इंडियन प्रीमीयर लीग स्पर्धेतील यशस्वी संघापैकी चेन्नई सुपर किंग्स हा एक संघ आहे. गेल्या ३ हंगामापासून हा संघ त्यांच्या कामगिरीबरोबर संघातीर वयस्कर खेळाडूंमुळे चर्चेत आहे. या संघातील बऱ्यापैकी खेळाडूंचे वय ३० पेक्षा अधिक आहे. पण असे असले तरी अशा अनुभवी खेळाडूंमध्येही एक युवा खेळाडू आहे, जो भाव खाऊन जातोय. तो खेळाडू म्हणजे इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू सॅम करन. सॅम करनने गोलंदाजी, फलंदाजी व क्षेत्ररक्षण अशा तिन्ही विभागात जबरदस्त प्रदर्शन करून सर्वांची वाहवा मिळवली. गेल्या दोन हंगामात अनेक सामन्यांत करनने ब्राव्होची अनुपस्थिती सीएसकेला अजिबात जाणवू दिली नाही. याच सॅम करनचा आज २३ वा वाढदिवस आहे.
क्रिकेटचा वारसा असलेले करन कुटुंब
सॅमचे वडील केविन करन हे झिम्बाब्वेचे माजी राष्ट्रीय खेळाडू राहिले होते. केविन यांनी १९८३ व १९८७ विश्वचषकात झिम्बाब्वेचे प्रतिनिधित्व केलेले. इंग्लंडमध्ये स्थायिक झाल्यानंतरही ते २००५-२००७ या काळात झिम्बाब्वेचे राष्ट्रीय प्रशिक्षक होते. सॅम हा केविन यांचा तृतीय चिरंजीव. सॅमचा मोठा भाऊ टॉम हा २०१७ पासून इंग्लंडच्या मर्यादित षटकांच्या संघाचा भाग आहे. २०१९ क्रिकेट विश्वचषक जिंकलेल्या इंग्लंड संघाचा तो सदस्य होता. दुसरा भाऊ बेन हादेखील नॉर्थम्पटनशायर काउंटी संघाचा प्रमुख खेळाडू आहे. विशेष म्हणजे सॅमचे आजोबाही क्रिकेटपटू होते. घरातच क्रिकेटचे बाळकडू मिळालेले असल्याने सॅमला क्रिकेटमध्ये पारंगत होण्यास वेळ लागला नाही.
विविध वयोगटात खेळताना गाजवली मैदाने
ऍलेक स्टीवर्ट सरेचे संचालक असताना, त्यांनी सॅमचा सरेच्या १५ वर्षाखालील संघात समावेश केला होता. सरेच्या १५ व १७ वर्षाखालील संघासाठी धडाकेबाज कामगिरी करत त्याने १७ व्या वर्षी सरेच्या वरिष्ठ संघात जागा मिळवली. केंटविरुद्ध १७ धावांत ५ बळी मिळवताना, काउंटी चॅम्पियनशिपच्या इतिहासात सर्वात कमी वयात बळींचे पंचक मिळवणारा गोलंदाज म्हणून त्याची नोंद झाली.
काउंटी व नेटवेस्ट ब्लास्ट टी२० स्पर्धेतील धडाकेबाज कामगिरीच्या जोरावर त्याची निवड २०१६ च्या एकोणीस वर्षाखालील क्रिकेट विश्वचषकासाठी, इंग्लंडच्या संघात करण्यात आली. त्या स्पर्धेत देखील २०१ धावा व ७ बळी अशी कामगिरी करत त्याने आपली उपयोगिता सिद्ध केली.
