भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात ७ विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. पहिल्या सामन्यात भारतीय संघाने मोठी धावसंख्या उभी केली होती, पण आफ्रिकी फलंदाज देखील गोलंदाजांवर भारी पडले आणि त्यांनी सामना जिंकला. रविवारी (१२ जून) उभय संघात दुसरा सामना खेळला जाणार आहे. पहिल्या सामन्यात केलेल्या चुका भारतीय संघ दुसऱ्या सामन्यात सुधारण्याच्या प्रयत्नात असेल.
मालिकेतील दुसरा सामना कटकमध्ये खेळला जाणार आहे. भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) आणि गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांब्रे (Paras Mhambrey) यांनी दुसऱ्या सामन्याच्या आधी खेळाडूंसोबत सरावसत्रात काही वेळ घालवला. सराव सत्रात या दोघा प्रशिक्षकांनी खासकरून भुवनेश्वर कुमार आणि आवेश खानसोबत जास्त वेळ घालवला. डेविड मिलर पहिल्या सामन्यात भारतीय गोलंदाजांवर भारी पडला होता, त्याला लवकर बाद करण्यासाठी संघाने नक्कीच काहीतरी रणनीती आखली असावी.
दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाला कराव्या लागतील ‘या’ सुधारणा
१. गोलंदाजांना जास्त यॉर्कर टाकावे लागतील
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात भारतीय गोलंदाजांनी खूपच कमी यॉर्कर चेंडू टाकले. हर्षल पटेलने यॉर्कर टाकण्याच्या प्रयत्नात फुल-टॉस चेंडू टाकला. दुसरीकडे आवेश खान आणि भुवनेश्वर कुमार यांनीही यॉर्कर कमी टाकले. त्यामुळे प्रशिक्षांची नक्कीच इच्छा असेल की, गोलंदाजांनी या सामन्यात यॉर्कर चेंडू जास्त टाकावेत.