पुणे। कौशल्यपुर्ण फुटबॉलपटू घडविणे हाच केसरी करंडक फुटबॉल स्पर्धा भरविण्या मागचा प्रमुख उद्देश आहे. तसेच या स्पर्धेमुळे पुण्यातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळते असे मत टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. दीपक टिळक यांनी कटारिया हायस्कूल मुकुंदनगर गुलटेकडी पुणे येथील मैदानावर व्यक्त केले. निमीत्त होते केसरी करंडक फुटबॉल स्पर्धेच्या उदघाट्न समारंभाचे. केसरी करंडकासारख्या स्पर्धांमधून अनेक राष्ट्रीय फुटबॉलपटू घडले आहेत. या स्पर्धेमुळे अनेक फुटबॉलपटूंना खेळण्याची नामी संधी मिळते. यामधून अनेक फुटबॉलपटूंना खेळ सुधारण्यास वाव मिळतो. तसेच ही स्पर्धा कायम सुरु ठेवण्याचा मानसही डॉ. दीपक टिळक यांनी व्यक्त केला.
या उदघाट्न समारंभाच्यावेळी टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या उपकुलगुरू डॉ. गीताली मोने-टिळक आणि या स्पर्धेचे समन्वयक अनिल सकपाळ, सहकारी संभाजी वाघ, तसेच पीडीएफएचे सदस्य ए. आर. शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आपले मत मांडताना पीडीएफएचे सदस्य ए. आर. शेख म्हणाले की मी केसरी करंडक स्पर्धा गेली अनेक वर्षे पाहण्यास येतो. ही पुण्यात सुरु झालेली पहिली स्पर्धा आहे. या स्पर्धेत जे फुटबॉलपटू मेहनत घेवून खेळतात ते खेळाडू राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वोत्तम कामगिरी करण्यात यशस्वी होतात. या स्पर्धेचा अनेक फुटबॉलपटूंना फायदा झाला आहे. तसेच महाराष्ट्रातील अनेक फुटबॉलपटू घडविण्यात या स्पर्धेचा सिंहाचा वाटा आहे. या स्पर्धेत एकूण 32 निमंत्रित फुटबॉल संघाचा सहभाग असणार आहे. त्यामध्ये एकूण 512 फुटबॉलपटू आपले कौशल्यपणाला लावणार आहेत. तसेच एकूण 31 फुटबॉलचे सामने यामध्ये रंगणार आहेत. या केसरी करंडक या स्पधार्ंंना लोकमान्य टिळकांचे सुपुत्र रा.ब. टिळक व श्री.ब. टिळक यांनी सुरुवात केली होती. त्यानंतर टिळक महाराष्ट्र विद्यापीठ व दैनिक केसरी यांच्या संयुक्त विद्यमाने ही परंपरा सुरु ठेवली.
या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी झालेल्या फुटबॉल सामन्यांमध्ये पहिला सामना एन. वाय. एफ. ए संघ आणि रिअल पुणे युनायटेड संघात झाला. हा सामना एन. वाय. एफ. ए फुटबॉल संघाने 2-1 असा जिंकला. या सामन्यात एन. वाय. एफ. ए फुटबॉल संघाचा फुटबॉलपटू तेजस चिल्लाळ याने सामन्याच्या दुसर्या मिनीटाला गोल करत आघाडी घेतली. त्यानंतर त्याला उत्तर देताना रिअल पुणे युनायटेड संघाचा जो. एल. किरवळे याने 40 मिनीटाला गोल करत 1-1 अशी बरोबरी केली. त्यानंतर एन. वाय. एफ. ए फुटबॉल संघाच्या हर्षे शहा याने 50 मिनीटाला गोल करत हा सामना 2-1 असा एन. वाय. एफ. ए फुटबॉल संघाच्या नावावर केला.
त्यानंतरचा दुसरा सामना परशूरामियन्स ब संघ आणि फ्रेंड्स 11 संघात रंगला. हा सामना परशूरामियन्स ब संघाने 2-0 असा जिंकत आपले वर्चस्व सिद्ध केले. या सामन्यात परशूरामियन्स ब संघाचा सारंग दातार याने सामन्याच्या 12 मिनीटाला पहिला गोल केला. त्यानंतर परशूरामियन्स ब संघाच्या सौरभ वैद्य याने 22 मिनीटाला दुसरा गोल करत सामन्याला मजबूत आघाडी मिळवून दिली. फ्रेंड्स 11 संघाच्या अथर्व देशपांडे आणि सोहम मारणे यांनी सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी चुरशीचा लढा दिला मात्र त्यांना एकही गोल करता आला नाही.
त्यानंतर या स्पर्धेचा तिसरा सामना व्हॅलीहंटर आणि जायंट्स ब संघात झाला. हा सामना व्हॅलीहंटर संघाने 1-0 असा जिंकला. या सामन्यात व्हॅलीहंटर संघाच्या दिमांशू कनोजीन याने 40 मिनीटाला निर्णायक गोल करत हा सामना जिंकला. या सामन्यात जायंट्स ब संघाचे रोहीत सावंत, शोएब शेख असे नामवंत खेळाडू सपशेल अपयशी ठरले.
पहिल्या दिवसाचा अखेरचा सामना डेक्कन 11 अ संघ आणि नॉयझी बॉइज संघात झाला. या सामन्यात डेक्कन 11 अ संघाने 9-0 असे आपले वर्चस्व दाखवून दिले. डेक्कन 11 अ संघाच्या ऋत्विक भोरडे याने 9 व्या, 35 व्या, 41 व्या 57 व्या आणि 60 व्या मिनीटाला सातत्यपुर्ण गोल केले. त्यानंतर डेक्कन 11 अ संघाच्याच अजय आहीरे याने 22 मिनीटाला गोल करत सुरेख कामगिरी केली. तर या संघाच्या रिषभ याने 42 मिनीटाला आणि 59 व्या मिनीटाला शानदार गोल केले. तर याच संघाच्या यश महापुरे याने 55 मिनीटाला कौशल्यपुर्ण गोल केला. असे तब्बल 9 गोल डेक्कन 11 अ संघाच्या खेळाडूंनी केल्याने हा सामना डेक्कन 11 अ संघाने 9-0 असा एकतर्फी जिंकला. नॉयझी बॉइज संघाच्या पियुष जाधव आणि अजित चव्हाण यांना मोठे अपयश आले या संघाला एकही गोल करता आला नाही.