जो व्यक्ती क्रिकेटवर प्रेम करतो; तो व्यक्ती 16 नोव्हेंबर 2013 ही तारीख कधीच विसरू शकणार नाहीत. कारण फक्त भारताचा नाही तर जागतिक क्रिकेटमधील सर्वात महान फलंदाज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने याच दिवशी सर्व प्रकारच्या क्रिकेटला अलविदा केला होता. सचिन आज (24 एप्रिल) आपला 50वा वाढदिवस साजरा करत आहे. मुंबईतील आपले घरचे मैदान असलेल्या वानखेडे स्टेडियमवर सचिनने क्रिकेटला निरोप दिला होता. ज्या मैदानावर सचिनने क्रिकेटची सुरूवात केली, त्याच मैदानावर त्याने निवृत्तीचे भाषण केले.
तब्बल दोन तप म्हणजेच 24 वर्ष आपल्या फलंदाजीने क्रिकेट रसिकांना अपरिमित आनंद देणाऱ्या सचिन तेंडुलकरने आठ वर्षांपूर्वी आपला अखेरचा सामना खेळला होता. विश्वविक्रमी 200 व्या कसोटीनंतर त्याने आपल्या दैदिप्यमान कारकिर्दीची अखेर केली होती. आपल्या अखेरच्या सामन्यानंतर, केलेल्या भाषणातून, सचिनने सर्वांच्या डोळ्यांच्या कडा पाणावून टाकलेल्या. सचिनच्या त्या अखेरच्या भाषणाचा मराठी अनुवाद आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
सचिन तेंडुलकरचे धन्यवादपर अखेरचे भाषण-
“मित्रांनो, कृपया आता शांत व्हा. मला तुमच्या सर्वांशी खूप काही बोलायचे आहे. गेल्या 24 वर्षांपासून माझे आयुष्य 22 यार्ड्सच्या या खेळपट्टीमधून गेले. त्या अद्भुत प्रवासाचा शेवटचा थांबा आला आहे. यावर विश्वास ठेवणे काहीसे कठीण आहे. मी माझ्या आयुष्यात काही प्रमुख भूमिका निभावलेल्या सर्व लोकांचे आभार मानू इच्छितो. माझ्या हाती प्रथमच यादी आहे. बोलणे कठीण आहे पण मी प्रयत्न करेन.
माझ्या आयुष्यातील सर्वात महत्वाची व्यक्ती ज्यांची कमतरता मला 1999 पासून जाणवत आहे, ते म्हणजे माझे वडील. मी फक्त 11 वर्षांचा होतो तेव्हापासून त्यांनी मला स्वातंत्र्य दिले. आपल्या स्वप्नांचा पाठलाग कर, परंतु कधीही शॉर्टकट घेऊ नको. हा महत्त्वाचा आणि उत्तम व्यक्ती होण्याचा सल्लाही त्यांनी मला दिला, जो मी स्वीकारला. मी जेव्हा जेव्हा बॅट उंचावली, तेव्हा तेव्हा ती त्यांच्यासाठी होती.
माझी आई – तिने माझ्यासारख्या खोडकर मुलाला कसे सांभाळले हे फक्त तीच सांगू शकते. ती खूप संयमी आहे. गेली 24 वर्षे मी भारताकडून खेळत असताना, तेव्हा तिने माझी काळजी घेतली. ती माझ्यासाठी प्रार्थना करायची. आजही ती प्रार्थना करत आहे. तिच्याच प्रार्थना आणि आशीर्वादामुळे मी इथपर्यंत पोहोचलो आहे. आईने माझ्यासाठी केलेल्या त्यागासाठी खूप खूप धन्यवाद.
माझ्या काका आणि काकूंनी मला मुलाप्रमाणे वाढवले. मी चार वर्षे त्याच्याबरोबर राहिलो. मी दिवसभर दमून आल्यानंतर काकू मला हाताने भरवत. मी त्यांच्या मुलासारखा आहे आणि हे नाते असेच राहणार आहे. माझा मोठा भाऊ नितीन जास्त बोलत नाही. पण, एक गोष्ट त्याने मला नेहमीच सांगितली ती म्हणजे, मला माहित आहे की तू तुझे 100% योगदान देशील. नितीन तू माझ्यावर ठेवलेल्या विश्वासाठी धन्यवाद. माझी बहिण सविताने मला माझी पहिली काश्मिर-विलो बॅट दिली होती. मला अगदी पहिल्या दिवसापासून खेळताना पाहणाऱ्या, मोजक्या व्यक्तींमध्ये ती समाविष्ट आहे. त्या बॅटसाठी खूप खूप धन्यवाद.
