रिओ पॅरालिम्पिकनंतर यंदा पुन्हा टोकियो पॅरालिम्पिकमध्ये आंतरराष्ट्रीय पॅरालिम्पिक परिषदेच्या उपस्थिती रेफ्युजी (शरणार्थी) असलेल्या पॅरा अथलेट्स या संघाने सहभाग नोंदवला होता. यावेळी टोकियोमध्ये रेफ्युजीच्या संघामध्ये ६ खेळाडूंनी भाग घेतला होता. यामधील प्रत्येक खेळाडूची एक वेगळीच प्रेरणादायी अशी गोष्ट आहे. यामधील प्रत्येकजण कठीण प्रसंगात देखील हार न मानता आव्हानाला सामोरे गेला आहे. आज आपण अशाच रेफ्युजी संघातील या खेळाडू विषयी जाणून घेणार आहोत.
परफेक्ट हाकिजिमाना (तायक्वांडो)
परफेक्टने रवांडाच्या रेफ्युजी कॅम्पमधून टोकियोच्या परालिम्पिकमध्ये सहभाग नोंदवला होता. पूर्व आफ्रिकेच्या बुरुंडी प्रांतातील गृह युद्धामुळे आपला जीव वाचवून परफेक्ट रवांडाच्या रेफ्युजी कॅम्पमध्ये पोहोचला होता. १९९६ मध्ये एका फायरिंगमध्ये त्याला त्याच्या आईला गमवावे लागले. तसेच तो ज्या रेफ्युजी कॅम्पमध्ये राहत होता, तिथे झालेल्या एका हल्ल्यात परफेक्टचा डावा हात गोळी लागल्यामुळे निकामी झाला.
यानंतर त्याने खेळाकडे वळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर केवळ १६ व्या वर्षीच परफेक्टने ताइक्वांडो खेळायला सुरुवात केली. याचा सराव देखील परफेक्टने रवांडाच्या रिफ्यूजी कॅम्पमधेच केला होता. त्याच्या मेहनतीचे, जिद्दीचे फळ म्हणून तो टोकियोच्या पॅरालिम्पिक स्पर्धेत पोहोचू शकला.
अनस अल खलिफा (कॅनोईंग)
सीरियाच्या हमा शहरात जन्मलेला अनसचे पूर्ण बालपण एका रिफ्यूजी कॅम्पमध्येच गेले. २०११ मध्ये झालेल्या सीरियामधील युद्धामुळे त्याच्या परिवाराला पुढील उपजीविकेसाठी जर्मनी येथे शरण घ्यावी लागली. या दरम्यान २०१८ मध्ये २ मजली इमारतीत काम करत असताना अनस घसरून पडला होता, तेव्हा त्याच्या मणक्याला जबर दुखापत झाली. ही दुखापत एवढी गंभीर होती की, त्याच्या शरीरातील खालचा भाग कायमचा निकामी झाला.
त्यानंतर अनस कॅनोईंग खेळाकडे वळला. दुखापतीनंतर अनसने खेळात काहीतरी करण्याचे ठरवले होते. यादरम्यान १९८८ सालच्या सिओल ऑलिम्पिकचा पदक विजेता ऑगनियाना दुशेवा सोबत त्याची ओळख झाली होती. दुशेवाने यादरम्यान अनसला खेळात काहीतरी करण्यासाठी प्रेरित केले. ज्यानंतर अनस कॅनोईंग खेळाकडे वळला. याच दरम्यान सीरियामध्ये एका गोळीबारात अनसच्या भावाचा मृत्यू झाला होता. यानंतर अनस पुरता नैराश्यात गेला होता.
मात्र, याच दरम्यान त्याला कळाले की त्याला परालिम्पिक रेफ्युजी संघाकडून खेळण्याची संधी मिळू शकते. तेव्हा त्याने पुन्हा खेळाकडे वळून जोरदार सरावाला सुरुवात केली. त्यानंतर त्याने असे मत व्यक्त केले की, जर तो पॅराऑलिम्पिकमध्ये खेळला, तर त्याच्या भावासाठी ही चांगली आदरांजली असेल आणि शेवटी त्याच्या मेहनतीचं फळ त्याला मिळाले त्याची टोकियो पॅरालिम्पिकमध्ये निवड झाली.
