आज दुबईतील दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर आयपीएलच्या तेराव्या हंगामाचा अंतिम सामना रंगेल. चार वेळचे विजेते मुंबई इंडियन्स आणि प्रथमच आयपीएलचा अंतिम सामना खेळत असलेल्या दिल्ली कॅपिटल्स या दोन दमदार संघात ही लढत होईल. दोन्ही संघात अनेक रथी-महारथी आहेत. मुंबईसाठी जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, ट्रेंट बोल्ट, हार्दिक पांड्या, इशान किशन हे प्रमुख खेळाडू म्हणून पुढे आले. तर दुसरीकडे दिल्लीसाठी शिखर धवन, कागिसो रबाडा, एन्रीच नॉर्किए, मार्कस स्टॉयनिस हे मॅचविनर ठरले. याच दिल्ली संघातील एक खेळाडू ‘छुपा रुस्तम’ ठरला. ज्याने मोक्याच्या क्षणी येऊन काही सामने दिल्लीला जिंकून दिले अथवा सामन्यात पुनरागमन करून दिले. हा दिल्लीच्या आत्तापर्यंतच्या प्रवासातील ‘छुपा रुस्तम’ म्हणजे अष्टपैलू अक्षर पटेल.
जिममध्ये टिंगल करायची म्हणून क्रिकेटर बनला अक्षर
अक्षरचा जन्म गुजरातमधील नाडियाद या लहान शहरातला. अक्षर नववीपर्यंत खूप चांगला विद्यार्थी होता आणि तो नेहमी वर्गात प्रथम यायचा. अक्षरने शालेय वयात क्रिकेटपटू होण्याचा विचारही केला नव्हता. अक्षरला मोठे होऊन मेकॅनिकल इंजिनिअर व्हायचे होते. अक्षरच्या वडिलांना अक्षरच्या तब्येतीची खूप चिंता वाटायची. कारण अक्षर बर्यापैकी कमकुवत आणि कमी वजनाचा होता. त्यामुळे त्याचे वडील राजेश पटेल यांनी त्याला जिममध्ये पाठवायला सुरवात केली. अक्षरने जिमला जायला सुरुवात केली खरी, मात्र, काही दिवसांत त्याने तेथे जाणे बंद केले. कारण, तिथे तो डंबलसुद्धा उचलू शकत नसायचा. ज्यामुळे इतर लोक त्याच्यावर हसायचे. जिम सोडल्यानंतर त्याने स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. अक्षरच्या जीवनात हाच ‘टर्निंग पॉइंट’ ठरला. वयाच्या पंधराव्या वर्षी त्याचा मित्र धिरेन कंसारा याने त्याच्यातील प्रतिभा ओळखली आणि त्याला क्रिकेट प्रशिक्षण घेण्यास सांगितले.
क्रिकेटर म्हणून केली भरभर प्रगती
क्रिकेटचे प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केल्यानंतर अक्षरने लवकरच खेडा येथील आपल्या स्थानिक प्रशिक्षकांना क्रिकेट कौशल्याने प्रभावित केले. अक्षर केवळ धावा काढत नव्हता तर नियमितपणे बळीही घेत होता. त्याची कामगिरी पाहून त्याला लवकरच गुजरात रणजी संघात खेळण्याची संधी मिळाली. त्यावेळी त्यांचे वय फक्त १८ वर्षे १ महिना होते. २०१२ च्या रणजी स्पर्धेत त्याने केवळ एक सामना खेळला. परंतु, २०१३-२०१४ रणजी करंडक स्पर्धेत त्याची कामगिरी चमकदार झाली. तो गुजरातसाठी स्पर्धेतील सर्वाधिक सातत्यपूर्ण खेळाडू बनला. अक्षरने त्या हंगामात सात सामने खेळताना ४६.१२ च्या सरासरीने ३६९ धावा केल्या. सोबतच २९ बळीही त्याने आपल्या नावे केले.
एनसीएत नाखुषीने बनला अष्टपैलू
देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरीमुळे अक्षरला भारताच्या एकोणीस वर्षाखालील संघात स्थान मिळाले. बेंगलोरस्थित राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) तो प्रशिक्षण घेऊ लागला. तेव्हा तेथील प्रशिक्षकांनी त्याला सांगितले की तू गोलंदाजी अधिक करू शकतो. मात्र, अक्षरने त्यांना सांगितले की, मी आधी फलंदाज आहे आणि नंतर गोलंदाज. प्रशिक्षकांनी जास्त दबाव टाकल्याने तो गोलंदाजी करू लागला. हिच बाब तो एक उत्कृष्ट अष्टपैलू बनवण्यासाठी कारणीभूत ठरली.
