Sunday, January 29, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

HBD विरू: तो आला..त्याने पाहिलं..अन् त्याने जिंकलं! भारतीय क्रिकेटचा खराखुरा ‘सुलतान’

भारतीय क्रिकेटमधील आतापर्यंतचा सर्वोत्तम सलामीवीर कोण? असा प्रश्न कोणत्याही भारतीय क्रिकेट चाहत्याला विचारला, तर अधिक वेळ न दवडता कोणीही पटकन 'विरेंद्र सेहवाग'चे नाव घेईल, यातच सेहवागच्या कारकिर्दीचे खरे यश दिसून येते...

October 20, 2022
in टॉप बातम्या, IPL, क्रिकेट
Photo Courtesy; Twitter/@ICC/@BCCI

Photo Courtesy; Twitter/@ICC/@BCCI


“ऑफस्पिन गोलंदाजांना जो उजव्या हाताचा फलंदाज पुढे सरसावत षटकार मारत नाही, त्याला मी फलंदाज म्हणू शकत नाही.”

हे शब्द आहेत, भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वाेत्तम सलामीवीर म्हणून नावाजलेल्या विरेंद्र सेहवाग याचे. आपल्या आक्रमक फलंदाजीने सेहवाग आजही लाखो क्रिकेटचाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनून राहिला आहे. ‘नजफगडचा नवाब’ तसेच ‘मुलतानचा सुलतान’ या टोपण नावाने प्रसिद्ध असणाऱ्या सेहवागचा समावेश भारताच्या माजी दिग्गजांमध्ये आणि जगातील महान क्रिकेटपटूंमध्ये होतो.

इतर सलामीवीर डावाच्या सुरुवातीला जिथे स्वतःचा जम बसवण्याचा प्रयत्न करत असत, तिथे हा बहाद्दर पहिल्याच चेंडूपासून आक्रमक फलंदाजीला सुरुवात करत असे. त्यामुळे आपसूकच समोरील गोलंदाजांची आणि प्रतिस्पर्धी संघाची संपूर्ण लय बिघडत असे. आज (२० ऑक्टोबर) भारताच्या या महान क्रिकेटपटूचा जन्मदिवस असून या लेखात आपण सेहवागने निडर अंदाजाने खेळलेल्या काही अविस्मरणीय खेळींविषयी जाणून घेणार आहोत.

कौटुंबिक पार्श्वभूमी आणि क्रिकेटला सुरुवात….

दिल्लीतील नजफगड या ठिकाणी किशन आणि कृष्णा या दांपत्याच्या घरी विरेंद्र सेहवागचा जन्म झाला. सेहवाग आपल्या चार भावंडात तिसरा क्रमांकाचा. सेहवागचे कुटुंब इतर भारतीय कुटुंबप्रमाणेच एकत्रित होते. त्याचे दोन काका आणि त्यांची कुटुंबे, असे जवळपास सोळा जणांचे त्यांचे मोठे घर होते. सेहवाग जेव्हा शाळेत जायला लागला, तेव्हा वडिलांनी त्याला अरोडा स्कूलमध्ये दाखल केले. क्रिकेटचे ‘क-ख-ग’ तो याच शाळेत शिकला.

अभ्यासात सरासरी असलेला सेहवाग, क्रिकेटमध्ये मात्र सर्वात पुढे असत. त्याने घरच्यांना स्पष्टपणे सांगितले की, मला क्रिकेटमध्ये कारकीर्द करायची आहे. त्यावर त्याच्या वडिलांनी आक्षेप घेतला. त्यांचे म्हणणे होते की, त्याने क्रिकेट खेळावे मात्र अभ्यासदेखील मागे पडता कामा नये. अशातच, क्रिकेट खेळताना एकदा त्याचा दात तुटला आणि वडिलांनी क्रिकेट खेळणे बंद करायला लावले. खूप प्रयत्नांनंतर, आधी आईला आणि नंतर वडिलांना मनवून त्याने पुन्हा क्रिकेटला सुरुवात केली. दहावीपर्यंत तो रडतखडत गेला आणि त्यानंतर त्याने मनाशी पक्के केले की, आता आपल्यासाठी सर्वस्व काय असेल ते म्हणजे क्रिकेट.

