---Advertisement---

‘या’ ५ क्रिकेटपटूंनी कधीच केले नाही दारूचे प्रमोशन; एकाचे संपूर्ण करियरमध्ये झाले होते मोठे नुकसान

---Advertisement---

क्रिकेट बोर्ड आणि फ्रंचायझीकडून मिळणारा पगार हा क्रिकेटपटूंच्या कमाईचा स्त्रोत आहेच. शिवाय ते अनेक प्रकारच्या जाहिरातींमधूनही कमाई करत असतात. यामध्ये खेळाडू बूट, घड्याळ, कार, खेळाच्या वस्तू, स्नॅक्स, ड्रिंक्स, इत्यादी प्रकारच्या गोष्टींचा प्रचार (प्रमोशन) करतात. अशाप्रकारे क्रिकेटपटूच नव्हे तर इतर खेळातील खेळाडूही जाहिरातींमधून कमाई करतात.

खरंतर क्रिकेटपटूंचे सोशल मीडियावर लाखो फॉलोवर्स असतात, जे त्यांना फॉलो करतात. जर आणखी थोडं मागे जाऊन पाहिलं, तर या क्रिकेटपटूंद्वारे अनेक वादग्रस्त जाहिराती शूट करण्यात आल्या आहेत. अनेक क्रिकेटपटू दारु किंवा तत्सम पदार्थांच्या जाहिरातींचा प्रचार करतात, तर काही क्रिकेटपटू असेही आहेत, ज्यांनी आतापर्यंत कधीही दारु किंवा तत्सम पदार्थांच्याच्या जाहिरातींचा प्रचार केलेला नाही.

चला तर मग जाणून घेऊया जगातील त्या निवडक क्रिकेटपटूंबद्दल, ज्यांनी कधीच दारु किंवा तत्सम पदार्थांच्या जाहिरातींचा प्रचार केलेला नाही.

दारु किंवा तत्सम पदार्थांच्या जाहिरातींचा प्रचार न करणारे ५ खेळाडू- 5 Players Never Promote Alcohol

१. सचिन तेंडुलकर

भारतीय संघाला जागतिक क्रिकेटमध्ये ओळख निर्माण करून देणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर अनेक ब्रँड्सचा ब्रँड एंबेसेडर असून त्याने आतापर्यंत अनेक प्रकारच्या जाहिरातींचे प्रमोशन केले आहे. परंतु त्याने आतापर्यंत कधीच दारु किंवा तत्सम पदार्थांच्या जाहिरातींचा प्रचार केला नाही.

त्याने २०१०मध्ये मादक पदार्थांचा करार नाकारून जगभरातील क्रिकेटपटूंसाठी एक उदाहरण ठेवले आहे.

सचिनच्या ब्रँड असोसिएशनची काळजी घेणाऱ्या वर्ल्ड स्पोर्ट्स ग्रुपच्या प्रवक्त्याने सांगितले होते की, “तो एक मोठा करार होता.”

सचिनने २०१५मध्ये स्वत: खुलासा केला होता की, “मी कधीच दारू किंवा तंबाखूच्या ब्रँडचा प्रचार करण्याचा प्रयत्न केला नाही. माझ्या वडिलांनी एक गोष्ट सांगितली होती की, तू तंबाखू आणि दारूचा प्रचार कधीच करू नको. त्यामुळे मी या दोन गोष्टींपासून नेहमी दूर राहिलो आहे.”

२. हाशिम अमला

दक्षिण आफ्रिका संघाचा दिग्गज खेळाडू हाशिम अमलाचाही त्या खेळाडूंमध्ये समावेश होतो, ज्यांनी कधीच अंंमली पदार्थांचे सेवनही केले नाही आणि कधी त्यांचे प्रचारही केला नाही. खरंतर इस्लाम धर्मामध्ये दारूचे सेवन करणे वाईट आणि चूकीचे समजले जाते.

हाशिम आमला धार्मिक प्रथांचे पालन काटेकोरपणे करतो. त्याचा दृढ विश्वास आहे. असा एक काळ होता जेव्हा त्याने जर्सीवर एजर कॅसल लेगर लोगो ठेवण्यास नकार दिला होता. कारण तो अल्कोहोलचा ब्रँड होता. तरी यानंतर त्याला आपल्या सामना शुल्काच्या अर्ध्यापेक्षा जास्त रक्कम गमवावी लागत होती.