प्राचार्यांनी केली चूक आणि ‘अक्सर’चा झाला ‘अक्षर’
अक्षरच्या नावाची एक वेगळीच गंमत आहे. भारताच्या एकोणीस वर्षाखालील संघात अक्षरची निवड झाली तेव्हा, त्याच्याकडे पासपोर्ट नव्हता. भारताला इंग्लंड दौरा करायचा असल्याने; त्याला पासपोर्ट हवा होता. पासपोर्टसाठी शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र आवश्यक असल्याने, त्याच्या वडिलांनी घाईघाईत हे शाळेतून शाळेतून काढून आणले. मात्र, त्यात एक घोळ झाला. शाळेच्या प्राचार्यांनी ‘Akshar’ असे लिहिण्याऐवजी ‘Axar’ असे लिहिले; आणि हेच त्याचे नाव पडले.
मुंबई इंडियन्सकडून केली होती आयपीएल कारकिर्दीची सुरुवात
अक्षरला बीसीसीआयचा ‘२०१३ सालचा सर्वोत्कृष्ट एकोणीस वर्षाखालील क्रिकेटपटू’ हा पुरस्कार मिळाला. त्याचवर्षी सर्वप्रथम त्याची निवड आयपीएलसाठी झाली. तो मुंबई इंडियन्सचा सदस्य होता. याच आयपीएल हंगामात मुंबईने आपले पहिले आयपीएल विजेतेपद पटकावले. २०१४ आयपीएल लिलावात किंग्स इलेव्हन पंजाबने अक्षरला खरेदी केले आणि अक्षरची क्रिकेट कारकीर्द बहरली. अक्षरने तळाच्या क्रमांकावर फलंदाजीला येत अनेक उपयुक्त खेळ्या केल्या. त्यापेक्षा महत्वपूर्ण म्हणजे त्याने १७ बळी आपल्या नावे केले.
आंतरराष्ट्रीय पदार्पण आणि विश्वचषक संघात निवड
आयपीएल २०१४ मधील प्रभावी प्रदर्शनानंतर बांगलादेश दौर्यासाठी अक्षरला भारतीय एकदिवसीय संघात स्थान देण्यात आले. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठीही तो भारतीय संघाचा देखील एक भाग होता. त्याने मालिकेतील सर्व पाच सामने खेळताना ११ गडी बाद केले. या मालिकेतील कामगिरीमुळे निवड समितीचा त्याच्यावरील विश्वास वाढला. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये आयोजित २०१५ क्रिकेट विश्वचषकासाठीच्या भारतीय संघात त्याला स्थान मिळाले. मात्र, त्याला एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. अक्षर २०१५ च्या अखेरीस एकदिवसीय गोलंदाजांच्या क्रमवारीत १३ व्या स्थानी पोहोचला होता. हीच त्याची कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी ठरली.
आयपीएलमध्ये दमदार कामगिरी; राष्ट्रीय संघातून डच्चू
अक्षरचे भारताच्या राष्ट्रीय संघाच्या आत-बाहेर येणे सुरू होते. त्याचवेळी, २०१६ आयपीएलमध्ये गुजरात लायन्सविरुद्ध त्याने हॅट्रिक घेण्याचा कारनामा केला. इंग्लंडमध्ये झालेल्या २०१७ चॅम्पियन्स ट्रॉफीत त्याला संधी मिळेल अशी सर्वांना अपेक्षा होती. मात्र, त्याच्याऐवजी अनुभवी रवींद्र जडेजाला संघात स्थान दिले गेले. भारताला या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पाकिस्तानकडून पराभव स्वीकारावा लागला. भारताच्या पराभवानंतर जडेजा व अनुभवी रविचंद्रन आश्विन यांना मर्यादित षटकांच्या संघातून डच्चू देण्यात आला. जडेजाच्या जागी अक्षरला तीन मालिकात खेळविण्यात आले. अक्षर संघात आपली जागा बनविण्यासाठी प्रयत्नशील असतानाच, कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल यांचे भारतीय संघात आगमन झाले. त्या दोघांनी नेत्रदीपक कामगिरी करत; संघातील दोन्ही फिरकीपटूंच्या जागा आपल्या नावे केल्या. त्यामुळे, अक्षरवर संघातून बाहेर बसण्याची नामुष्की आली. अक्षरने आपला अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना २०१७ मध्ये न्यूझीलंड विरुद्ध खेळला.
