श्रीलंकेचा संघ २००५ मध्ये भारत दौऱ्यावर आला होता. सात एकदिवसीय सामन्यांची एक मालिका या दौऱ्यात खेळवली जाणार होते. पहिले दोन सामने एकतर्फी जिंकत यजमान संघाने आघाडी घेतली. मालिकेतील तिसरा सामना जयपूरच्या नव्याने आंतरराष्ट्रीय स्टेडियमचा दर्जा मिळालेल्या, सवाई मानसिंग स्टेडियमवर होणार होता. त्यावेळच्या भारतीय संघात जवळपास सर्व खेळाडू चांगले अनुभवी होते, अपवाद यष्टीरक्षक फलंदाज महेंद्रसिंह धोनी. धोनीने सुरुवातीच्या काही सामन्यात चांगली चमक दाखवली होती. पाकिस्तान विरुद्ध त्याचे आक्रमक शतक देखील तमाम भारतीयांनी पाहिले होते. तरीही, त्याला अजून बरेच काही सिद्ध करायचे होते. त्यासाठी श्रीलंकेविरुद्धची ही मालिका महत्त्वाची ठरणार होती. त्याच मालिकेत संधीचे सोने कसे करतात, हे धोनीने दाखवून देत नाबाद १८३ धावांची स्फोटक खेळी केली. एका खेळीने धोनीला, भारतीय क्रिकेट संघात नियमित स्थान मिळवून दिले. धोनीने ही असामान्य खेळी केली होती तरी, त्यासाठी त्याला ‘रनर’ घ्यावा लागला होता. धोनीला या विक्रमी खेळीसाठी मदत करणारा तो खेळाडू होता, वीरेंद्र सेहवाग.
श्रीलंकेने उभारला धावांचा डोंगर; भारताची निराशाजनक सुरुवात
भारत आणि श्रीलंकेचे संघ ३१ ऑक्टोबर २००५ ला सवाई मानसिंग स्टेडियमवर उतरले. श्रीलंकेचा कर्णधार मर्वान अटापट्टूने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधाराचा निर्णय माहेला जयवर्धने व कुमार संघकारा यांनी सार्थ ठरवला. जयवर्धनेच्या अर्धशतकी तर संगकाराच्या कारकिर्दीतील चौथ्या शतकी खेळीने, श्रीलंकेने २९८ धावांचा डोंगर उभारला. मालिकेत पुनरागमन करण्याच्या दृष्टीने, श्रीलंकेला हा सामना जिंकणे अत्यावश्यक होते.
श्रीलंकेने दिलेल्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली. अनुभवी सचिन तेंडुलकर अवघ्या दोन धावांवर चामिंडा वासचा शिकार ठरला. सचिन बाद झाल्यावर मैदानात उतरला तो एमएस धोनी. आजच्या सामन्यात आपण काय आणि कसे खेळणार आहोत, याची कल्पना त्याला देखील नसेल. आजच्या सामन्यातील खेळीनंतरच तो, येणाऱ्या काळात जागतिक क्रिकेटवर राज्य करणार होता.
धोनीचे तुफानी शतक आणि दोन महत्त्वाच्या भागीदाऱ्या
धोनीने पहिल्याच चेंडूपासून आक्रमणाचे धोरण स्वीकारले. चामिंडा वासला दोन उत्तुंग षटकार ठोकत त्याने आपले इरादे दाखवून दिले. परवेझ महारूफला देखील त्याने एक षटकार मारला. धोनीने अवघ्या ४० चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. दुसरीकडे, सेहवाग काहीसा सांभाळून खेळत होता. तरीही त्याने १०० चा स्ट्राईक रेट ढासळू दिला नव्हता. मुथय्या मुरलीधरनने डावातील ११ वे आणि आपले पहिले षटक टाकताना, सेहवागला पायचीत पकडले. त्याने ३७ चेंडूत ३९ धावांचे योगदान दिले.
