाठीच्या झिम्बाब्वे संघात करण्यात आला. सर्व झिम्बाब्वे क्रिकेट चाहत्यांना त्याच्याकडून खूप अपेक्षा होत्या. परंतु, हा १९ वर्षीय युवा खेळाडू, तो दबाव आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दर्जेदार गोलंदाजी झेलू शकला नाही. त्याला पहिल्या तीन सामन्यात अवघ्या तेरा धावा बनवता आल्या.
ऑक्टोबर १९९२ मध्ये कॅम्पबेलसाठी मोठा क्षण आला. २० व्या वर्षी तो झिम्बाब्वेसाठी कसोटी खेळू लागला. भारतीय संघ त्यावेळी झिम्बावेचा दौऱ्यावर गेला होता. कॅम्पबेलने तिसर्या क्रमांकावर खेळताना आपल्या पहिल्या डावात ४५ धावा बनविल्या. पुढील दोन वर्षात तो झिम्बाब्वेचा प्रमुख खेळाडू म्हणून पुढे आला. याच दरम्यान, १९९४ मध्ये झिम्बाब्वेचा संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेला. नव्वदच्या दशकात पाकिस्तानचा वेगवान गोलंदाजांचा ताफा जगात सर्वोत्तम होता. कॅम्पबेलने पाच डावांत तीन अर्धशतके झळकावत मालिकेत सर्वाधिक धावा केल्या. त्याने ४१ च्या सरासरीने २०५ धावा फटकावल्या. वसीम अक्रम, वकार युनूस आणि मुश्ताक अहमद यांच्या गोलंदाजीचा सामना अत्यंत कुशलतेने केला.
कॅम्पबेलची कामगिरी उत्तरोत्तर सुधारत होती. याचेच बक्षीस म्हणून त्याला झिम्बाब्वेच्या राष्ट्रीय संघाचे कर्णधारपद दिले गेले. १९९६ मध्ये झिम्बाब्वेचा कर्णधार म्हणून कॅम्पबेलची नियुक्ती करण्यात आली होती आणि नोव्हेंबर १९९९ पर्यंत तीन वर्ष त्याने संघाचे नेतृत्व केले.
यादरम्यान, १९९८ मध्ये मायदेशात झालेल्या कसोटी मालिकेत भारताला एका सामन्यात झिम्बाब्वेने मात दिली. नोव्हेंबर १९९८ मध्ये झिम्बाब्वे संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेला असता पाकिस्तानला १-० ने हरवून झिम्बाब्वेने आपला पहिलावहिला कसोटी मालिकाविजय साजरा केला. ही झिम्बाब्वे क्रिकेटसाठीची ऐतिहासिक कामगिरी कॅम्पबेलच्या नेतृत्वात झाली होती.
१९९८ मध्ये नव्याने सुरू झालेल्या आयसीसी नॉकआउट ट्रॉफी म्हणजे आत्ताची आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी या स्पर्धेत पहिले शतक झळकावण्याचा मान ऍलिस्टर कॅम्पबेलकडे जातो.
कॅम्पबेलच्या नेतृत्वात सुरू असलेली झिम्बाब्वे क्रिकेटची घौडदौड १९९९ विश्वचषकात देखील सुरू राहिली. भारत आणि दक्षिण आफ्रिका या तगड्या संघांना हरवत त्यांनी सुपर सिक्स फेरीत धडक मारली.
कॅम्पबेलकडून फलंदाज म्हणून उत्कृष्ट कामगिरीची अपेक्षा अनेकांनी केली होती. परंतु कसोटी कारकीर्दीतील २७.२१ सरासरी त्याच्या प्रतिभेला न्याय देत नाही. १९९४ मध्ये श्रीलंकेविरूद्ध हरारे येथे कॅम्पबेल ९९ धावांवर बाद झाला होता. त्याला आपल्या पहिल्या कसोटी शतकासाठी पदार्पणापासून ८ वर्षे वाट पाहावी लागली. अखेर २००० मध्ये नागपुरमध्ये भारताविरुद्ध हे शतक आले. पराभवाची शक्यता असताना कॅम्पबेलने अँडी फ्लॉवरसह झिम्बाब्वेला सामना अनिर्णित सोडवून दिला. फ्लॉवरने नाबाद २३२, तर कॅम्पबेलने १०२ धावा केल्या.
२००३ च्या विश्वचषक स्पर्धेसाठी निवड न झाल्यानंतर त्याच्या डोक्यामध्ये निवृत्तीचा विचार आला. परंतु, कॅम्पबेलला जखमी मार्क व्हर्मुलेनच्या जागी निवडले गेले. झिम्बाब्वेचा त्या विश्वचषकातील अंतिम सामना कॅम्पबेलच्या कारकीर्दीचा अंतिम सामना ठरला. कारण, त्याची पुन्हा कधीही देशासाठी निवड झाली नव्हती. सोबतच त्यानेदेखील वयाच्या ३१ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.
आपल्या ११ वर्षाच्या क्रिकेट कारकिर्दीत कॅम्पबेलने झिम्बाब्वेसाठी ६० कसोटी व १८८ एकदिवसीय सामने खेळले. त्यामध्ये अनुक्रमे २,८५८ आणि ५,१८५ धावा आपल्या नावे केल्या.
निवृत्तीनंतर, काही काळ समालोचन केल्यावर, २००७ सालच्या विश्वचषकासाठी त्याची झिम्बाब्वेच्या क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. २००९ मध्ये तो राष्ट्रीय निवडसमितीचा अध्यक्ष बनला. जानेवारी २०१५ मध्ये, झिम्बाब्वे क्रिकेटचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कॅम्पबेल याची नियुक्ती करण्यात आली. २०१५ मध्ये झिम्बाब्वे संघ पाकिस्तान दौर्यावर गेला तेव्हा त्याने, पाकिस्तानमधील क्रिकेट पुनरुज्जीवनात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
२०१५ मध्ये झिम्बाब्वेचा माजी खेळाडू प्रोस्पर उत्सेया याने कॅम्पबेलवर वर्णद्वेषाचाचे आरोप लावले. उत्सेयाने २०१५ विश्वचषकात निवडले जाण्यामागे कॅम्पबेलचा हात होता असे म्हटले. हे प्रकरण वाढू लागल्यानंतर कॅम्पबेलने आपल्या पदाचा राजीनामा दिला.
झिम्बाब्वेला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मानाचे स्थान मिळवून देणाऱ्या ऍलिस्टर कॅम्पबेलची कारकीर्द झिम्बाब्वे क्रिकेटमधील एक अध्याय म्हणून ओळखली जाते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाचे-
असा भारतीय खेळाडू ज्याने पाकिस्तानच्या खेळाडूंना आणले होते रडकुंडी