इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामाला येत्या २६ मार्चपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे आता सर्वत्र आयपीएलच्या चर्चांना जोर चढलेला पाहायला मिळत आहे. आयपीएलमधील अनेक विक्रमांबद्दलही सध्या मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. दरम्यान, आयपीएलच्या या १५ हंगामात काही दिग्गज खेळाडू खेळताना दिसणार नाहीत, यात ख्रिस गेल याचा देखील समावेश आहे. गेलने यंदा लिलावातही सहभाग नोंदवला नव्हता. पण असे असले तरी, गेलने आत्तापर्यंत आयपीएलमधील अनेक मोठे पराक्रम केले आहेत. यातील त्याने ९ वर्षांपूर्वी केलेले विक्रम आजही अबाधित आहेत. काय आहेत हे विक्रम ते या लेखातून पाहू.
गेलने खेळलेली तुफानी खेळी
ख्रिस गेल (Chris Gayle) नेहमीच त्याच्या आक्रमक खेळासाठी ओळखला जातो. पण त्याने ९ वर्षांपूर्वी २३ एप्रिल २०१३ रोजी बंगळुरूमधील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स संघासाठी पुणे वॉरियर्सविरुद्ध खेळलेली खेळी कोणीही विसरू शकणार नाही. त्याने केवळ ६६ चेंडूत तब्बल १७५ धावांची नाबाद खेळी केली होती. या खेळीत त्याने १३ चौकार आणि चक्क १७ षटकार ठोकले होते. याच खेळी दरम्यान गेलने काही विक्रम (IPL record) केले होते, जे आजही अबाधित आहेत.
ही खेळी करताना गेलने केवळ ३० चेंडूत शतक पूर्ण केले होते, त्यामुळे हे टी२० क्रिकेटमधील सर्वात जलद शतक ठरले होते.
गेलचे ९ वर्षांपासून आयपीएलमधील अबाधित विक्रम
गेलने नाबाद १७५ धावांची खेळी करताना १७ षटकार मारले होते. त्यामुळे आयपीएलमध्ये एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम त्यावेळी गेलने केला होता. हा विक्रम आजही कोणी मोडू शकलेला नाही. विशेष म्हणजे गेलला स्वत:ला देखील त्याचा हा विक्रम मोडला आलेला नाही.
या यादीत दुसऱ्या क्रमांकावर ब्रेंडन मॅक्यूलम आहे, त्याने आयपीएलच्या पहिल्या-वहिल्या सामन्यात म्हणजेच १८ एप्रिल २०१८ रोजी झालेल्या सामन्यात १३ षटकार ठोकले होते. मॅक्यूलमसह या क्रमांकावर संयुक्तरित्या गेल देखील आहे. त्याने २०१२ साली दिल्ली डेअरडेविल्स विरुद्ध १३ षटकार मारले होते.
याबरोबर गेलने या खेळीदरम्यान आयपीएलमध्ये सर्वोच्च वैयक्तिक धावा (High Score in IPL) करण्याचा विक्रमही केला. त्याचा हा विक्रम देखील अजूनही अबाधित असून कोणीही त्याच्या आसपासही पोहचू शकलेले नाही.
आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रमही गेलच्याच नावावर
आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक षटकार (Most Sixes in IPL) ठोकण्यात ख्रिस गेल अव्वल क्रमांकावर आहे. गेलने आयपीएलमध्ये १४२ सामन्यांत ३५७ षटकार मारले आहेत. विशेष म्हणजे या यादीत दुसऱ्या क्रमाकांवर असलेला एबी डिविलियर्स गेलच्या खूप मागे आहे. डिविलियर्सने २५१ षटकार मारले आहेत.
गेलने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये १४२ आयपीएल सामने खेळले असून यामध्ये त्याने ३९.७२ च्या सरासरीने ४९६५ धावा केल्या आहेत. यामध्ये ६ शतकांचा समावेश आहे. तसेच त्याने १८ विकेट्ही घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
आता बंधन नव्हे तर मोकळीक वाटणार! मुंबई इंडियन्सने तयार केलाय १३ हजार चौरस मीटरचा बायो-बबल
केकेआरचा कर्णधार असूनही श्रेयस ‘या’ संघनायकाचा आहे मोठा चाहता, कारणासहित सांगितले नाव
षटकारांच्या ‘या’ शानदार विक्रमात सीएसकेचा धोनीच ‘सिक्सर किंग’, विस्फोटक गेल टॉप-५मध्येही नाही