प्रशिक्षकांचे योगदान आणि सेहवागची मेहनत…

क्रिकेट खेळायचे म्हणून सेहवागने नजफगडमधील एका स्थानिक क्रिकेट क्लबमध्ये सामील झाला. त्याठिकाणी प्रशिक्षक असलेले, शशी काळे यांनी त्याला सांगितले की,

“तुझ्यामध्ये भरपूर क्षमता आहे. तू इथे थांबू नको कुठेतरी मोठ्या ठिकाणी खेळायला जा.”

त्यावेळी, फक्त क्रिकेट खेळायला मिळेल म्हणून, सेहवाने स्वतःच्या मनाविरूद्ध जात, १२ वीसाठी सीनियर सेकंडरी स्कूल, विकासपुरी येथे प्रवेश घेतला. त्या शाळेचे प्रशिक्षक असलेले ए.एन शर्मा हे त्यावेळी नॅशनल स्कूल क्रिकेट संघाच्या निवड समितीचे सदस्य होते.

आपल्या व शर्मा यांच्यातील पहिल्या भेटीचा किस्सा सांगताना सेहवाग म्हणतो,

“पहिले तीन दिवस तर, सरांनी मला फक्त मैदानावर उभे राहायला सांगितले होते. या तीन दिवसात मी एक चेंडू खेळला नाही की, एक चेंडू टाकला नाही. चौथ्या दिवशी मला फलंदाजीची संधी मिळाली. फक्त चार चेंडू खेळल्यानंतर, सरांनी मला माघारी बोलावले. मला कळेना काय झाले ? तेव्हा सरांनी सांगितले, मी तीन दिवस तुझा संयम किती आहे ते पाहत होतो. तुला खरंच खेळायची इच्छा आहे का ? हे मला पाहायचे होते. आताचे चार चेंडू तू खेळलास, त्या प्रकारे याआधी कोणीही खेळले नव्हते. याच वेळेपासून मी क्रिकेटला गंभीरतेने घेण्यास सुरुवात केली.”

एखाद्या कॉलेजमध्ये प्रवेश न घेता सेहवागने जामिया मिलिया युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेऊन, सरळ आंतरविद्यापीठ क्रिकेट स्पर्धा खेळण्याची पात्रता मिळवली. सेहवागचे शर्मा यांच्या सल्ल्याने, मद्रास क्रिकेट क्लबसाठी खेळणे सुरू केले. त्याठिकाणी प्रशिक्षक असलेले, सतीश शर्मा हे सेहवागच्या खेळाने खूप प्रभावित झाले. सोबतच त्यांना आश्चर्य वाटले की, हा मुलगा दिल्लीच्या एकोणीस वर्षाखालील संघात कसा नाही ? शर्मा यांनी काही दिवसांनी, जामिया युनिव्हर्सिटी इलेव्हन विरुद्ध दिल्ली अंडर-१९ या सामन्याचे आयोजन केले. सतीश शर्मा यांनी सेहवागला निक्षूण सांगितले की,

“खूप प्रयत्नांनी मी हा सामना आयोजित केला आहे. हा सामना फक्त तुझ्यासाठी असेल. हीच तुझी पहिली आणि अखेरची संधी.”

