आज आयपीएलच्या तेराव्या हंगामाचा शुभारंभ झाला. आयपीएलमधील पारंपारिक प्रतिस्पर्धी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्या सामन्याने स्पर्धा सुरू झाली. गेल्या हंगामात अंतिम अकरामध्ये असलेले काही खेळाडू यावर्षी दोन्ही संघात दिसले नाहीत. चेन्नईचा हुकमी एक्का सुरेश रैना स्पर्धेपूर्वी बाहेर गेला, तर हरभजनने वैयक्तिक कारणाने स्पर्धेतून माघार घेतली. मुंबईसाठी गेली अकरा वर्षे खेळणारा मलिंगा उपलब्ध नाही, तर गेल्या वर्षी प्रत्येक सामना खेळलेला ईशान किशन पहिल्या सामन्यासाठी मुंबईच्या संघात नाही. ईशान नसला तरी एका खेळाडूने दोन वर्षानंतर पुन्हा मुंबईमध्ये परतत, अंतिम अकरामध्ये स्थान मिळवले. हा मुंबईच्या संघात पुन्हा दाखल झालेला खेळाडू म्हणजे मधल्या फळीतील फलंदाज सौरभ तिवारी.
सौरभ तिवारी, भारतीय क्रिकेटमधील त्या एकोणीस वर्षाखालील खेळाडूंच्या बॅचमधला खेळाडू आहे, ज्या बॅचने भारतीय संघाला सर्वाधिक आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू दिले. २००८ मध्ये भारताचे जिंकलेल्या, एकोणीस वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक संघातील विराट कोहली, मनीष पांडे, रवींद्र जडेजा, सिद्धार्थ कौल, अभिनव मुकुंद व सौरभ तिवारी हे आंतरराष्ट्रीय खेळाडू झाले. विश्वचषक विजेता असला तरी सौरभला पहिली ओळख मिळाली ती २०१० आयपीएलमध्ये.
खरंतर, सौरभची निवड पहिल्या आयपीएल वेळीच मुंबईच्या संघात झाली होती. पहिल्या दोन हंगामात मिळून अवघे, चार सामने त्याला खेळायला मिळाले. आयपीएलच्या तिसर्या हंगामात सौरभला खऱ्या अर्थाने कौतुक आणि ओळख दोन्ही मिळाले. हा तोच हंगाम होता, ज्यामध्ये मुंबईने सौरभ, अंबाती रायडू व आदित्य तरे हे युवा सितारे जगासमोर आणले.
सौरभने जबरदस्त फलंदाजीचे प्रदर्शन करत १६ सामन्यात, ४१९ धावा तडकावल्या. त्या हंगामात मुंबईला अंतिम फेरीत नेण्यात सचिन व मलिंगा या वरिष्ठ खेळाडूंइतकेच सौरभ, रायडू व पोलार्ड या तरुण खेळाडूंचे योगदान होते. सौरभची कामगिरी या सर्वांच्यात देखणी असल्याने, २०१० च्या आशिया चषकासाठी त्याची भारतीय संघात निवड झाली. त्या स्पर्धेत त्याला संधी मिळाली नसली तरी ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत त्याने भारतीय संघासाठी पदार्पण केले.
आयपीएल गाजवण्याचा फायदा त्याला पुढच्या वर्षी आयपीएल लिलावात झाला. त्यावेळी, विजय मल्ल्या मालक असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने तब्बल सात कोटी रुपयांची बोली लावत त्याला आपल्यात ताफ्या दाखल करून घेतले. आरसीबीमध्ये जाणे त्याला तितकेसे लाभदायी ठरले नाही. आरसीबीकडून तीन हंगाम खेळूनही त्याला प्रभावशाली कामगिरी करता आली नाही. परिणामी, २०१४ मध्ये सात कोटीवरून त्याची किंमत ७० लाखांपर्यंत घसरली. यावेळी तो दिल्ली डेअरडेव्हिल्स संघात सहभागी झाला, दोन वर्षे दिल्लीकडून खेळताना, तो फ्लॉप खेळाडूंच्या श्रेणीत सामील झाला. २०१६ मध्ये आयपीएलमध्ये नव्याने दाखल झालेल्या, रायझिंग पुणे सुपरजायंटने तीस लाखांची बोली लावत त्याला संघात निवडले. त्या हंगामातील ५ सामन्यात दोन अर्धशतकांसह १७० धावा त्याने आपल्या नावे केल्या.
पुण्याच्या संघाने पुढील हंगामासाठी त्याला कायम ठेवले नाही आणि सौरभच्या पूर्वाश्रमीच्या संघाने म्हणजेच मुंबई इंडियन्सने त्याला संधी दिली. अवघा एक सामना खेळत त्याने दमदार अर्धशतक ठोकले. त्या आयपीएलनंतर मात्र तो, फार्मशी झगडू लागला, देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याची म्हणावी तशी कामगिरी झाली नाही. तंदुरुस्ती आधीसारखी राहिली नव्हती. याचा जो व्हायचा तोच परिणाम झाला. पुढील दोन हंगामात त्याला कोणत्याही संघाने खरेदी केले नाही. देशांतर्गत क्रिकेटमध्ये झारखंडचे नेतृत्व करताना, त्याने चमकदार कामगिरी करत, आपल्यात अजून बरेचशे दर्जेदार क्रिकेट शिल्लक असल्याचे दाखवून दिले. २०२० आयपीएलसाठीच्या लिलावात पुन्हा एकदा ज्या मुंबई इंडियन्सने त्याला ओळख मिळवून दिली, त्याच मुंबई इंडियन्सने पुन्हा त्याला आपल्या संघात स्थान दिले.
आज तेराव्या आयपीएलचा शुभारंभ करताना मुंबई व्यवस्थापनाने त्याला पहिल्या सामन्यात संधी दिली. संघाच्या विश्वासाला तडा न जाऊ देता सौरभने पहिल्याच सामन्यात ३१ चेंडूत ३ चौकार व एका षटकारांच्या साह्याने आक्रमक ४२ धावा फटकावल्या. सौरभसारख्या अनुभवी खेळाडूचा असाच फॉर्म, स्पर्धेदरम्यान राहिल्यास मुंबईला पाचवे विजेतेपद मिळण्यास मदत होईल.
वाचा-
-मुंबई इंडियन्सच्या फिरकी आक्रमणाचा नवा स्तंभ
-युवराजशी फ्लिंटॉफने पंगा घेतला, पण ब्रॉडने किंमत चुकवली