क्रिकेट दक्षिण आफ्रिकेला त्याच्या मागण्यांचे पालन करावे लागले आणि बोर्डाने त्याच्या जर्सीवरून लोगो हटविण्यास परवानगी दिली होती. अमलाने ८ ऑगस्ट २०१९ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. परंतु तो आताही फ्रंचायझी लीगमध्ये खेळताना दिसतो.

३. इमरान ताहिर

दक्षिण आफ्रिका संघाचा फिरकीपटू गोलंदाज इमरान ताहिर (Imran Tahir) सातत्याने आपल्या राष्ट्रीय संघासाठी चांगली कामगिरी करत आहे. त्याला भारतात खूप पसंत केले जाते. तो आयपीएलमध्ये एमएस धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्जचा (Chennai Super Kings) भाग आहे.

ताहिरने आयपीएल २०१९मध्ये पर्पल कॅप (आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या खेलाडूला ही कॅप दिली जाते) आपल्या नावावर केली होती. इतकेच नव्हे तर ४१ वर्षीय ताहिर आपल्या गोलंदाजीने सर्वांच्या भुवया उंचावत आहे. पाकिस्तानच्या लाहोरमध्ये जन्मलेला ताहिरचादेखील त्या खेळाडूंपैकी एक आहे, जे इस्लाम धर्माच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करतात आणि अंमली पदार्थ म्हणजेच दारूसारख्या गोष्टींचा प्रचार करत नाही.

त्याने हाशिम अमलाच्या पावलांवर पाऊल ठेवत त्याचे अनुकरण केले आहे. अमलाप्रमाणेच त्याने आपल्या जर्सीवर एजर कॅसल लेगर लोगो ठेवण्यास नकार दिला होता. तसेच विजयानंतर तो शँपेन आणि दारू या गोष्टींच्या सेलिब्रेशनपासून दूरच राहतो.

४. राशिद खान

अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा युवा फिरकीपटू गोलंदाज राशिद खानने (Rashid Khan) लहान वयापासूनच मोठ-मोठे कारनामे करून दाखविले आहेत. राशिदने अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. राशिददेखील अमला, ताहिर यांच्याप्रमाणेच इस्लाम धर्माचे पालन काटेकोरपणे करतो.

वनडे क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान १०० विकेट्स घेणाऱ्या राशिदलाही भारतातून खूप पसंती मिळते. आयपीएलमध्येही राशिद सनरायजर्स हैद्राबाद संघाचा स्टार खेळाडू आहे.

तसं राशिदकडे अंमली पदार्थांच्या जाहिरातींचा प्रस्ताव अद्याप आलेला नाही. परंतु त्याने आयपीएलमध्ये एका पार्टीदरम्यान दारू पिण्यास नकार दिला होता. त्यावेळी त्याने अनेकांची मने जिंकले होते.

५. मोईन अली

इंग्लंड संघाचा अष्टपैलू क्रिकेटपटू मोईन अलीचादेखील (Moeen Ali) त्या खेळाडूंच्या यादीत समावेश होतो, ज्यांनी आपल्या कारकीर्दीत आतापर्यंत दारु किंवा तत्सम पदार्थांपासून अंतर बाळगले आहे.

आयसीसी विश्वचषक २०१९मध्ये विजेतेपद मिळविल्यानंतर जेव्हा इंग्लंडचा संघ शँपेन शॉवरमध्ये भाग घेत होता, तेव्हा अली आपला संघसहकारी आदिल रशीदबरोबर एका बाजूला उभा होता. कारण तोदेखील इस्लाम धर्माच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करतो आणि दारूपासून दूर राहतो.

इतकेच नव्हे तर आयपीएलमध्ये अली रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघाकडून खेळायचा. आरसीबी संघ युनायटेड स्पिरिट्स या भारतीय मादक पेय कंपनीच्या मालकीची आहे. तरीही अलीने संघाच्या कोणत्याही अंमली पदार्थांच्या जाहिरातींमध्ये स्वत:ला सामील केले नव्हते आणि स्वत:ला त्या सर्वांपासून दूर ठेवले होते.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---