सेहवाग अशा संधीची वाटच पाहत होता. त्याने प्रशिक्षकांचा विश्वास सार्थ करताना, त्या सामन्यात १४० धावांची खेळी केली. यात १७ उत्तुंग षटकारांचा समावेश होता. विशेष म्हणजे, यातील एकही षटकार मैदानाच्या आतमध्ये न पडता, मैदानाबाहेरील रस्त्यावर जाऊन पडले. याच खेळीने, सेहवागचे आयुष्य बदलले आणि त्याची निवड दिल्लीच्या संघात झाली. १९९७ मध्ये त्यांनी दिल्लीसाठी आपला पहिला प्रथमश्रेणी सामना खेळला. त्याच वर्षी तो उत्तर विभागाकडून दुलीप ट्रॉफीदेखील खेळला. १९९८ च्या एकोणीस वर्षाखालील भारतीय क्रिकेट संघातील त्याचा समावेश करण्यात आला.

निराशजनक आंतरराष्ट्रीय पदार्पण आणि नंतर सुरु झाला धुमधडाका…

सेहवागने अवघ्या तीन वर्षांत इतके धमाकेदार प्रदर्शन केले की, त्याची भारतीय संघात वर्णी लागली. १ एप्रिल १९९९ मध्ये पाकिस्तान विरुद्ध त्याने एकदिवसीय पदार्पण केले‌. पहिल्याच सामन्यात शोएब अख्तरने एका धावेवर त्याला पायचीत केले. या सामन्यानंतर त्याला संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. पुढील वर्षी भारत दौऱ्यावर आलेल्या झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत, त्याला पुन्हा संधी देण्यात आली.

या मालिकेत त्याला जास्त संधी न मिळाल्याने, तो काही खास कामगिरी करू शकला नाही. २००१ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी त्याला पुन्हा भारतीय संघात जागा देण्यात आली आणि त्याने ही संधी साधली. मालिकेतील पहिल्या सामन्यात ५४ चेंडूत ५८ धावा काढून आणि गोलंदाजी करताना ३ बळी मिळवत, त्याने निवडसमितीचा निर्णय सार्थ ठरवला.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेनंतर भारत, श्रीलंका व न्युझीलंड यांच्या दरम्यानच्या तिरंगी मालिकेत, सचिन तेंडुलकरच्या अनुपस्थितत त्याला सलामीला बढती देण्यात आली. न्युझीलंडविरूद्ध अवघ्या ६९ चेंडूत तूफानी शतक झळकावत त्याने सर्वांची मने जिंकली. एकदिवसीय क्रिकेटमधील कामगिरीच्या जोरावर त्याला कसोटीत संधी देण्यात आली. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटीत पदार्पणातच १०५ धावांची खेळी करत त्याने भारतीय संघात आपले स्थान पक्के केले. सचिननंतर सर्वाधिक पसंत केला जाणारा क्रिकेटपटू म्हणून सेहवाग पुढे येऊ लागला.

दक्षिण आफ्रिकेत झालेल्या २००३ क्रिकेट विश्वचषकात तो सचिनसोबत नियमितपणे सलामीला आला. विश्वचषकात त्याची कामगिरी संमिश्र राहिली. अंतिम फेरीत इतर फलंदाजांनी गुडघे टेकल्यानंतर सेहवागने ८५ धावा करत भारताच्या पराभवाचे अंतर कमी केले.

… आणि सेहवाग ‘मुलतानचा सुलतान’ झाला

सेहवागच्या कारकिर्दीतील आणि भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वाेत्तम क्षणांपैकी एक असलेला सेहवागच्या त्रिशतकाचा क्षण २००४ मध्ये आला. पाकिस्तान विरुद्ध पाकिस्तानातच मुलतान कसोटीत त्याने ३०९ धावांची ऐतिहासिक खेळी केली. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदा त्रिशतक झळकावण्याचा मान त्याला मिळाला होता. याच खेळीपासून त्याला ‘मुलतानचा सुलतान’ या नावाने ओळखले जाऊ लागले. या दौर्‍यात पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तरसोबतचे त्याचे वाकयुद्ध चांगलेच गाजले.

