कसोटी क्रिकेट म्हणजे खरे क्रिकेट !
असे कितीतरी माजी खेळाडू व समीक्षक ठासून सांगत असतात. कसोटी क्रिकेटमध्ये खेळाडूंची एकाग्रता, समर्पण, कौशल्य, मानसिक व शारीरिक क्षमता या सर्वांचा कस लागतो म्हणून कसोटी क्रिकेट सर्वात्तम आहे, असे या लोकांचे म्हणणे असते. बिशनसिंह बेदी यांच्यासारखे दिग्गज गोलंदाज तर, ” टी२० क्रिकेट म्हणजे क्रिकेटचा सर्वात किळसवाणा प्रकार आहे.” असे जगजाहीरपणे म्हणतात. पण, आजही फलंदाजी करताना, जो फलंदाज खेळपट्टीवर नांगर टाकून उभा राहतो, त्या फलंदाजांचा चाहतावर्ग काही औरच.
भारतीय क्रिकेट बाबतीत सांगायचे झाले तर विजय मांजरेकर, सुनील गावसकर, राहुल द्रविड व चेतेश्वर पुजारा अशी काही नावे समोर येतात, जे प्रतिस्पर्धी गोलंदाजांना अक्षरशः रडकुंडीला आणत. आपल्या भक्कम बचावाने हे फलंदाज, दिवस-दिवस खेळपट्टीवर उभे राहत. द्रविडची २७० धावांची ऐतिहासिक खेळी तर गंभीरची नेपियर येथील कसोटीत केलेली दीडशतकी खेळी क्रिकेट चाहते कधीही विसरू शकत नाहीत. अशीच एक मॅरेथॉन द्विशतकी खेळी, १९८३ मध्ये खेळली गेली होती. जालंदर येथील कसोटीत पाकिस्तान विरुद्ध तब्बल ११ तास फलंदाजी करत, दुहेरी शतक झळकावणारे ते फलंदाज होते अंशुमन गायकवाड.
सप्टेंबर १९८३ मध्ये पाकिस्तान संघात तीन कसोटी खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर आला होता. अवघ्या काही महिन्यांपूर्वीच भारताने विश्वचषक जिंकला असल्याने, क्रिकेट बद्दलचे प्रेम दुपटीने वाढले होते. अशातच, भारत-पाकिस्तान मालिका म्हणजे दुग्धशर्करा योग !
पाकिस्तान संघात इम्रान खान, सर्फराज नवाज आणि अब्दुल कादिर यांचा समावेश नव्हता. त्यांची गोलंदाजी बर्यापैकी कमकुवत झाली होती, परंतु कर्णधार झहीर अब्बास, जावेद मियांदाद, मोहसीन खान, मुदस्सर नजर, सलीम मलिक, वसीम राजा आणि वसीम बारी या खेळाडूंचा समावेश फलंदाजी क्रमात होता.
बंगळुरू येथे पावसाने प्रभावित झालेला पहिला कसोटी सामना अनिर्णित राहिला आणि दोन्ही संघ दुसर्या कसोटीसाठी जालंधर येथे दाखल झाले. कपिल देव यांनी नाणेफेक जिंकून पाकिस्तानला फलंदाजीचे आमंत्रण दिले. पाकिस्तानने पहिल्या डावात वसीम राजा यांच्या १२५ धावांच्या जोरावर ३३७ धावा केल्या. भारतातर्फे कर्णधार कपिल देव यांनी ८० धावा देत, चार बळी टिपले.
भारतीय संघ पहिल्या डावात, पाकिस्तानच्या ३३७ धावा पार करून, आघाडी घेण्यासाठी मैदानात उतरला. पहिल्या कसोटीत पदार्पण केलेल्या हाफिज यांनी सुनील गावसकर व मोहिंदर अमरनाथ यांना बाद करत, भारताला सुरुवातीचे धक्के दिले. पाकिस्तान वरचढ होत आहे असे वाटत असतानाच, पाऊस आल्याने सामना थांबवण्यात आला. तिसऱ्या दिवशी देखील, पाऊस असल्याने खेळ होऊ शकला नाही.
त्यानंतर, विश्रांतीचा दिवस असल्याने आयोजकांनी उभय संघांना सामना खेळण्याची विनंती केली. मात्र, पाकिस्तानी कर्णधार झहीर अब्बास यांनी ती मागणी धुडकावून लावली. प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत आलेल्या पाकिस्तानला, सामना हरायची भीती होती.