अजित (मोठा भाऊ), मी तुझ्याबद्दल काय सांगू? माझी क्रिकेट कारकीर्द ही फक्त माझी नसून तुझी देखील आहे. आपण सोबतच हे स्वप्न पाहिले होते. तू माझ्यासाठी आपल्या कारकीर्दीचे बलिदान दिले. अजितने माझ्यातील प्रतिभेची झलक पाहिली आणि मला आचरेकर सरांकडे नेले. तुम्हाला विश्वास बसणार नाही; मात्र, त्याने काल रात्री देखील मला कॉल केला होता. मी कसा बाद झालो याविषयी थोडीफार चर्चा झाली. ही सवय बहुदा जन्मापासूनच आहे. आता मी खेळणार नाही; त्यामुळे आपण गहन चर्चा करूया. अजितने वेळोवेळी मला माझ्या चुका सांगितल्या नसत्या तर, मी इथपर्यंत पोहोचलो नसतो.
माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण 1990 मध्ये आला. जेव्हा मी माझी पत्नी अंजलीला भेटलो. आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा तीने मला विश्वास दिला की, “घरची सर्व काळजी मी घेईल. तू क्रिकेट खेळ.” मला पाठिंबा दिल्याबद्दल आणि माझे घर सांभाळल्याबद्दल धन्यवाद. माझ्या आयुष्यातली सर्वात चांगली भागीदार तू आहेस.
माझी मुले सारा आणि अर्जुन माझ्या आयुष्यातील दोन मौल्यवान हिरे आहेत. ते आता मोठे झालेत. माझी मुलगी 16 वर्षांची झाली. माझा मुलगा 14 वर्षांचा आहे. हा वेळ खूप पटकन निघून गेला. मला नेहमी त्यांच्याबरोबर खास प्रसंग, वाढदिवस, सुट्ट्यांमध्ये वेळ घालवायचा होता. मी या सर्व गोष्टी गमावल्या आहेत. बाळांनो, तुम्ही समजून घेतल्याबद्दल धन्यवाद. मी वचन देतो की, पुढची १६ वर्ष आणि त्यानंतरही मी कायम तुमच्यासोबत असेल. माझे सासू-सासरे आनंद आणि अनाबेल मेहता यांचेही खूप धन्यवाद. आयुष्यातील वरिष्ठ व्यक्तींची जागा घेऊन तुम्ही देखील मला नेहमी मार्गदर्शन केले. अंजलीशी लग्न करण्यास परवानगी दिल्याबद्दल माझ्या सासूचे आभार.
गेली 24 वर्ष भारतासाठी खेळताना माझे अनेक नवे मित्र तयार झाले. मात्र, माझे जुने मित्र कधीही माझ्यापासून तुटले नाहीत. मला गरज असेल तेव्हा ते नेटमध्ये मला गोलंदाजीत सराव करून देण्यासाठी येत. जेव्हा मला दुखापत झाली आणि मला असे वाटले की माझी कारकीर्द संपुष्टात येत आहे; तेव्हा या सर्वांनी मला नैराश्यातून बाहेर येण्यास खूप मदत केली. तुम्हा सर्वांचे खूप आभार.
जेव्हा माझ्या भावाने मला आचरेकर सरांकडे नेले, तेव्हा माझ्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा आला. त्यांना आज स्टॅन्डमध्ये पाहून मला आनंद झाला. तो सहसा सर्व सामने टेलीव्हिजनवर पाहतात. मी 11-12 वर्षात असताना, ते मला त्यांच्या स्कूटरवर बसवून संपूर्ण मुंबईमध्ये सामने खेळण्यासाठी फिरवत. कधी शिवाजी पार्क तर कधी आझाद मैदान असे सामने व्हायचे. मला जास्तीत जास्त सराव करता यावा म्हणून ते प्रयत्नशील असायचे. सर मला आत्तापर्यंत कधीच ‘वेल प्लेड’ असे म्हणाले नाहीत. कारण त्यांना असे वाटायचे की, मी आत्मसंतुष्ट होईल आणि माझे खेळावरील लक्ष विचलित होईल. आता कदाचित ते माझ्या कारकीर्दीसाठी ‘वेल प्लेड’ म्हणू शकतात.
माझ्या क्रिकेट कारकीर्दीची सुरुवात याच वानखेडे मैदानावर झाली. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे देखील खूप आभार. त्यांनी कायम मला पाठिंबा दिला. एकदा न्यूझीलंडवरून पहाटे चार वाजता मी मुंबईत येऊन; आठ वाजता देशांतर्गत स्पर्धेतील सामने खेळण्यासाठी मैदानावर उतरले. ते फक्त मुंबई क्रिकेटवरील प्रेमापोटी होते. येथील प्रत्येकाने मला खूप प्रेम आणि पाठिंबा दिला आहे. मला तुमच्या सर्वांसोबत यापुढेही काम करायला आवडेल.
