---Advertisement---

श्रीलंकेच्या विश्वचषक विजयाचे नायक : अरविंदा डी सिल्वा

On: रविवार, ऑक्टोबर 17, 2021 8:16 PM
---Advertisement---

श्रीलंका जगाच्या नकाशावरील, एक चिमुकला देश.. भारतीय उपखंडातील या बेटसदृश्य देशाने, जेव्हापासून क्रिकेट खेळायला सुरवात केली, तेव्हापासून आपल्या झुंजार खेळाने, त्यांनी जागतिक क्रिकेटमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. श्रीलंकेने आत्तापर्यंत, क्रिकेटला असे काही खेळाडू दिले, ज्यांना हजारो युवा क्रिकेटपटू आपला आदर्श मानतात. दुलिप मेंडीस, अर्जुन रणतुंगा, सनथ जयसूर्या, माहेला जयवर्धने, कुमार संगकारा यांच्या बरोबरीने ज्या एका फलंदाजाला, श्रीलंकेचा सर्वोत्कृष्ट फलंदाज मानले जाते, ते म्हणजे अरविंदा डी सिल्वा.

कमी उंचीमुळे सहन करावा लागला त्रास

डि सिल्वा यांचा जन्म १७ ऑक्टोबर १९६५ ला श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे झाला. पिनाडूवागे अरविंदा डी सिल्वा असे त्यांचे पूर्ण नाव. लहानपणापासून डी सिल्वा यांची उंची इतर मुलांपेक्षा काहीशी कमी होती. त्यामुळे त्यांना, शाळेमध्ये प्रवेश घेण्यासाठी खूप अडचणी आल्या. सर्व शाळा त्यांना कमी वयाचा म्हणून, खालच्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी सांगत. शेवटी डी.एस. सेनानायके स्कूलमध्ये त्यांना प्रवेश मिळाला. याच, शाळेतून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. किशोरावस्थेत आले तरी, त्यांची उंची ५ फूट ३ इंच इतकीच होती. कमी उंची असली तरी, डी सिल्वा क्रिकेट अत्यंत दर्जेदार खेळत. फलंदाजीतील त्यांचे तंत्र, वाखाणण्याजोगे होते. त्यांचे फटके पाहून सर्वांच्या तोंडून कौतुकाचे शब्द बाहेर पडत.

निराशाजनक आंतरराष्ट्रीय पदार्पण

शालेय स्तरावर व स्थानिक क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केल्यानंतर, १९८३ मध्ये झिम्बाब्वे विरुद्ध श्रीलंकन बोर्ड इलेव्हनकडून खेळताना, त्यांनी प्रथमश्रेणी पदार्पण केले. या सामन्यात सहाव्या क्रमांकावर खेळताना, त्यांनी उपयोगी २६ धावांची खेळी केली. पुढच्या वर्षी मार्चमध्ये, श्रीलंकेच्या दौऱ्यावर आलेल्या, न्युझीलंड संघाविरुद्ध दुसऱ्या एकदिवसीय सामन्याद्वारे त्यांनी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. पहिल्या सामन्यात ते आठ धावांपेक्षा पुढे जाऊ शकले नाहीत. याच वर्षी ऑगस्टमध्ये त्यांना कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळाली. एकदिवसीय पदार्पणा प्रमाणेच, त्यांचे कसोटी पदार्पणदेखील निराशाजनक राहिले. पहिल्या कसोटीत ते दोन्ही डावात मिळून फक्त १९ धावा बनवू शकले.

पहिल्या काही सामन्यातील खराब कामगिरीनंतर, १९८५ मध्ये श्रीलंका दौ-यावर गेलेल्या भारतीय संघाविरुद्ध दुसऱ्या कसोटीच्या, दुसऱ्या डावात त्यांनी ७५ धावांची झुंजार खेळी करत, आपली क्षमता दाखवली. भारताविरुद्धच्या मालिकेनंतर, पाकिस्तान दौऱ्यावर त्यांनी दोन दमदार शतके झळकावत, मालिकावीराचा पुरस्कार आपल्या नावे केला. डी सिल्वा श्रीलंकेच्या, कसोटी संघातील एक महत्त्वपूर्ण खेळाडू बनले होते.