आलिया इस्सा (क्लब थ्रो)
आलिया ही या रेफ्युजी संघाकडून पॅरालिम्पिकमध्ये सहभाग नोंदवणारी पहिली महिला ॲथलीट होती. केवळ ४ वर्षांची असताना आलियाला स्मॉल्पॉक्स या आजाराने ग्रासले होते. जोराच्या तापामुळे तिच्या मेंदूवर याचा परिणाम झाला आणि त्यामुळे तिला कायमसाठीच व्हीलचेअरवर बसावे लागले. आलियाला स्पष्ट असे बोलता देखील येत नाही. या कारणामुळे बालपणात आलिया सोबत चेष्टा आणि भेदभाव केला जायचा. ज्यानंतर या सर्व गोष्टीतून निघण्यासाठी तिने खेळाकडे वळण्याचा निर्णय घेतला.
सीरियातील नाजूक परिस्थितीमुळे आलियाच्या वडिलांनी ग्रीसमध्ये शरण घेतली होती. तिथेच आलियाचा २००१ मध्ये जन्म झाला. आलिया जेव्हा १६ वर्षांची होती, तेव्हा कॅन्सरमुळे तिच्या वडिलांचा मृत्यू झाला. या घटनेने आलिया खूप नैराश्यात गेली होती. या नैराश्यातून बाहेर निघण्यासाठी आलियाने क्लब थ्रो या खेळाकडे वळण्याचे ठरवले. या खेळात आल्याचा वैयक्तिक असा विक्रम आहे. जो की १६.४१ मीटरचा आहे. हा विक्रम तिने जागतिक ॲथलेटिक्स ग्रंड प्रिक्समध्ये २०१९ च्या मे महिन्यात प्रस्थापित केला होता. त्यानंतर आपल्या मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आलियाने टोकियोच्या पॅरालिम्पिक स्पर्धेत सहभाग नोंदवला.
इब्राहिम अल हुसेन (स्विमिंग)
सीरियाचा रहिवासी असणारा इब्राहिमची पार्श्वभूमी ही खेळाडूंच्या परिवारातील आहे. त्याचे वडील आशियाई स्पर्धेचे दोन वेळचे पदक विजेते आहेत. इब्राहिमने ५ वर्षांचा असतानाच जलतरण (पोहणे) आणि जुडोची सुरुवात केली होती. २०११ साली सीरियामध्ये सुरू झालेल्या युद्धामुळे इब्राहिमच्या वडिलांनी त्याच्या १३ भाऊ-बहिणीसह सीरिया सोडला होता. मात्र इब्राहिमने सिरियामध्ये राहण्याचा निर्णय घेतला होता.
एके दिवशी इब्राहिमचा एक मित्र तिथल्या गोळीबारात जखमी झाला. तेव्हा इब्राहिम त्याच्या मित्राला वाचवण्यासाठी घराच्या बाहेर पडला होता. यादरम्यान तिथे एक बॉम्ब स्पोट झाला. ज्यामुळे इब्राहिमचा डावा पाय आणि घोटा जवळील भाग निकामी झाला. एवढ्यावरही इब्राहिम थांबला नाही, यानंतर तो ग्रीसमध्ये गेला जिथे त्याने यावर उपचार केले आणि खेळाकडे वळला. २०१६ साली इब्राहिम रिओ ऑलिम्पिकमध्ये रेफ्युजी पॅरालिम्पिक संघाचा ध्वज वाहक होता. यामुळे इब्राहिमचे एक स्वप्नं पूर्ण झाल्यासारखे झाले होते.