सेहवाग परतल्यानंतर, धोनीच्या साथीला कर्णधार द्रविड आला. धोनी-द्रविड जोडीने वरचढ होऊ पाहत असलेल्या मुरलीधरनला सांभाळून खेळण्याचे तंत्र अवलंबणे. मुरलीधरनच्या चेंडूंवर त्यांनी एकेरी-दुहेरी धावा काढणे सुरु ठेवले. धोनीने अठराव्या षटकात उपुल चंदनाला सीमापार भिरकावत, पुन्हा आक्रमणाला सुरुवात केली. धोनी अजिबात जोखीम न पत्करता आरामात चौकार-षटकार मारत होता. लवकरच त्याने आपले दुसरे आंतरराष्ट्रीय शतक साजरे केले. शतकानंतरही धोनी थांबला नाही आणि त्याने नव्याने डाव पुढे न्यायला सुरुवात केली.
धोनीला होऊ लागला उन्हाचा त्रास
धोनीच्या शतकानंतर द्रविड फार काळ टिकला नाही. युवराज सिंहने धोनीच्या साथीला येत, चौकार मारून सुरुवात केली. धोनी शतक करून खेळत असला तरी, पहिल्या षटकात फलंदाजीला आल्यामुळे त्याला त्रास होत होता. जयपूरच्या उष्ण वातावरणात तो काहीसा थकला होता. आपल्या ‘रनिंग बिटवीन द विकेट’ साठी प्रसिद्ध असलेल्या धोनीला धावायला जमत नव्हते. त्याने, दोन वेळा दुहेरी धावा काढण्यासाठी नकार दिला. धावता येत नसले तरी, तो षटकार मारण्यात मात्र कमी पडत नव्हता. त्याने सलग षटकार मारत, पंच बिली बाऊडेन यांना व्यस्त ठेवले होते.
धोनीचा रनर म्हणून आला सेहवाग
डावातील ३२ व्या षटकात मात्र धोनीला त्रास असह्य झाला. त्याने ‘रनर’ साठी विचारणा केली. सर्वात चांगला धावणारा युवराज सिंह, त्यावेळी मैदानावर असल्याने धोनीचा रनर कोण येणार याविषयी उत्सुकता लागली. कारण, रनर म्हणून फक्त बाद झालेल्या फलंदाजांना येता येत असत. अचानक, वीरेंद्र सेहवाग मैदानात उतरला. सेहवागदेखील आपल्या ‘रनिंग बिटविन द विकेट’ साठी तितकासा प्रसिद्ध नव्हता. तोदेखील एकेरी-दुहेरी धावांपेक्षा चौकार-षटकार मारण्यात धन्यता मानत. सचिन लवकर बाद झाला असला तरी, तो दुखापतीतून सावरत होता. द्रविड नुकताच बाद झाल्याने तयार नव्हता. त्यामुळेच नाईलाजाने सेहवागला धोनीचा रनर म्हणून उतरावे लागले.
सेहवाग मैदानावर आल्यानंतर पुन्हा डाव सुरू झाला. ३७ व्या षटकात युवराज दिलशानच्या चेंडूवर त्रिफळाचित झाला. युवराज बाद झालातरी, धोनीने श्रीलंकन गोलंदाजांना चौकार-षटकार मारणे बंद केले नाही. दीडशतक करत, त्याने आपली सर्वोच्च धावसंख्या मागे सोडली. प्रेक्षक “धोनी धोनी” नावाचा जयघोष करत होते. मैदानाच्या चारी बाजूंना त्याने फटके मारले होते. आपल्या खेळी दरम्यान, धोनीने अनेक विक्रम मोडून, ते आपल्या नावे केले होते.
धोनीच्या विक्रमी १८३ नावा आणि भारताची मालिकेत मजबूत आघाडी
तिलकरत्ने दिलशानला पुढे सरसावत, लॉन्ग-ऑनला षटकार ठोकत धोनीने विजय भारताच्या विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. भारताने ६ गडी राखून विजय साजरा करत मालिकेत ३-० ने आघाडी घेतली. धोनीने १४५ चेंडूत नाबाद १८३ धावांची विक्रमी खेळी केली. या खेळीत १५ चौकार व १० गगनचुंबी षटकारांचा समावेश होता. याच सामन्यातून, भारतीय क्रिकेटला आपला नवा नायक मिळाला होता.
वाचा-
-त्याला संघात घेण्यासाठी प्रशिक्षकाने भांडून बोर्डाला नियम बदलायला लावले होते…
-भारताचा ‘तो’ एक दौरा केला नसता तर क्रिकेटला ‘हेडन’ मिळाला नसता…
-अन् भारताचा सर्वात वेगवान गोलंदाज दुखापतीमुळे क्रिकेटमधून कायमचा संपला