कसोटी क्रिकेटमध्ये जम बसवला असला तरी, एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्यांना मोठ्या खेळ्या करता येत नव्हत्या. एकदिवसीय पदार्पण करून, सात वर्षाहून अधिक काळ लोटला होता, तरी त्यांच्या नावे एकही ही शतक नव्हते. अखेरीस, १९९० मध्ये भारताविरुद्ध त्यांनी आपले पहिलेवहिले एकदिवसीय शतक पूर्ण केले. पुढील, न्यूझीलंड दौ-यातील कसोटीत, त्यांनी आपले पहिले द्विशतक साजरे केले. त्या दौऱ्यातील कामगिरीमुळे त्यांना श्रीलंका कसोटी संघाचे कर्णधारपद देण्यात आले. पुढील एका वर्षात, ते एकदिवसीय संघाचे कर्णधार देखील झाले होते.

कर्णधारपद नाही ठरले लाभदायक

कर्णधारपद डी सिल्वा यांना तितकेसे लाभकारक ठरले नाही. ऑस्ट्रेलियात झालेल्या १९९२ क्रिकेट विश्वचषकात श्रीलंकेची कामगिरी अत्यंत सुमार दर्जाची राहिली. श्रीलंकेला ८ सामन्यातील अवघे दोन सामने जिंकण्यात यश आले. डी सिल्वा यांची वैयक्तिक कामगिरी देखील चांगली झाली नाही. यामुळे डी सिल्वा यांनी कर्णधारपदाचा राजीनामा दिला आणि खेळाडू म्हणून चांगली कामगिरी करण्यासाठी प्रयत्न करू लागले. कर्णधारपदाच्या दबावातून मुक्त झाल्यानंतर, डी सिल्वा पुन्हा आपल्या जुन्या शैलीत खेळू लागले. त्यांनी अनेक मोठ्या खेळ्या करायला सुरुवात केली.

स्वप्नवत १९९६ क्रिकेट विश्वचषक

डी सिल्वा यांच्या कारकिर्दीतील, सर्वांच्च क्षण आला तो म्हणजे १९९६ चा क्रिकेट विश्वचषक. सुरक्षेच्या कारणास्तव ऑस्ट्रेलिया व वेस्ट इंडीजने श्रीलंकेत सामने खेळण्यास नकार दिल्याने त्या सामन्यांतील प्रत्येकी दोन गुण श्रीलंकेला देण्यात आले. केनिया व झिम्बाब्वेवर मात करत, श्रीलंकेने उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.

खरंतर, इतर संघांच्या तुलनेत श्रीलंकेचा संघ काहीसा कमजोर भासत होता. मात्र, अर्जुन रणतुंगा यांच्या धडाकेबाज कप्तानीने श्रीलंका संघात नवा जोश भरला. जयसूर्या, मुरलीधरन, चामिंडा वास, अरविंदा डी सिल्वा या सर्व खेळाडूंनी रणतुंगा यांना साथ देत विश्वचषक गाजवला.

डी सिल्वा यांच्यासाठी हा विश्वचषक न विसरण्यासारखा राहिला. झिम्बाब्वेच्या साखळी सामन्यात ९१ तर केनिया विरुद्ध १४५ धावांची खेळी करत त्यांनी संघाला दोन विजय मिळवून दिले. उपांत्यपूर्व फेरीत ते काही खास करू शकले नाहीत. तरीही श्रीलंकेने उपांत्य फेरीत धडक मारली. क्रिकेट इतिहासातील सर्वात लाजिरवाण्या सामन्यांपैकी एक असलेल्या इडन गार्डन्सवरील वादग्रस्त उपांत्य सामन्यात, त्यांनी श्रीलंकेसाठी महत्वपूर्ण ६६ धावांची खेळी केली होती. गोलंदाजीतही त्यांनी एक बळी मिळवला होता. भारताचा पराभव समोर दिसू लागल्यानंतर, भारतीय प्रेक्षकांनी गोंधळ घातल्याने श्रीलंकेला विजयी घोषित करण्यात आले. कोणाच्याही ध्यानी-मनी नसताना, श्रीलंकेच्या संघाने प्रथमच विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली होती. अंतिम फेरीत, श्रीलंकेचा सामना होता मजबूत ऑस्ट्रेलियाच्या संघाविरुद्ध.

