सध्याच्या क्रिकेटमध्ये आपण पाहतो की, एखाद दुसरा खेळाडू सोडला तर, प्रत्येक फलंदाज आक्रमक फटके खेळण्याचा प्रयत्न करत असतो. जवळपास प्रत्येक संघ आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये आपल्या अष्टपैलू खेळाडूला वरच्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवून वेगाने धावा काढण्यासाठी प्रयत्नशील असतात. कोणत्याही क्रमांकावर फलंदाजीला येत, विनासंकोच फटकेबाजी करण्याची एकप्रकारे परवानगीच या खेळाडूंना असते. अशा परिस्थितीत, एखादी चांगली खेळी करणाऱ्या खेळाडूला क्रिकेटमध्ये ‘पिंच हिटर’ ही संज्ञा वापरली जाते.
हे ‘पिंच हिटर’ आता जरी क्रिकेटमध्ये धुमाकूळ घालत असते तरी, चाळीस वर्षापूर्वी एक भारतीय खेळाडू असाच ‘पिंच हिटर’ ठरला होता. नेहमी सातव्या- आठव्या क्रमांकावरील फलंदाजी करणारा हा गोलंदाज, चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि शतकी खेळी करून, भारताला विजयी करून गेला. भारताचा पहिला ‘पिंच हिटर’ असलेला हा खेळाडू होता ‘चेतन शर्मा’.
पंडितजींच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित केला होता ‘नेहरू कप’
भारताचे पहिले पंतप्रधान दिवंगत जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त १९८९ मध्ये भारतात नेहरू कपचे आयोजन करण्यात आले होते. एमआरएफ वर्ल्ड सिरीज नावाने होणाऱ्या या स्पर्धेला पंडितजींचे नाव देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला होता. स्पर्धेत भारताव्यतिरिक्त पाकिस्तान, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडीज व श्रीलंका हे संघ सहभागी झाले होते. जवळपास मिनी विश्वचषकच भरला होता. भारतीय प्रेक्षक १९८७ च्या विश्वचषकानंतर, पुन्हा मोठे मोठे आंतरराष्ट्रीय खेळाडू पाहण्यास सज्ज होते.
भारताने स्पर्धेतील आपली सुरुवात दुबळ्या श्रीलंकेला हरवत विजयाने केली. पावसाचा व्यत्यय आलेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या, दुसऱ्या साखळी सामन्यात मात्र यजमानांना २० धावांनी पराभव पत्करावा लागला. उपांत्य फेरीत जागा पटकाविण्यासाठी, भारताला इंग्लंडविरुद्ध विजय मिळवणे आवश्यक होते. दुसरीकडे, इंग्लंडने आपले पहिले तिन्ही सामने जिंकत, उपांत्य फेरीत आगेकूच केली होती.
भारताला विजय होता अत्यावश्यक
कानपूरमधील आत्ताचे ग्रीनफिल्ड स्टेडियम त्यावेळी मोदी स्टेडियम नावाने ओळखले जात. भारतीय कर्णधार कृष्णमाचारी श्रीकांत यांनी नाणेफेक जिंकत, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. इंग्लंडचे फलंदाज ऍलन लॅम्ब व ऍलेक स्टीवर्ट यांनीही भारतीय गोलंदाजांची पिसे काढत, २५५ धावा चोपल्या. लॅम्ब यांनी सर्वाधिक ९१ तर स्टीवर्ट यांनी ६१ धावा फटकावल्या. भारताचे मध्यमगती गोलंदाज चेतन शर्मा सर्वाधिक महागडे गोलंदाज ठरले. त्यांनी आपल्या दहा षटकात तब्बल ७८ धावांची खैरात केली होती. कपिल देव यांनी दोन बळी आपल्या नावे केले होते.
भारताची निराशाजनक सुरुवात
सलामीवीर रमण लांबा स्वस्तात बाद झाल्यानंतर कर्णधार श्रीकांत यांनी नवज्योत सिंह सिद्धू यांना साथीला घेत, भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. संघाच्या ६५ धावा झाल्या असताना, श्रीकांत हेमिंग्स यांच्या गोलंदाजीवर यष्टिरक्षक जॅक रसेल यांच्या हाती झेंडा घेऊन परतले. त्यावेळी, २५६ धावांचे आव्हान खूप मोठे वाटत असे. भारताची अशी सुरुवात पाहून, भारतीय संघ सलग दुसऱ्या सामन्यात पराभूत होणार असे अनेकांना वाटले.
‘पिंच हिटर’ म्हणून मैदानात उतरले चेतन शर्मा
श्रीकांत बाद होऊन परतत असताना, चेतन शर्मा मैदानात उतरत होते. शर्मा यांना फलंदाजीसाठी येताना पाहून, क्रिकेट प्रेमी अवाक् झाले. कारण, शर्मा यांनी मागील ५६ एकदिवसीय सामन्यात २० धावांचीही वेस ओलांडली नव्हती. त्यांची आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या होती ३८. शर्मा यांचा गोलंदाजीतील दिवस खराब गेला होता. कर्णधाराने कोणत्या अपेक्षेने, शर्मा यांना फलंदाजीसाठी पाठवले होते, हा प्रश्न सर्वांना पडला होता. दिलीप वेंगसरकर, मोहम्मद अजहरुद्दिन व कपिल देव यांच्याआधी शर्मा फलंदाजीला येणे, समालोचकांनादेखील रुचले नाही.
