आयपीएलची क्रिकेट स्पर्धा असोत वा आणखी कुठली. प्रत्येक संघ व खेळाडू हा विजयासाठीच खेळत असतो. तसेच कोणतीही स्पर्धा खेळताना प्रत्येक खेळाडूला त्या स्पर्धेचे विजेतेपद मिळवणे हेच लक्ष्य समोर दिसत असते. किंबहूना त्या स्पर्धेचे विजेतेपद मिळावे म्हणूनच प्रत्येक खेळाडू खेळत असतो.
आयपीएलमध्ये गेल्या 13 वर्षात अनेक खेळाडूंनी विजेतेपदाची ट्रॉफी उचलण्याची संधी मिळाली. पण यातील असे काही खेळाडू आहेत, ज्यांनी एकापेक्षा अधिकवेळा ही ट्रॉफी उचलली. या लेखातही आपण अशा 5 खेळाडूंबद्दल जाणून घेऊ ज्यांनी सर्वाधिकवेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे.
1. रोहित शर्मा – 6 आयपीएल किताब
मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक वेळा आयपीएल किताब जिंकला आहे. त्याला 6 अंतिम सामन्यात खेळण्याची संधी मिळाली आहे आणि विशेष म्हणजे सर्व 6 वेळा तो विजयी संघाचा भाग होता. 2009 साली डेक्कन चार्जर्सकडून खेळताना पहिल्यांदाच अंतिम सामन्यात विजेत्या संघाचा तो भाग झाला होता. पुढे 2011 साली तो मुंबई इंडियन्स संघात गेला. 2013 साली कर्णधारपद मिळाल्यानंतर त्याने त्यांच्यासाठी 2013, 2015,2017,2019 आणि 2020 मध्येही त्याच्या नेतृत्वाखाली विजेतेपद मिळवून दिले. त्यामुळे 6 आयपीएल विजेतीपदे मिळवणारा रोहित एकमेव क्रिकेटपटू आहे.
2. कायरन पोलार्ड – 5 आयपीएल किताब
कायरन पोलार्ड हा 2010 पासून मुंबई संघाचा भाग झालेला आहे. गेली 11 वर्षे तो मुंबई संघात खेळत आहे. मुंबईने खेळलेल्या सर्व सहा अंतिम सामन्यांत खेळणारा तो एकमेव खेळाडू आहे. मात्र त्याला सहा पैकी पाच वेळा जेतेपदाचा मान मिळाला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 मध्ये जिंकलेल्या स्पर्धामध्ये तो संघाचा महत्त्वाचा भाग होता.
3. लसिथ मलिंगा – 4 आयपीएल किताब
मुंबई इंडियन्सचा सर्वात जुना खेळाडू म्हणजे यॉर्कर किंग लसिथ मलिंगा. 2008 पासूनच तो मुंबईच्या संघात गोलंदाजी करीत आहे. त्यानेही मुंबईसाठी 5 आयपीएलचे अंतिम सामने खेळले आहेत. 2010 मध्ये अंतिम सामन्यात पराभव पहावा लागला होता. पण त्यानंतर 2013, 2015, 2017, 2019 मध्ये चार वेळा त्याला जेतेपदाचा मान मिळाला. 2020 साली तो मुंबईचा भाग नव्हता. अन्यथा पोलार्ड प्रमाणेच त्यालाही पाच जेतेपदे जिंकण्याची संधी मिळाली असती.
4. हार्दिक पंड्या – 4 आयपीएल किताब
मुंबईच्या संघात हार्दिक पंड्या 2015 पासून खेळत आहे. आतापर्यंत खेळलेल्या 6 पैकी 4 हंगामात त्याने आयपीएल किताब जिंकण्याचा मान मिळवला आहे. 2015, 2017, 2019 आणि 2020 असे चार आयपीएल किताब एकाच संघाकडून खेळताना त्याने पटकावले आहेत.
5. अंबाती रायडू व हरभजन सिंग – 4 आयपीएल किताब
अंबाती रायडू व हरभजन सिंग हे दोघेही बराच काळ मुंबईसाठी खेळले होते. हरभजन 2008-2017 व रायडू 2010-2017 पर्यंत मुंबई साठी खेळला. पुढे दोघेही 2018 पासून चेन्नईच्या संघात समाविष्ट झाले. मुंबईकडून खेळताना 2013, 2015 व 2017 असे तीन वेळा त्यांनी विजेतेपदाची ट्रॉफी हातात धरली. तर 2018 साली चेन्नईकडून खेळतानाही त्यांनी आयपीएलचा किताब पटकावला होता. असे एकूण 4 आयपीएल किताब दोघांच्याही नावावर आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
अरर! अंतिम सामन्यात रोहितवर ओढवली बदली खेळाडूच्या हातून बाद होण्याची नामुष्की
मुंबईने किताब जिंकताच प्रशिक्षक महेला जयवर्धनेने केला खास पराक्रम
गोलंदाजीचे शेर! आयपीएलच्या फायनलमध्ये सामनावीर पुरस्कार जिंकणारे ३ गोलंदाज