दुबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील ३३ व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने बुधवारी (२२ सप्टेंबर) सनरायझर्स हैदराबादचा ८ विकेट्सने पराभव केला आणि प्लेऑफच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकले. दिल्लीचा हा ९ सामन्यांतील ७ वा विजय आहे. त्यामुळे त्यांनी १४ गुणांसह सध्या गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. दरम्यान, या सामन्यात रिषभ पंतच्या बाबतीत एक मजेशीर घटना घडली, ज्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
पंतची बॅट उडाली हवेत
या सामन्यात हैदराबादने दिल्लीला विजयासाठी १३५ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीने पहिली विकेट पृथ्वी शॉच्या रुपात तिसऱ्या षटकात गमावली. पण त्यानंतर शिखर धवन आणि माजी कर्णधार श्रेयस अय्यरने ५२ धावांची दुसऱ्या विकेटसाठी भागीदारी रचली. पण शिखरही ४२ धावा करुन बाद झाला. त्यामुळे श्रेयसला साथ देण्यासाठी चौथ्या क्रमांकावर दिल्लीचा कर्णधार रिषभ पंत आला.
रिषभने श्रेयसला भक्कम साथ दिली. पंत मैदानात आलाय म्हणजे काहीतरी मजेशीर घटना घडल्याशिवाय राहात नाही. या सामन्यातही काहीसा असाच प्रकार पाहायला मिळाला.
झाले असे की, पंत आणि श्रेयस फलंदाजी करत होते. यावेळी डावाचे १५ वे षटक टाकण्यासाठी राशिद खान आला. त्याने षटकातील दुसरा चेंडू आखुड टप्प्याचा टाकला, ज्यावर पंतने कट शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. पण यावेळी त्याच्या बॅटचा संपर्क चेंडूला झाला नाही, मात्र त्याची बॅट हातातून निसटून मिडविकटच्या क्षेत्रात जाऊन पडली.
बॅट उडालेली पाहून रिषभलाही हसू आले. तो त्याची बॅट परत घ्यायला जात होता. पण तिथे उभ्या असणाऱ्या केन विलियम्सनने ती बॅट उचलली आणि पंतला परत आणून दिली. ती बॅट परत करताना विलियम्सनही हसत होता.
— Cricsphere (@Cricsphere) September 22, 2021
Kane Williamson had a check on Rishabh Pant's bat. pic.twitter.com/qb7IzUeYaz
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 22, 2021
Pant be like ball nahi udd rahi bat uda dete 😭😂 pic.twitter.com/kK927h6lx7
— Mansi Valiramani 🍂 (@mansiii_v) September 22, 2021
या सामन्यात पंतने श्रेयसबरोबर नाबाद ६७ धावांची भागीदारी केली आणि दिल्लीला १३९ धावांपर्यंत पोहचवत विजय मिळवून दिला. श्रेयसने ४१ चेंडूत नाबाद ४७ धावा केल्या. या खेळीत त्याने २ चौकार आणि २ षटकार मारले. तर पंतने २१ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकांरांसह नाबाद ३५ धावा केल्या.
तत्पूर्वी हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ९ बाद १३४ धावा केल्या होत्या. हैदराबादकडून अब्दुल सामदने सर्वाधिक २८ धावा केल्या. त्याचबरोबर राशिद खानने २२ धावांची खेळी केली. या दोघांव्यतिरिक्त कोणालाही २० धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. दिल्लीकडून कागिसो रबाडाने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तसेच एन्रीच नॉर्किए आणि अक्षर पटेलने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
हैदराबादचा ८ सामन्यांत सातवा पराभव, यापूर्वी ‘या’ चार संघांनीही केलाय असा लाजीरवाणा विक्रम
न्यूझीलंड, इंग्लंडनंतर आता ऑस्ट्रेलियाही करणार पाकिस्तान दौरा रद्द? बोर्डाने दिले ‘हे’ उत्तर
‘गब्बर’चा धमाका! आयपीएल २०२१मध्ये ४०० धावा करताच शिखरने ‘या’ यादीत रोहित, विराट, वॉर्नरला पछाडले