शहराद नसजपोर (थाळी फेक)
रेफ्युजी पॅरालिम्पिक संघ बनण्यासाठी सर्वात मोठे कारण म्हणजे शहराद. इराणच्या या शहराद मुळेच आज अनेक खेळाडू पॅरालिम्पिकमध्ये रेफ्युजी संघाकडून खेळत आहे. जेव्हा शहरादला माहित पडले की, रिओ ऑलिम्पिकमध्ये रेफ्युजी खेळाडूंचा संघ देखील सहभाग नोंदवणार आहेत. तेव्हा त्याने रिओ पॅरालिम्पिकमध्ये देखील रेफ्युजी संघ असण्याची मोहीम चालवली. शहराद हा जन्मापासूनच सेरेब्रल पाल्सी या आजाराने ग्रस्त आहे. सुरुवातीला शहराद टेबल टेनिस खेळत होता. परंतु, खूप लोकांनी त्याला ॲथलेटिक्सवर लक्ष देण्यास सांगितल्यावर त्याने थाळी फेकीमध्ये जम बसवण्याचा प्रयत्न केला.
साल २०१५ मध्ये शहरादने इराण सोडून अमेरिकेची वाट पकडली होती. तिथे त्याने न्यूयॉर्क शहरात शरण घेतली होती. २०१६ च्या पॅरालिम्पिकच्या उद्घाटनात शहराद रेफ्युजी संघाचा ध्वज धारक होता. शहरादचे म्हणणे आहे की, “जीवनात तुम्हाला दररोज ‘नाही’ हा शब्द ऐकायला नक्कीच मिळणार, मात्र लोकांच्या या नकाराचा जास्त विचार करू नका. आपल्या ध्येयाकडे पोहोचण्यासाठी वेगवेगळे मार्ग निवडा आणि शेवटी तुम्ही स्वतःला तिथे पाहाल जिथे पोहोचण्याचे तुम्ही स्वप्न पाहिले होते.”
अब्बास करिमी (स्विमिंग)
अब्बासचा जन्म अफगाणिस्थानमध्ये झाला होता. तो जन्मताच बिना हातांचा जन्मला होता. अफगाणिस्तान हा असा देश आहे जिथे नेहमी तुम्हाला भेदभावाचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत अब्बासचे जगणे खूप मुश्कील होते. अब्बासचे बालपण खूप कठीण परिस्थितीत गेले आहे. त्याच्यावर होणार्या या भेदभावामुळे अब्बासच्या मनावर देखील त्याचा खूप परिणाम झाला. यामुळे त्याला अँगर इशूचा देखील सामना करावा लागला होता.
यावर बोलताना अब्बास म्हणाला होता की, “जेव्हा तुम्ही अफगाणिस्तानमध्ये अशा कमतरतेने जन्म घेता. तेव्हा तुम्हाला निकामी मानले जाते. लहानपणी लोक माझ्या शरीरातील कमतरतेमुळे माझी चेष्टा करायचे.”
अशातच अब्बासच्या जीवनात स्विमिंगसारखा खेळ आला. यावर त्याने विचार केला की, भलेही माझ्याजवळ हात नाहीत मात्र मी माझ्याकडे असलेल्या २ पायाने संपूर्ण जग जिंकू शकतो. त्यानंतर अब्बासने निर्णय घेतला की, त्याला जीवनात काय करायचे असेल, तर अफगाणिस्तानमधून तालिबानच्या छत्रछायातून बाहेर निघावे लागेल. त्यानंतर लागोपाठ ४ रेफ्युजी कॅम्पमध्ये राहिल्यानंतर शेवटी अब्बासने तुर्कीमध्ये शरण घेतली. त्यामुळे टोकियो पॅरालिम्पिकमध्ये पोहोचून अब्बासने त्याच्या सारख्या अनेक शरणार्थी लोकांसाठी एक आशेचा किरण जागा केला.
महत्त्वाच्या बातम्या –
–एबी डिव्हिलियर्सने यूएईमध्ये लावली हजेरी; मॅक्सवेल, जेमिसन यांचेही ‘या’ दिवशी होणार आगमन
–“जर कोणी शार्दुल ठाकूरचा फॅन क्लब काढला, तर मला त्याचा पहिला सदस्य बनयला आवडेल”
–“वी आर चेन्नई बॉईज”, ब्रावो-डू प्लेसिसने सीएसकेच्या आठवणीत गायले खास गाणे, व्हिडिओ भन्नाट व्हायरल