भारतीय वरिष्ठ संघात प्रवेश करण्याचा एकमेव मार्ग आयपीएलमार्फत आहे, हे वाक्य पुन्हा एकदा पूर्णपणे चुकीचे ठरले आहे. भारताच्या संघात श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी देशांतर्गत क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या केवळ एकच नाही तर दोन खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आधीच मुख्य संघात सारांश जैनचा समावेश केला होता. आता सोमवारी (3 ऑगस्ट) जसप्रीत बुमराहची रिप्लेसमेंट जाहीर केली. त्याच्याजागी औकिब नबीची निवड करण्यात आली आहे. त्याला मिळालेली संधी ही काही विनाकारण नाही, त्यासाठी त्याने केलेली मेहनत त्यामागचे कारण आहे. त्याच्या त्या अनोख्या विक्रमांबद्दल जाणून घेऊ, ज्यामुळे तो भारतीय संघासाठी पात्र ठरला आहे.
जम्मू-काश्मीरच्या या वेगवान गोलंदाजाने 2025-26 च्या रणजी ट्रॉफीमध्ये 60 विकेट्स घेतल्या होत्या. तो या स्पर्धेत एकाच हंगामात कोणत्याही गोलंदाजाने घेतलेल्या सर्वाधिक विकेट्सच्या यादीत सातव्या क्रमांकावर आहे. तो या यादीत वेगवान गोलंदाजांमध्ये 2019-20 हंगामात जयदेव उनाडकटच्या 67 विकेट्स आणि 1998-99 हंगामातील डोड्डा गणेशच्या 62 विकेट्सनंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे.
नबीने दोन रणजी ट्रॉफीच्या हंगामात एकूण 104 विकेट्स घेतल्या. या स्पर्धेच्या सलग दोन हंगामात केवळ चार गोलंदाजांनी त्याच्यापेक्षा अधिक विकेट्स घेतल्या आहेत. त्यातील केवळ एकच वेगवान गोलंदाज होता. उनाडकटने 2018-19 मध्ये 106 विकेट्स घेतल्या होत्या.
त्या दोन हंगामांमध्ये नबीने 18 सामन्यांमध्ये 13 वेळा पाच विकेट्स घेतल्या. त्यामुळे तो केवळ आशुतोष अमनच्या मागे आहे. अमनने 2018-19 आणि 2019-20 मध्ये 14 वेळा पाच विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे.
नबीने 2025-26 मध्ये आठ वेळा पाच विकेट्स घेतल्या आणि भारतातील एकाच प्रथम श्रेणी हंगामात वेगवान गोलंदाजाने घेतल्याच्या सर्वाधिक पाच विकेट्सच्या विक्रमाची बरोबरी केली. मॉरिस टेटने 1926-27 आणि रॉन ऑक्सनहॅमने 1935-36 मध्ये भारतात आठ वेळा पाच विकेट्स घेतल्या होत्या.
नबीने 2025-26 हंगामाच सर्व वरिष्ठ पुरुष देशांतर्गत स्पर्धांमध्ये एकूण 95 विकेट्स घेतल्या. त्यामुळे तो एकाच हंगामात कोणत्याही वेगवान गोलंदाजाने घेतलेल्या सर्वाधिक विकेट्सच्या यादीत दुसऱ्या स्थानी आला. उनाडकटने 2019-20 मध्ये 105 विकेट्स घेतल्या होत्या.
त्याचबरोबर नबीचे श्रीलंकेविरुद्ध आंतरराष्ट्रीय पदार्पण झाले, तर तो रेड बॉल क्रिकेट खेळणारा पहिलाच जम्मू-काश्मीरचा खेळाडू ठरेल.