भारताकडून खेळण्याचे माझे स्वप्न होते. माझे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बीसीसीआयने मोठी मदत केली. वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी त्यांनी मला संधी देत उपकृत केले. माझ्या कठीण काळात येथील सर्व जण माझ्या पाठीशी भक्कमपणे उभे राहीले. बीसीसीआयच्या या सहकार्याबद्दल धन्यवाद.
माझ्या या 24 वर्षाच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट प्रवासात मी बऱ्याच वरिष्ठ खेळाडूंसोबत खेळलो. त्यापूर्वीही टेलिव्हिजनवर सामने पाहताना, अनेकांना मी माझा आदर्श मानायचो. मला क्रिकेट खेळण्यासाठी प्रोत्साहित केल्याबद्दल त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार.
मी इथे समोर मोठ्या पडद्यावर राहुल आणि सौरवला पाहत आहे. अनिल आणि लक्ष्मण येथे नाहीत. सोबतच अनेक माझे संघ सहकारी देखील मला पाहत असतील. तुम्ही सर्वजण माझे कुटुंब आहात. तुम्हा सर्वांसोबत मी अनेक संस्मरणीय क्षण वाटून घेतले आहेत. आता मी ड्रेसिंग रूममध्ये नसेल; ही कल्पनाच करू वाटत नाही. माझ्यासोबत खेळलेल्या सर्व संघसहकारी, प्रशिक्षक आणि पदाधिकार्यांना धन्यवाद. धोनीने जेव्हा मला 200 व्या सामन्यासाठीची खास टोपी दिली, तेव्हा मी एक छोटेसे भाषण दिले होते. त्याच भाषणाचा सारांश सांगताना म्हणतो की, तुम्ही सर्वजण खूप भाग्यशाली आहात की तुम्हाला राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व करावयास मिळत आहे. हा प्रत्येक क्षण देशासाठी खेळा. मला माहित आहे की, तुम्ही सर्वजण योग्य भावनेने व योग्य मूल्यांनी देशाची सेवा करत राहणार आहात.
माझी कारकीर्द दुखापतींनी भरलेली राहिली. त्यावेळेस मला निरोगी ठेवल्याबद्दल सर्व डॉक्टरांचे आभार.
माझा प्रिय मित्र, माझा पहिला व्यवस्थापक मार्क मस्कराहन्स. आज तो आपल्यात नाही. तो क्रिकेट, माझे क्रिकेट आणि विशेषतः भारतीय क्रिकेटचा हितचिंतक होता. आज मार्कची खूप आठवण येत आहे. धन्यवाद मार्क. सध्या माझ्या व्यवस्थापनाचे काम पाहणाऱ्या डब्ल्यूएसजीचे सुद्धा आभार. गेली चौदा वर्षे माझ्यासोबत असलेले माझे मॅनेजर विनोद यांचेही खूप आभार. त्यांनी देखील माझ्यासाठी खूप मोठा त्याग केला आहे.
https://twitter.com/BCCI/status/1063287053046112256
मला असे वाटते की, माझे भाषण खूप लांबले आहे
पण, मला शेवटी तुमच्या सर्वांचे आभार मानायचे आहेत. तुमचे समर्थन कायम माझ्या हृदयाजवळ आहे आणि ते माझ्यासाठी मौल्यवान आहे. मी बर्याच अशा लोकांना भेटलो. ज्यांनी माझ्यासाठी उपवास केला, माझ्यासाठी प्रार्थना केली. या सगळ्याशिवाय माझे आयुष्य असे नसते जे आज आहे. आता हा खूप मोठा काळ निघून गेला आहे. परंतु तुम्हा चाहत्यांच्या अनेक आठवणी नेहमी माझ्याबरोबर राहतील. विशेषत: ‘सचिन सचिन’ चा तो आवाज, अगदी शेवटच्या श्वासापर्यंत माझ्या कानात ऐकू येईल. मी काही बोलायचं राहिलो असेल किंवा कोणाला विसरलो असेल तर समजून घ्याल अशी अपेक्षा करतो आणि थांबतो. धन्यवाद आणि गुडबाय..” (The Special Story Of Sachin Tendulkar’s Final Test Speech)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा- सचिनची ‘ती’ खेळी कधीच विसरली जाणार नाही