भारतीय पुरुष आणि महिला हॉकी संघासाठी टोकियो ऑलिम्पिक खास ठरले आहे. दोन्ही भारतीय संघांनी या ऑलिम्पिकमध्ये उपांत्य फेरीत धडक मारली आहे. तब्बल ४ दशकांनंतर ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाचे इतके मोठे यश सर्वांना पाहायला मिळत आहे.
रविवारी(१ ऑगस्ट) भारतीय पुरुष संघाने उपांत्यपूर्व फेरीत ग्रेट ब्रिटनचा ३-० असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला, तर भारतीय महिला संघाने सोमवारी उपांत्यपूर्व फेरीत बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा १-० असा पराभव करत उपांत्य फेरीत स्थान पक्के केले. आता सर्वांना वेध लागले आहेत ते उपांत्य फेरीच्या सामन्यांचे.
भारतीय महिला हॉकी संघाने इतिहासात पहिल्यांदाच ऑलिम्पिकची उपांत्य फेरी गाठली आहे. तर भारतीय पुरुष हॉकी संघाने १९७२ सालानंतर पहिल्यांदाच ऑलिम्पिकमध्ये उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी हे मोठे यश असल्याचे म्हटले जात आहे. आता उपांत्य फेरीत भारतीय महिला संघाचा सामना अर्जेंटिना विरुद्ध होणार आहे, तर भारतीय पुरुष संघासमोर बेल्जियमचे आव्हान असणार आहे.
सामना कधी सुरू होणार?
भारतीय पुरुष संघ ३ ऑगस्ट रोजी बेल्जियमविरुद्ध दोन हात करणार आहे. बेल्जियम पुरुष संघाने उपांत्यपूर्व सामन्यात स्पेनच्या पुरुष संघाला ३-१ अशा फरकाने पराभूत करत उपांत्य फेरीत स्थान मिळवले आहे. आता भारतीय पुरुष संघ आणि बेल्जियम पुरुष संघ यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना ३ ऑगस्टला जपानी प्रमाणवेळेनुसार सकाळी १०:३० वाजता म्हणजेच भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ७:०० वाजता सुरू होणार आहे.
तसेच कर्णधार राणी रामपालच्या नेतृत्वाखाली उपांत्यपूर्व फेरीत ऑस्ट्रेलियाचा पराभव केल्यानंतर आता भारतीय महिला संघ अर्जेंटिना महिला संघाचा सामना करणार आहे. उपांत्यपूर्व फेरीत जर्मनी महिला संघाचा ३-० असा पराभव करून अर्जेंटिना महिला संघाने उपांत्य फेरी गाठली आहे.
भारतीय महिला संघ आणि अर्जेंटिना महिला संघ यांच्यात उपांत्य फेरी ४ ऑगस्ट रोजी खेळली जाणार आहे. सामना जपानी प्रमाणवेळेनुसार सकाळी १०:३० वाजता म्हणजेच भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ७:०० वाजता सुरू होणार आहे.
उपांत्य फेरीचे सामने कुठे पाहायचे?
भारतातील ऑलिम्पिक २०२१ चे थेट प्रसारण सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर केले जात आहे. उपांत्य फेरीचे सामने सोनी टेन १, सोनी टेन २, सोनी टेन ३, सोनी टेन ४ किंवा सोनी सिक्सवर प्रसारित केला जाऊ शकतो. ऑनलाईन दर्शक सोनी लिव्ह ऍपवर थेट पाहू शकतात.
संघाचा आत्मविश्वास वाढला
उपांत्यपूर्व फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना भारतीय महिलांसाठी खूप अवघड मानला जात होता. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियन संघ अधिक शक्तिशाली मानला जात होता. यापूर्वी तीन वेळा ऑलिम्पिक जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलिया महिला संघाने यावर्षी साखळी फेरीमध्ये फक्त एक गोल स्वीकारला होता. असे असतानाही भारतीय महिलांनी शानदार कामगिरी करत ऑस्ट्रेलियाचे आव्हान मोडीत काढल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यांना उपांत्य फेरीत नक्कीच याचा फायदा होईल.
महत्त्वाच्या बातम्या –
‘अविस्मरणीय क्षण!’, भारतीय महिला हॉकी संघावर ऐतिहासिक विजयानंतर कौतुकाचा वर्षाव, पाहा काही खास ट्विट
ऑस्ट्रेलिया संघात मोठे फेर बदल! ‘हा’ खेळाडू झाला नवा कर्णधार
ट्विटरवर आमने-सामने आले पडद्यावरील आणि प्रत्यक्षातील ‘कबीर खान’; झाले ‘असे’ संभाषण