येत्या ऑक्टोबर महिन्यात भारतात टी-२० विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. या मोठ्या स्पर्धेपूर्वी भारतीय संघाने इंग्लंड संघाविरुद्ध ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळली होती. या मालिकेत भारतीय संघाने ३-२ ने विजय देखील मिळवला होता. टी -२० विश्वचषक स्पर्धेच्या दृष्टीने ही मालिका अत्यंत महत्त्वाची होती. त्यामुळे या मालिकेसाठी भारतीय संघात युवा खेळाडूंना संधी देण्यात आली होती.
युवा फलंदाज इशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांनी आपल्या फलंदाजीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. तसेच भारतीय संघात ५ फिरकी गोलंदाज देखील आहेत, जे २०२१ टी२० विश्वचषकात मुख्य फिरकी गोलंदाजांच्या अनुपस्थितीत, बॅकअप फिरकी गोलंदाज म्हणून महत्वाची भूमिका बजावू शकतात.
१) अक्षर पटेल : अक्षर पटेलला,इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत संधी देण्यात आली होती. त्याने अवघ्या ३ सामन्यात तब्बल २७ गडी बाद केले होते. अक्षर गोलंदाजीसह फलंदाजीमध्येही मोठ मोठे फटके मारण्यात सक्षम आहे. त्याने भारतीय संघासाठी १२ टी-२० सामने खेळले आहेत. यात त्याला ९ गडी बाद करण्यात यश आले आहे. तसेच त्याने ९७ आयपीएल सामन्यात ८० गडी बाद केले आहेत. ही कामगिरी पाहता अक्षर देखील टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघासाठी महत्वाची भूमिका बजावू शकतो.
२) वरून चक्रवर्ती : युएईमध्ये झालेल्या आयपीएल २०२० स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या वरून चक्रवर्तीची ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्यासाठी निवड करण्यात आली होती. परंतु त्याला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली होती. तसेच इंग्लंड विरुद्ध पार पडलेल्या टी -२० मालिकेत देखील त्याला संघात स्थान देण्यात आले होते. परंतु फिटनेस टेस्ट पूर्ण करण्यास अपयशी ठरल्यामुळे त्याला संघाबाहेर करण्यात आले होते. वरूनने आयपीएल २०२० मध्ये १४ सामन्यात तब्बल १८ गडी बाद केले होते. त्यामुळे हा मिस्ट्री स्पिनर टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघासाठी महत्वाची भूमिका बजावू शकतो.
३) आर अश्विन : भारतीय संघाचा अनुभवी गोलंदाज आर अश्विन याने इंग्लंड विरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत ४ सामन्यात तब्बल ३२ गडी बाद केले होते. त्याला मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी मिळत नाही. परंतु त्याने आपल्या गोलंदाजीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. त्याने भारतीय संघासाठी एकूण ४६ टी-२० सामने खेळले आहेत. यात त्याने ५२ गडी बाद केले आहेत. यामुळे अश्विनला जर संधी मिळाली तर तो देखील विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघासाठी महत्वाची भूमिका बजावू शकतो.
४) राहुल तेवतीया : आयपीएल २०२० मधील राजस्थान रॉयल्स आणि किंग्स इलेव्हेन पंजाब संघामध्ये झालेला सामना सर्वांनाच आठवण असेल.राहुल तेवतीया ने पंजाब संघाच्या तोंडातील घास खेचून घेत सामना जिंकवुन दिला होता. त्याने एकाच षटकात ५ षटकार लगावले होते. तसेच त्याने आयपीएलमध्ये आतापर्यंत एकूण ३४ सामने खेळले आहेत. यात त्याला २४ गडी बाद करण्यात यश आले आहे. तो गोलंदाजीसह चौकार आणि षटकारांचा पाऊस देखील पाडू शकतो.याचा फायदा भारतीय संघाला टी -२० विश्वचषक स्पर्धेत होऊ शकतो.
५) राहुल चाहर : राहुल चाहर गेल्या काही सामन्यांपासून भारतीय संघाच्या विजयात महत्वाची भूमिका बजावत आहे. त्याने भारतीय संघासाठी आतापर्यंत एकूण ३ टी २० सामने खेळले आहेत. यात त्याला ३ गडी बाद करण्यात यश आले आहे. तसेच त्याने आयपीएलमध्ये एकूण ३१ सामने खेळले आहेत यात त्याला ३० गडी बाद करण्यात यश आले आहे. त्यामुळे राहुल चाहर देखील आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी महत्वाची भूमिका बजावू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या-
यालाच आम्ही सिंहाची भावना म्हणतो! ‘असे’ केले सीएसकेने सॅम करनच्या अविस्मरणीय खेळीचे कौतुक
“टीम इंडियात जागा मिळत नसताना सूर्यकुमारने स्वत:ला सांभाळले, म्हणून…” दिग्गजाचे मोठे भाष्य
राजस्थान रॉयल्ससाठी खुशखबर! आर्चरच्या हाताची झाली सर्जरी, आयपीएल २०२१ मध्ये खेळण्याची शक्यता