अंतिम सामना एकतर्फी होईल व ऑस्ट्रेलिया विजय संपादन करेल, असा अंदाज बऱ्याच जणांनी लावला होता. मात्र, अंतिम सामन्यात काही औरच घडले. श्रीलंकेच्या खेळाडूंनी प्राणपणाने खेळायला सुरुवात केली. अरविंदा डी सिल्वा यांनी आपला सर्वोत्तम खेळ, जणूकाही या अंतिम सामन्यासाठी राखून ठेवला होता. डी सिल्वा यांनी ९ षटके गोलंदाजी करताना, ४२ धावा देत ऑस्ट्रेलियन कर्णधार मार्क टेलर, रिकी पॉंटिंग व इयान हिली यांना तंबूचा रस्ता दाखवला. ऑस्ट्रेलियाचा डाव २४१ धावांवर मर्यादित राहिला.

प्रत्युत्तरात, संपूर्ण स्पर्धेत तुफान फॉर्ममध्ये असलेली श्रीलंकेची सलामी जोडी अवघ्या २३ धावांत माघारी परतली. डी सिल्वा यांनी असांका गुरूसिम्हा यांच्यासमवेत १२५ तर कर्णधार रणतुंगा यांच्यासह ९७ धावांची ‘मॅच विनिंग भागीदारी करत श्रीलंकेला पहिला विश्वचषक मिळवून दिला. डी सिल्वा १०७ धावांवर नाबाद राहिले. अंतिम सामन्याचे सामनावीर म्हणून अर्थातच, डी सिल्वा यांचीच निवड झाली. संपूर्ण विश्वचषकात डी सिल्वा यांनी अक्षरशः कहर केला. सहा सामन्यात यांच्या नावे ४४८ धावा जमा होत्या. यात दोन शतके व दोन यांचा समावेश होता. संपूर्ण स्पर्धेत ते चार वेळा सामनावीर निवडले गेले. याच वर्षी, त्यांना ‘विस्डेन क्रिकेटर ऑफ द इयर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

विश्वचषकानंतर, डी सिल्वा यांच्या बॅटला आणखी धार चढली. १९९७ या वर्षात त्यांनी सात शतके झळकावली. ज्यात एकदाही श्रीलंकेला पराभवाचा सामना करावा लागला नाही. पाकिस्तान विरुद्ध कसोटीत, त्यांनी दोन्ही डावांत नाबाद शतके झळकावली. अशी कामगिरी करणारे ते जगातील पहिले क्रिकेटपटू होते.

बॅडपॅच आणि कारकिर्दीची अखेर

डी सिल्वा यांच्या कारकिर्दीतील बॅडपॅच १९९९ पासून सुरु झाला. गतविजेत्या श्रीलंकेला १९९९ विश्वचषकातील साखळी फेरीत गाशा गुंडाळावा लागला. डी सिल्वा यांच्या बॅटमधून अभावाने धावा निघत. अखेरीस, २००२ मध्ये बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर, त्यांनी कसोटी क्रिकेटमधून संन्यास घेतला. आपल्या अखेरच्या कसोटी देखील त्यांनी दिमाखदार द्विशतक झळकावत, कसोटी क्रिकेटला अलविदा केला. त्यांचे पुढील लक्ष, २००३ क्रिकेट विश्वचषक खेळण्याचे होते.

आपला अखेरचा विश्वचषक खेळत असलेले, डी सिल्वा या स्पर्धेत तशी कामगिरी करू शकले नाहीत, जशी क्रिकेटचाहत्यांना अपेक्षा होती. तरीही, संघाला ज्यावेळी त्यांची गरज होती, त्यावेळी त्यांनी जबाबदारी घेत काही चांगल्या खेळ्या केल्या. श्रीलंकेला उपांत्य फेरीत नेण्यामध्ये, डी सिल्वा यांनी खारीचा वाटा उचलला होता. उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागल्यानंतर, डी सिल्वा यांनी सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.

अरविंदा डी सिल्वा यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी तब्बल २० वर्ष दिली. या काळात त्यांनी ९३ कसोटीत ६,३६१ धावा काढताना, ४२.९७ ची लाजवाब सरासरी राखली. यात २० शतकांचा समावेश आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये, त्यांच्या नावे ३०८ सामन्यात ९,२८४ धावा आहेत. सोबतच, त्यांनी १०६ एकदिवसीय बळी मिळवत, आपल्या अष्टपैलू गुणांचे प्रदर्शन केले.

अरविंद डिसिल्वा खऱ्या अर्थाने, श्रीलंकन क्रिकेट मधील एक मानाचे पान आहेत. ज्यांच्या योगदानाला आंतरराष्ट्रीय व श्रीलंकन क्रिकेट कधीही विसरू शकणार नाही.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---