बॅडपॅच आणि कमबॅक…

सर्वच खेळाडूंच्या आयुष्यात येतो असा ‘बॅडपॅच’ सेहवागच्या आयुष्यात देखील आला. सन २००५-२००६ च्या हंगामात सेहवागला धावांसाठी खुप मेहनत घ्यावी लागली. याच वेळी त्याला खांद्याची दुखापत झाली. निवडकर्ते २००७ विश्वचषकासाठी त्याची भारतीय संघात निवड करणार नव्हते. मात्र, तत्कालीन कर्णधार राहुल द्रविडने त्याला संघात घेण्याची विनंती केली. भारतीय संघासाठी तो विश्वचषक अवघ्या तीन सामन्यांचा राहिला. या तीन सामन्यात भारतीय संघाकडून सेहवागने सर्वाधिक धावा काढल्या. यात बर्मुडा विरुद्धच्या शतकाचा समावेश होता.

विश्वचषकापासून मिळालेला फॉर्म त्याने टिकवून ठेवला. त्याच वर्षी आयोजित पहिल्यावहिल्या टी-२० विश्वचषकात तो भारताचा सर्वात अनुभवी खेळाडू आणि उपकर्णधार म्हणून सहभागी झाला. स्पर्धेत त्याने दोन धमाकेदार अर्धशतके झळकावली. दुखापतीमुळे तो अंतिम फेरीत खेळू शकला नाही. मात्र, विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा सदस्य होण्याचा मान त्याला मिळाला. सन २००८ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटीत त्याने आपले दुसरे त्रिशतक पूर्ण केले. सन २००९ च्या न्यूझीलंड दौऱ्यात त्याने ६० चेंडूत वनडे शतक झळकावण्याचा पराक्रम केला. त्याच वर्षी श्रीलंकेविरुद्ध कसोटीत २९३ धावांची विस्फोटक खेळी त्याने केली. त्याचा तीन त्रिशतके करण्याचा विक्रम थोडक्यात चुकला होता.

विश्वचषक २०११

सेहवागच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम क्षण म्हणजे, २०११ साली भारतात झालेला क्रिकेट विश्वचषक. संपूर्ण भारतीय उपखंडात उत्साहाचे वातावरण या विश्वचषकामुळे तयार झाले होते. बांगलादेशविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात त्याने १७५ धावांची विस्फोटक खेळी केली.‌ याच, बांगलादेशविरुद्धच्या पराभवामुळे भारताला २००७ विश्वचषकातून बाहेर पडावे लागले होते. त्याचा बदला सेहवागच्या या खेळीमुळे घेतला गेला आणि भारताच्या विश्वचषक मोहिमेला विजयी प्रारंभ झाला. सेहवागने संपूर्ण स्पर्धेत भारतासाठी वेगवान सलामी दिली. स्पर्धेत १० सामन्यात त्याने ३८० धावा काढल्या. श्रीलंकेला पराभूत करत भारताने २८ वर्षानंतर विश्वचषकावर आपले नाव कोरले होते. विश्वचषक विजेत्या संघाचा उपकर्णधार म्हणून सेहवागची देखील इतिहासात नोंद झाली.

विश्वचषकानंतर ही एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याचा फॉर्म तसाच राहिला. डिसेंबर २०११ मध्ये भारत दौऱ्यावर आलेल्या वेस्ट इंडिजविरुद्ध इंदोर येथे त्याने १४९ चेंडूत २१९ धावांची खेळी करत सचिन तेंडुलकरनंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा दुसरा खेळाडू होण्याचा मान मिळवला.

कारकीर्दीची अखेर

सेहवागच्या कारकिर्दीची अखेर जवळ आल्याची काही चिन्हे आता दिसत होती. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत तो सपशेल अपयशी ठरला. तो चष्मा लावून मैदानात उतरत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये देखील तो चाचपडू लागला. २०१२ ऑस्ट्रेलिया दौऱ्यात धोनी आणि सेहवागमध्ये वाद झाल्याचे वृत्त देखील आले. धोनीने वरिष्ठ खेळाडूंना आलटून पालटून संधी देण्याची योजना आखली आणि यात सेहवागचा समावेश होता.

