२०१८ चा एकोणीस वर्षाखालील मुलांचा क्रिकेट विश्वचषक हा भारतीय क्रिकेटच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण ठरला. तसे पाहिले तर याआधी, एकोणीस वर्षाखालील विश्वचषकातून भारताला बरेच सितारे मिळाले. भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक असलेला विराट कोहली, दिग्गज अष्टपैलू युवराज सिंह व आतापर्यंतचा भारताचा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक मोहम्मद कैफ हे याच विश्वचषकांत दिमाखदार कामगिरी करून पुढे आले. शिखर धवन, मनीष पांडे, रवींद्र जडेजा, चेतेश्वर पुजारा, श्रेयस अय्यर, कुलदीप यादव ही अजून काही नावे युवा विश्वचषक गाजवून सध्या भारतीय संघाचे सदस्य आहेत.
२०१८ च्या युवा विश्वचषकासाठी गेलेल्या त्या संघाने विश्वचषक जिंकला आणि भारतीय क्रिकेटला भविष्यातील विश्वसनीय खेळाडू दिले. पृथ्वी शॉ, शुबमन गिल यांनी भारतीय संघात पदार्पण केले आहे तर शिवम मावी, कमलेश नागरकोटी हे लवकरच भारतीय संघात दिसू शकतात. रियान पराग व अभिषेक शर्मा हे अष्टपैलू खेळाडू देशांतर्गत क्रिकेट गाजवत आहेत. या सर्वांसोबतच, एका खेळाडूने भारताला विश्वचषक जिंकून देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. त्याच्या त्या कामगिरीचे तितकेसे श्रेय मिळाले नाही. तो युवा अष्टपैलू खेळाडू म्हणजे झारखंडचा अनुकूल रॉय.
तसं तर, अनुकूलचा जन्म बिहारमधील समस्तीपुरचा. त्याने आठवीपर्यंतचे शिक्षण देखील समस्तीपुरच्या डीएवी स्कूलमध्ये घेतले. अनुकूलने २००५ पासून क्रिकेट खेळायला सुरुवात केली. व्यवसायाने वकील असलेले अनुकुलचे वडील सुधाकर यांनी त्याला स्थानिक एवरग्रीन क्रिकेट अकादमीत दाखल केले. समस्तीपुरमधील पटेल स्टेडियम अनुकूलचे दुसरे घर झाले होते. इतर मुले शाळेत जात असताना अनुकूल मैदानावर घाम गाळत. प्रशिक्षक ब्रिजेश झा यांनी त्याच्यावर खास लक्ष दिले होते. २००८ मध्ये अनुकूलची निवड विनू मंकड ट्रॉफीसाठी बिहारच्या संघात झाली. २००९ मध्ये त्याची निवड पुन्हा एकदा बिहारच्या १४ वर्षाखालील संघात झाली. दुर्दैवाने, त्यावर्षी बिहार क्रिकेट संघटनेला निलंबित करण्यात आल्याने तो बिहारसाठी क्रिकेट खेळू शकला नाही.
बिहारकडून कारकीर्द होणार नाही हे लक्षात आल्यावर, अनुकुलच्या वडिलांनी त्याला जमशेदपूरच्या निर्मल महतो अकादमीत दाखल केले. अनुकूलची कारकीर्द व भविष्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा ठरला. २०१२ मध्ये झारखंडला आलेल्या अनुकूलने, २०१४ मध्ये सरायकेला-खरसावा जिल्ह्याच्या १६ वर्षाखालील संघात आपली जागा बनवली. पुढच्या वर्षी, सिंहभूम जिल्ह्याच्या संघात त्याची निवड झाली. आपल्या दमदार कामगिरीच्या बळावर, त्याला झारखंडच्या १६ वर्षाखालील व १९ वर्षाखालील संघात निवडले गेले. पुढे, १९ वर्षाखालील संघाचा विराट सिंह वरिष्ठ संघात दाखल झाल्याने, झारखंडच्या १९ वर्षाखालील संघाचे कर्णधारपद त्यांच्याकडे सोपविण्यात आले.
झारखंडच्या एकोणीस वर्षाखालील संघात असताना अनुकूलने आपल्या फिरकी गोलंदाजी आणि खालच्या स्थानावर येऊन केलेल्या फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले. यामुळेच वेगवेगळ्या दौर्यांसाठी निवडलेल्या एकोणीस वर्षांखालील भारतीय संघात त्याला स्थान मिळाले. २०१७ च्या सुरुवातीपासूनच तो भारताच्या एकोणीस वर्षाखालील संघाचा नियमित सदस्य झाला. दुखापतीमुळे अनुकूल युवा आशिया चषक क्रिकेट स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतरही निवडकर्त्यांनी त्याच्यावर विश्वास दाखवत, २०१८ एकोणीस वर्षांखालील विश्वचषकासाठी भारतीय संघात स्थान दिले.
विश्वचषकात त्याने ६ सामने खेळताना, ९.७ च्या सरासरीने १४ बळी आपल्या नावे केले. पापुआ न्यू गिनी विरुद्धच्या सामन्यात १४ धावा देऊन पाच बळी घेत त्याने सर्वोत्कृष्ट कामगिरी नोंदवली. तो स्पर्धेत भारतातर्फे सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला. विश्वचषक सुरू असतानाच, २०१८ आयपीएलसाठी झालेल्या लिलावात मुंबई इंडियन्सने २० लाख रुपयांच्या किमती त्याला आपल्या संघात सामील केले.
२०१८ पासून देशांतर्गत क्रिकेट खेळत असलेल्या अनुकूलने १३ प्रथमश्रेणी सामन्यात ४०, २२ लिस्ट ए सामन्यात २७ व २१ टी२० सामन्यात १२ बळी मिळवले आहेत. किफायतशीर गोलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या अनुकूलने अनेक वेळा गरज असताना फलंदाजीने देखील संघासाठी योगदान दिले आहे.
पहिल्या आयपीएलमध्ये एकही सामना खेळायला न मिळाल्यानंतर, २०१९ आयपीएलमध्ये त्याने चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध पदार्पण केले. त्या एकमेव सामन्यात त्याला ध्रुव शोरीचा बळी मिळविण्यात यश आले. आजपासून (१९ सप्टेंबर) युएईत सुरु होणाऱ्या आयपीएलमध्ये तो मुंबईसाठी भरीव कामगिरी करू इच्छित आहे.
वाचा-
-पहिलाच सामना जिंकायला धोनी ‘या’ ११ खेळाडूंना घेऊन उतरणार मैदानात
-आयपीएल २०२०: सर्व ८ संघांच्या खेळाडूंची संपूर्ण यादी
-‘उजव्या हाताचा रिषभ पंत’ अशी ओळख असलेला मोहरा आयपीएल गाजवणार