भारतीय संघाचा विद्यमान कर्णधार रोहित शर्मा याची दुखापत सध्या चिंतेचा विषय बनला आहे. वॉर्नर पार्क स्टेडियम, सेंट किट्स येथे झालेला तिसरा टी२० सामना भारतीय संघाने ७ विकेट्सने जिंकला. या सामना विजयासह भारतीय संघाने ५ सामन्यांच्या टी२० मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. यानंतर उभय संघ मालिकेतील चौथा सामना खेळण्यासाठी शनिवारी (०६ ऑगस्ट) फ्लोरीडा येथे जमतील. परंतु भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा या सामन्यात खेळण्याच्या शक्यता फार कमी आहे.
तिसऱ्या टी२० सामन्यादरम्यान पाठीच्या दुखण्यामुळे रोहित (Rohit Sharma Injury) केवळ ५ चेंडू खेळून रिटायर्ड हर्ट होत मैदानाबाहेर गेला होता. या सामन्यानंतर त्याने आपल्याला आता चांगले वाटत असल्याचे सांगितले आहे. मात्र तो पुढील सामन्यासाठी उपलब्ध असेल की नाही?, याबाबत अद्याप कसलीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. अशात जर तो चौथ्या टी२० सामन्यासाठी अनुपलब्ध असल्यास भारतीय संघाकडून सूर्यकुमार यादवबरोबर सलामी कोण देणार? हा प्रश्न उपस्थित होतो.
या लेखात आपण अशा ३ खेळाडूंचा आढावा घेणार आहोत, जे रोहितच्या अनुपस्थितीत सलामीवीराची भूमिका बजावू शकतात.
इशान किशन-
भारताचा युवा यष्टीरक्षक फलंदाज इशान किशन याला सलामीला फलंदाजीला येत ताबडतोब फलंदाजी करण्यासाठी ओळखले जाते. त्याने बऱ्याच सामन्यांमध्ये सलामीला फलंदाजी करताना भारतीय संघाला चांगली सुरुवात करून दिली आहे. परंतु सध्या भारतीय संघात प्रयोग होत असल्याने इंग्लंडविरुद्ध इशानच्या जागी रिषभ पंतला सलामीला आजमावले गेले. त्यानंतर आता वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी२० मालिकेत ही भूमिका सूर्यकुमार यादव निभावताना दिसत आहे.
त्यामुळे अद्याप तरी चालू टी२० मालिकेत इशान सलामीला फलंदाजीला उतरलेला नाही. मात्र रोहितच्या अनुपस्थितीत त्याच्यासाठी सलामीला उतरण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो.
संजू सॅमसन-
संजू सॅमसनला अद्याप वेस्ट इंडिजविरुद्ध मर्यादित षटकांच्या मालिकेतील एकही सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही. त्याने मागील आयर्लंड दौऱ्यात प्रभावी फलंदाजी केली होती. अशात रोहितच्या अनुपस्थितीत त्याला सलामीला फलंदाजीची संधी मिळाल्यास, तो ही संधी हातून दवडू देणार नाही. सॅमसन मोठमोठे फटके मारण्यात पटाईत आहे. त्यामुळे भारताचे संघ व्यवस्थापनाही त्याच्यावर ही जबाबदारी सोपवू शकते.
रिषभ पंत-
भारतीय क्रिकेट संघाचा भावी कर्णधार म्हटला जाणारा रिषभ पंत त्याच्या विस्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याने इंग्लंडविरुद्धच्या टी२० मालिकेत सलामीला फलंदाजी केली होती. त्यामुळे रोहित संघात नसताना पुन्हा एकदा पंत सलामीवीराच्या भूमिकेत दिसू शकतो.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
INDvsBAR: ‘करा वा मरा’ लढतीसाठी भारत सज्ज, ‘या’ गोलंदाजाचे पुनरागमन; पाहा प्लेइंग इलेव्हन
CWG 2022 | ऑस्ट्रेलियाची उपांत्य फेरीत धडक, पाकिस्तान ४४ धावांनी पराभूत; स्पर्धेतूनही बाहेर