आयपीएल २०२२ (IPL 2022) हंगाम थोड्याच दिवसांमध्ये सुरू होणार आहे. परंतु स्पर्धा सुरू होण्याआधीच इंग्लंडचा सलामीवीर फलंदाज जेसन रॉय याने स्वतःचे नाव मागे घेतले आहे. त्याच्या या निर्णयामुळे स्पर्धेत नव्याने सहभागी होणऱ्या गुजरात टायटन्स फ्रेंचायझीला मोठा झटका लागला आहे. कारण, गुजरातने त्याला मेगा लिलावात दोन कोटी रुपयांमध्ये खरेदी केले होते. आता संघात त्याची जागा कोण घेणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
जेसन रॉय एका आक्रमक सलामीवीराची भूमिका पार पाडण्यासाठी उत्तम खेळाडू होता. मात्र, त्याने माघार घेतल्यानंतरही गुजरात टायटन्सकडे असे अनेक पर्याय आहेत, जे रॉयची जागा घेऊ शकतात. आयपीएल मेगा लिलावात अनेक भारतीय आणि विदेशी खेळाडू आहेत, जे रॉयची जागा घेऊ शकतात. आपण या लेखात तीन अशा खेळाडूंवर नजर टाकणार आहोत, जे गुजरात टायटन्ससाठी रॉयची जागा भरून काढतील.
१. एरॉन फिंच (Aaron Finch) –
जेसन रॉयने माघार घेतल्यानंतर गुजरात टायटन्सचा प्रयत्न हाच असेल की, त्याच्या तोडीस तोड अशा खेळाडूला संघात सामील केले जावे. आयपीएलचा आगामी हंगाम सुरू होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियन कर्णधार एरॉन फिंचला फ्रेंचायझी स्वतःसोबत जोडू शकते. फिंचला जर गुजरातने करारवद्ध केले, तर तो पूर्ण हंगामासाठी संघासोबत उपलब्ध असेल. परंतु ऑस्ट्रेलिया संघ सध्या पाकिस्तान दौऱ्यावर आहे आणि तो ५ एप्रिलपर्यंत त्याच ठिकाणी असणार आहे. अशात फिंच पहिल्या काही सामन्यांना मुकू शकतो. मागच्या वर्षी त्याच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाने टी२० विश्वचषक जिंकला आहे आणि त्याच्याकडे कर्णधारपदाचा चांगला अनुभव आहे. सलामीवीराची भूमिकाही तो चांगल्या प्रकारे पार पाडू शकतो.
२. ख्रिस लिन (Chris Lynn) –
ऑस्ट्रेलियाचा दमदार फलंदाज ख्रिस लिनचा पर्यायही गुजरात टायटन्सकडे आहे. मागच्या हंगामात लिन मुंबई इंडियन्समध्ये सहभागी होता. मात्र, फ्रेंचायझीने त्याला बरोबर संधी दिल्या नाहीत. मेगा लिलावात त्याने स्वतःची बेस प्राइस १.५ कोटी ठेवली होती, पण तो अनसोल्ड राहिला. अशात तो रॉयची जागा घेण्यासाठी एक चांगला खेळाडू ठरू शकतो. सलामीवीराच्या रूपात तो वेगात धावा करू शकतो, ज्याची प्रत्येक आयपीएल फ्रेंचायझीला गरज आहे. आगामी हंगाम सुरू होण्यापूर्वी गुजरात टायटन्स संघ ख्रिस लिनला संघात सामील करू शकतो. तो पूर्ण हंगामासाठी उपलब्ध राहू शकतो.
३. ब्रँडन किंग (Brandon King)
या यादीत तिसरे आणि शेवटचे नाव आहे, वेस्ट इंडीजच्या ब्रँडन किंगचे. तो त्याच्या तुफानी फलंदाजीसाठी ओळखला जातो. तसे पाहिले तर, वेस्ट इंडीजचे सर्वाच फलंदाज दमदार खेळी करू शकतात. मात्र, किंग डावाची सुरुवात चांगल्या प्रकारे करू शकतो. आयपीएल मेगा लिलावातही त्याचा सहभाग होता, पण तो अनसोल्ड राहिला. आतापर्यंत त्याने जगभरातील अनेक टी२० लीगमध्ये सहभाग घेतला आहे. आणि हा अनुभव नक्कीच गुजरात टायटन्सच्या कामी येऊ शकतो. आगामी आयपीएल हंगाम सुरू होण्यापूर्वी ब्रँडन किंगशी संपर्क साधून गुजरात टायटन्स त्याला संघात सामील करू शकते.
महत्वाच्या बातम्या –
बीसीसीआय फिजिओ आणि ट्रेनर्सची नवी टीम बनवण्याच्या तयारीत, अनफिट क्रिकेटर्स निशाण्यावर!