किंग्स इलेव्हन पंजाबचा विश्वासू
राष्ट्रीय संघातून बाहेर झाला तरी, आयपीएलमध्ये किंग्स इलेव्हन पंजाबचा तो प्रमुख खेळाडू होता. २०१८ आयपीएलसाठी किंग्स इलेव्हन पंजाब संघ व्यवस्थापनाने फक्त अक्षरलाच आपल्या संघात कायम ठेवले होते. अक्षरला संघ व्यवस्थापनाने ठेवलेला विश्वास सार्थ ठरवता आला नाही. २०१८ आयपीएल हंगाम त्याच्यासाठी विसरण्यासारखा राहिला. परिणामी, २०१९ आयपीएलपूर्वी त्याला पंजाबने करारमुक्त केले. अक्षरने पंजाबसाठी २०१४ ते २०१८ असे पाच हंगाम खेळले. ज्यात तो ५८ बळी मिळवण्यात यशस्वी ठरला.
दिल्ली कॅपिटल्सने दाखवला विश्र्वास
जयपूरमध्ये २०१९ आयपीएलसाठीचा लिलाव झाला. अक्षरला फार मोठी रक्कम मिळणार नाही; असा अंदाज वर्तविला गेलेला. मात्र, राजस्थान रॉयल्स, मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्सने हे अंदाज खोटे ठरवले. या तिन्ही संघांनी अक्षरसाठी जोरदार बोली लावली. अखेरीस, दिल्ली कॅपिटल्सने पाच कोटी रुपयांची घसघशीत रक्कम मोजून त्याला आपल्या संघात सामील करून घेतले. अक्षरला २०१९ आयपीएलमध्ये मर्यादित संधी मिळाल्या. यातही त्यात त्याने १० बळी मिळवत आपली उपयोगिता सिद्ध केली.
आयपीएल २०२० मध्ये निभावली दिल्लीच्या यशात महत्वपूर्ण भूमिका
दिल्ली कॅपिटल्सने २०२० आयपीएलसाठी त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याला संघात कायम केले. कोरोना महामारीमुळे यूएईमध्ये सुरू असलेल्या आयपीएलच्या तेराव्या हंगामात त्याने दिल्लीसाठी एकदम अफलातून अशी कामगिरी केली नाही. मात्र, ज्यावेळी संघाला गरज होती; त्यावेळी त्याने आपला हात वर केला. चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या सामन्यात दिल्लीला विजयासाठी अखेरच्या षटकात १७ धावा हव्या असताना; त्याने रवींद्र जडेजाला सलग तीन षटकार खेचत एकहाती सामना जिंकून दिला. ज्यावेळी विरोधी संघाचे फलंदाज भागीदारी बनवत असतात; तेव्हा ती भागीदारी तोडण्याची जबाबदारी दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरने अक्षरला दिली आणि त्याने ती निभावली. अक्षरने आत्तापर्यंत स्पर्धेत १४ सामने खेळताना बहुमूल्य १०९ धावा व ९ बळी आपल्या नावे केले आहेत. सोबतच, सीमारेषेवरील एक विश्वासू क्षेत्ररक्षक म्हणूनही तो संघाला मदत करताना दिसून येतो.
अक्षरने २०१३ साली ज्या मुंबई इंडियन्सकडून आपली पहिली आयपीएल ट्रॉफी मिळवली होती; त्याच मुंबई इंडियन्सविरुद्ध तो आज मैदानात उतरणार आहे. सात वर्षानंतर पुन्हा एकदा आयपीएल ट्रॉफी उचलण्यासाठी तो नक्कीच उत्सुक असेल.
वाचा-
-एकाच षटकात आयपीएलचा इतिहास बदलणारा ‘एन्रीच नॉर्किए’
-क्रिकेटर असलेल्या पोराला दुखापत झाली म्हणून अल्पभूधारक शेतकरी बापाने विकली होती जमीन