सामन्याचे दोन दिवस शिल्लक होते. पाकिस्तान संघ सुस्थितीत होता. पण, पाकिस्तानच्या गचाळ क्षेत्ररक्षणाने व अंशुमन गायकवाड यांच्या संयमी फलंदाजीने पाकिस्तानची सामन्यावरील पकड ढिली होत गेली. गायकवाड यांच्यासाठी मागील दोन वर्ष अत्यंत जिकिरीचे गेली होती. धावा बनत नव्हत्या म्हणून, त्यांनी देशांतर्गत क्रिकेट खेळले व भारतीय संघात पुनरागमन केले.
सामना अनिर्णित राहणार होता हे सर्वांना माहीत होते. गायकवाड यांच्यासमोर अन्य भारतीय फलंदाज थोड्या अंतराने पॅव्हेलियनमध्ये परतत होते, पण सलामीला आलेल्या गायकवाड यांनी या सर्व फलंदाजांसह छोट्या छोट्या भागीदारी रचत डाव पुढे नेला. आधी संदीप पाटील यांच्यासमवेत ५८ तर रवी शास्त्री यांच्या समवेत ७८ धावांची भागीदारी त्यांनी केली. चौथ्या दिवशी भारताने ८५ षटके फलंदाजी करत अवघ्या १५४ धावा काढल्या. भारताची धावसंख्या होती २०१ तर गायकवाड हे वैयक्तिक १२१ धावांवर नाबाद होते.
शेवटच्या दिवशी रॉजर बिन्नी यांच्या साथीने त्यांनी १२१ धावा जोडल्या. बिन्नी यांनी शानदार ५४ धावांची अर्धशतकी खेळी केली. कर्णधार कपिल देव जास्त काळ टिकू शकले नाहीत. आता सर्वांची नजर, गायकवाड यांच्यावर होती. त्यांनी चंदू बोर्डे यांच्या पाकिस्तान विरुद्धचा सर्वाधिक वैयक्तिक धावांचा विक्रम मागे टाकला. बोर्डे यांनी १९६१ मध्ये मद्रासच्या मैदानावर १७७ धावांची खेळी केली होती.
सर्वांचे लक्ष गायकवाड यांच्या द्विशतकाकडे लागले होते. अखेरीस, गायकवाड यांनी वैयक्तिक २०० धावांचा टप्पा पार केला. आकडेतज्ञांनी, गायकवाड यांची खेळी भारतीय प्रथमश्रेणी क्रिकेटमधील सर्वात धीमी खेळी असल्याचे जाहीर केले. तत्पूर्वी, नवाब अली पतौडी यांनी दक्षिण विभागाकडून खेळताना पश्चिम विभागाविरूद्ध ६२२ मिनिटे फलंदाजी करत २०० धावा काढल्या होत्या.
गायकवाड यांनी आपले द्विशतक पूर्ण करण्यासाठी, ४२६ चेंडू खेळत, ६५२ मिनिटे फलंदाजी केली. गायकवाड यांनी एकूण ६७१ मिनिटे फलंदाजी करून, २०१ धावा काढल्या. भारताकडून आठव्या गड्याच्या रूपाने ते बाद झाले. गायकवाड यांची खेळी, क्रिकेट इतिहासातील सातव्या क्रमांकाची सर्वात दीर्घ खेळी होती.
भारताने सर्वबाद ३७४ धावा उभारल्या. गायकवाड यांच्या द्विशतकामुळे भारताला ३७ धावांची आघाडी मिळाली. त्या डावात, भारताचे सहा फलंदाज दुहेरी धावसंख्या गाठू शकले नव्हते. पाकिस्तानने दुसऱ्या डावात बिनबाद १६ धावा करत, सामना अनिर्णित संपवला.
गायकवाड यांच्या त्या खेळीचे भरपूर कौतुक झाले. पण, भारतीय क्रिकेट चाहते त्या खेळी सोबतच, पाकिस्तानी क्षेत्ररक्षकांना खूप दमवले म्हणून खुश होते.
वाचा-
-परिस्थितीने घडवलेला जगातील सर्वोत्तम ऑफस्पिनर, ज्याचा इकॉनॉमी रेट होता २ पेक्षाही कमी