त्यावेळी, भारतीय संघात ‘पिंच हिटर’ म्हणावे असे खेळाडू नव्हते. पाकिस्तानकडे त्यावेळी वसीम अक्रम, सोहेल फजल हे ‘पिंच हिटर’ होते. या दोघांनी पाकिस्तानला बरेच सामने जिंकून दिले होते. भारताने देखील त्याच प्रकारे, चेतन शर्मा यांना फलंदाजीला पाठवून एक प्रकारे जुगार खेळला होता. संघ व्यवस्थापन मात्र आपला निर्णय चुकीचा ठरणार नाही ना? या चिंतेत होते.
चेतन शर्मा यांनी फलंदाजीला सुरुवात केली. त्यांच्या अवघ्या तीन धावा झाल्या असताना, रॉबिन स्मिथ यांनी त्यांचा सीमारेषेजवळ झेल सोडला. शर्मा यांनी काही तंत्रशुद्ध फटके मारले. मात्र, त्यांचे अधिकतम फटके एखाद्या तळाच्या फलंदाजा सारखेच होते. शर्मा अत्यंत धोका पत्करून खेळ करत असल्याने, संघ सहकाऱ्यांची धाकधूक वाढली होती. दुसरीकडे, सिद्धू अत्यंत खंबीरपणे, अजिबात घाई न करता डाव सावरण्यात मग्न होते. चेतन शर्मा यांच्या प्रतिहल्ल्याने, इंग्लिश कर्णधार ग्रॅहम गूच गांगारून गेले. क्षेत्ररक्षक कुठे लावावे ? हेच त्यांना समजत नव्हते. शर्मा यांचे नवनवीन फटके पाहून प्रेक्षक मात्र उड्या मारत होते. बॅट फिरवण्याचा परवाना घेऊनच मैदानात आलेले शर्मा आक्रमकपणे आपली खेळी पुढे घेऊन चालले होते.
सलग दोन चेंडूंवर मिळाले जीवदान
भारताच्या १७० धावा धावफलकावर लागल्या असताना, सिद्धू वैयक्तिक ६१ धावांवर धावबाद झाले. सामन्यात अचानक रंगत निर्माण झाले. सिद्धू यांच्या जागी आलेले, अनुभवी दिलीप वेंगसरकर एकेरी दुहेरी धावांनी डाव विणू लागले. दुसरीकडे शर्मा यांना, ७४ धावांवर दोन वेळा जीवदान मिळाले. पहिल्यांदा धावबाद करण्याची संधी हुकवल्यानंतर, कर्णधार गूच यांनी एक सोपा झेल सोडला. आज दैव आपल्या बाजूने आहे, याची अनुभूती शर्मा यांना आली. दोन वेळा बाद होण्याची संधी हुकल्यानंतरही शर्मा यांनी दबाव न घेता, आपल्या शतकाकडे मार्गक्रमण सुरू ठेवले.
भारतीय संघ विजयाकडे आगेकूच करत होता. ४५ व्या षटकात भारत विजयाच्या अगदी जवळ गेला. भारताला जिंकण्यासाठी ९ धावांची आवश्यकता होती आणि १६ चेंडू बाकी होते. वेंगसरकर व शर्मा निग्रहाने फलंदाजी करत भारताला अखेरच्या विजयी क्षणापर्यंत घेऊन चालले होते. आत्तापर्यंत, संयमाने खेळत असलेल्या, वेंगसरकर यांनी डिफ्रीटास यांना चौकार खेचला. आपल्या शतकाच्या जवळ असलेल्या, शर्मा यांना ही गोष्ट आवडली नाही. त्यांची वेंगसरकर यांच्याशी थोडीफार बातचीत झाली. त्याचाच परिणाम म्हणून, वेंगसरकर पुढील चेंडूवर बाद झाले. वेंगसरकर परतल्यानंतर, कपिल देव मैदानात उतरले. शर्मा यांचे शतक झाले पाहिजे, या भावनेने कपिल देव यांनी षटकातील अखेरचा चेंडू निर्धाव खेळला खेळला.
..आणि ‘ते’ बहुप्रतिक्षित शतक पूर्ण झाले
पुढच्या षटकात शर्मा यांनी चौकार मारत, धावसंख्या समान केली. या चौकारासोबतच, शर्मा वैयक्तिक ९७ धावांवर पोहोचले. आता, भारताला जिंकण्यासाठी एक धाव हवी होती. शर्मा यांना आपले पहिलेवहिले आंतरराष्ट्रीय शतक झळकवण्यासाठी चौकार मारणे आवश्यक होते. ग्रॅहम गूच गोलंदाजी करत होते. शर्मा यांनी अजिबात दबावात न येता, कव्हर्समधून सुंदर फटका खेळला, जो सीमारेषा पार जाऊनच थांबला.
भारताला विजय मिळाला होता आणि चेतन शर्मा यांचे बहुप्रतिक्षित शतक देखील पूर्ण झाले होते. शर्मा यांचे ते पहिले आणि शेवटचे आंतरराष्ट्रीय शतक ठरले. मात्र, भारतीय क्रिकेटमध्ये ‘पिंच हिटर’ च्या भूमिकेची त्यांनी सुरुवात केली होती.
महत्त्वाच्या बातम्या-