इंग्लंडसाठी लकी चार्म
साल २०१८ मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी बेन स्टोक्सचा पर्यायी खेळाडू म्हणून, सॅमला निवडले गेले. त्याने पाकिस्तान विरुद्ध कसोटी तर पंधरा दिवसाच्या अंतरात ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय पदार्पण केले. भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत २७२ धावा व ११ बळी मिळवत त्याने मालिकावीराचा पुरस्कार आपल्या नावे केला. सॅम इंग्लंडसाठी कसोटी क्रिकेटमध्ये लकी चार्म ठरला. तो खेळलेल्या पहिल्या १९ कसोटीत एकदाही इंग्लंडला पराभवाचे तोंड पाहावे लागले नाही.
सॅमने कसोटीतच नाही तर क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात नाव गाजवण्यास सुरुवात केली आहे. याचवर्षाच्या सुरुवातीला भारताविरुद्ध पार पडलेल्या वनडे मालिकेतही त्याची कामगिरी उत्तम ठरली. त्याने भारताविरुद्ध तिसऱ्या वनडे सामन्यात इंग्लंड पराभवाच्या दाट छायेत असताना ८ व्या क्रमांकावर फलंदाजीला येत नाबाद ९५ धावांची खेळी करत सामन्यात रंगत आणली होती. या सामन्यात तो भारताच्या हातातून विजय खेचून घेणार असे वाटत होते, पण अखेरच्या षटकात त्याला फटकेबाजी करता आले नाही आणि एकवेळ सहज जिंकेल असे वाटत असलेल्या भारतीय संघाने हा सामना कसाबसा केवळ ७ धावांनी जिंकला. या सामन्यात इंग्लंड पराभूत असतानाही सॅम सामनावीर ठरला.
आयपीएलमध्येही सॅमचा बोलबाला
आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवत असताना, २०१९ च्या आयपीएल लिलावात, ७ कोटी २० लाखांची तगडी बोली लावत, किंग्स इलेव्हन पंजाबने त्याला आपल्या संघात सामील केले. त्या हंगामात, केकेआर विरुद्ध सलामीला येऊन २३ चेंडूत ५५ धावा करून आपले फलंदाजी कौशल्य त्याने सर्वांना दाखवले. दिल्ली कॅपिटल्सविरूद्ध हॅट्रिक घेत, आयपीएलच्या इतिहासात सर्वात कमी वयात हॅट्रिक घेणारा खेळाडू होण्याचा मान मिळवला.
साल २०२० आयपीएलपूर्वी पंजाबने त्याला करारमुक्त केल्यानंतर, चेन्नई सुपर किंग्जने ५ कोटी ५० लाखांची बोली या अष्टपैलू खेळाडूवर लावत, त्याला खरेदी केले. सीएसकेसाठी ही बोली चांगलीच फायदेशीर ठरली. कारण सॅमने कधीही संघाला निराश केले नाही. आक्रमक फलंदाजी आणि गरजेच्या वेळेला उत्तम गोलंदाजी करत त्याने त्याचे योगदान दिले.
सॅमच्या कामगिरीने, सीएसकेचे चाहते त्याची तुलना, सीएसकेसाठी खेळलेला माजी द. आफ्रिकन अष्टपैलू खेळाडू ऍल्बी मॉर्केल याच्याशी करत आहेत. चेन्नईच्या संघातील बहुतांशी खेळाडू पस्तिशी पार करून गेले असल्याने, चेन्नईसाठी भविष्यातील एक मोठा खेळाडू म्हणून सॅममध्ये सीएसके व्यवस्थापन गुंतवणूक करू शकते. एवढेच नाही तर इंग्लंड क्रिकेटसाठीही त्याच्याकडे भविष्यातील एक दिग्गज अष्टपैलू म्हणून पाहिले जात आहे.
वाचा –
वाढदिवस विशेष: गल्ली क्रिकेटर ते सुलतान ऑफ स्विंग कसा झाला अक्रम?
क्रिकेटविश्वातील ‘फिनीक्स’ आहे तो!
ज्या मुंबईतून क्रिकेटचे संस्कार झाले, त्याच मुंबई संघाचा ‘महागुरु’ बनलेल्या अमोल मुजुमदारचा प्रवास