भारतीय क्रिकेटमध्ये विराट कोहली, रोहित शर्मा तसेच शिखर धवन हे तरुण खेळाडू सलामीवीराच्या स्थानावर चांगली कामगिरी करत असल्याने सेहवाग गंभीर सारखे खेळाडू काहीसे मागे पडू लागले. या काळात सेहवाग आयपीएलमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करत होता. २०१४ आयपीएलमध्ये त्याने शतक देखील झळकावले. २०१५ विश्वचषकात संधी न मिळाल्याने तो काहीसा व्यथित झाला आणि ऑक्टोबर २०१५ मध्ये त्याने क्रिकेटला रामराम ठोकला.

पद्मश्री विरेंद्र सेहवाग

सेहवागने आपल्या कारकीर्दीत १०४ कसोटी खेळताना ४९.३४ च्या दिमाखदार सरासरीने ८,५८६ धावा काढल्या. यात २३ शतकांचा समावेश होता. भारतासाठी २५१ वनडे खेळत त्याने ८ हजार २७३ धावा देखील जमवल्या. टी-२० क्रिकेटमध्ये देखील त्याने महत्त्वपूर्ण योगदान दिले.

आपल्या क्रिकेट कारकिर्दी दरम्यान सेहवागला अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले. सन २००२ व २०१० मध्ये त्याला भारत सरकारकडून अनुक्रमे अर्जुन पुरस्कार व पद्मश्री देऊन सन्मानित करण्यात आले. सन २००७ मध्ये तो सर्वोत्कृष्ट भारतीय क्रिकेटपटू ठरला. सन २००८ आणि २००९ अशी सलग दोन वर्ष त्याला ‘विस्डेन क्रिकेटर ऑफ द इयर’ होण्याचा मान मिळाला. सन २०१० या वर्षीचा आयसीसी टेस्ट प्लेअर ऑफ द इयर पुरस्कार त्याला देण्यात आला.

कारकिर्दीचा सुरुवातीपासूनच बेजबाबदार असा शिक्का बसलेला सेहवाग १७ वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला. या काळात अनेकांनी त्याच्यावर टीका केली. अनेकांचे असे म्हणणे होते की, सेहवाग कसोटी क्रिकेटमध्ये टिकणार नाही. त्या सर्वांना उत्तर देत त्याने ८ हजार हून अधिक कसोटी धावा केल्या. अनेक विक्रमांचे इमले रचले. ज्या निर्भीडपणे त्याने मैदानावर कामगिरी केली तशीच, कामगिरी तो आता ट्विटरवर आणि समालोचन करत असताना करतो. आपली मते परखडपणे मांडण्यात तो अजिबात हयगय करत नाही.

भारतीय क्रिकेटमधील आतापर्यंतचा सर्वोत्तम सलामीवीर कोण? असा प्रश्न कोणत्याही भारतीय क्रिकेट चाहत्याला विचारला, तर अधिक वेळ न दवडता कोणीही पटकन ‘विरेंद्र सेहवाग’चे नाव घेईल, यातच सेहवागच्या कारकिर्दीचे खरे यश दिसून येते.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पाकिस्तानविरुद्ध रोहितने आखला तगडा प्लॅन, मोठ्या सामन्यापूर्वी करून टाकला खुलासा
गोष्ट एका क्रिकेटरची भाग ३: त्रिशतकाची भविष्यवाणी पदार्पणाआधीच करणारा विरेंद्र सेहवाग!


Next Post
Navjot Singh Sidhu

मराठीत माहिती- क्रिकेटर नवज्योत सिंग सिद्धू

Team-India

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी 'या' भारतीय खेळाडूने काढल्या खास आठवणी! म्हणाला, '...खरचं अंगावर शहारे आले होते'

Photo Courtesy: Twitter/ICC

सचिनची विकेट गेल्यावर सेहवाग अंपायर शेजारी जाऊन बसला, असे काय घडले होते बेंगलोर कसोटीत?

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143