तब्बल ५ वर्षांनंतर टी-२० विश्वचषक स्पर्धेचे आयोजन यंदा २०२१ मध्ये होणार आहे. ही स्पर्धा यूएई आणि ओमन येथे खेळवली जाणार आहे. या स्पर्धेसाठी जवळपास सर्व संघांनी आपला १५ सदस्यीय संघ देखील जाहीर केला आहे. नुकतेच बुधवारी (८ सप्टेंबर) भारतीय संघाने देखील आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी आपला १५ सदस्यीय संघ निवडला आहे. तसेच त्याची घोषणा देखील केली. सोबतच भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला संघाचा मेंटर म्हणून देखील नियुक्त केले आहे.
या दरम्यान खूप कालावधीपासून संघातून बाहेर असलेल्या रविचंद्रन अश्विनला देखील यंदाच्या टी-२० विश्वचषकात संधी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे अनेक महत्त्वाच्या खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. ज्यामध्ये युझवेंद्र चहल आणि शिखर धवन यांच्या सारख्या खेळाडूंचा समावेश आहे.
तसेच भारताच्या १५ सदस्यीय संघाची घोषणा झाल्यानंतर, महत्त्वाच्या खेळाडूंना वगळल्यामुळे सोशल मीडियावर अनेक चाहत्यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर (बीसीसीआय) खूप टीका केली. तर दुसरीकडे अशा काही खेळाडूंना संघात स्थान देण्यात आले ज्यांना संधी मिळण्यावर देखील शंका व्यक्त केली जात होती. मात्र त्यांना संधी देण्यामागे विराट कोहली आणि भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा हात असल्याचे समजते. याबाबत आता चर्चा होत आहे. आज आपण याच ३ खेळाडूं बाबत जाणून घेणार आहोत.
हार्दिक पंड्या –
हार्दिक सध्या भारतीय संघाचा एक महत्त्वाचा अष्टपैलू खेळाडू आहे. मात्र गेल्या काही काळापासून हार्दिक खराब फॉर्मशी झगडत होता. नुकत्याच झालेल्या श्रीलंका दौऱ्यात देखील तो चांगली कामगिरी करू शकला नाही. तसेच अलीकडच्या काळात त्याने गोलंदाजी देखील अत्यंत कमी केली आहे. त्यामुळे टी-२० विश्वचषक स्पर्धेचा संघ निवडण्यापूर्वी हार्दिकला त्याच्या खराब फॉर्ममुळे वगळून त्याऐवजी शार्दुल ठाकूरला संधी देतील अशी चर्चा रंगली होती.
कारण, शार्दुलने गेल्या काही काळापासून आपल्या अष्टपैलू खेळाचे प्रदर्शन करत फलंदाजी आणि गोलंदाजीत दोन्ही विभागात मोलाची भूमिका साकारली होती. त्यामुळे, त्याला संघात हार्दिक पंड्याचा पर्यायी खेळाडू म्हणून पाहिले जात होते. मात्र बीसीसीआयने हार्दिकवर पूर्ण विश्वास दाखवत त्याला १५ सदस्यीय संघात सामील केले. तर शार्दुल ठाकुरला राखीव खेळांडूमध्ये ठेवण्यात आले आहे.
अक्षर पटेल –
या १५ सदस्यीय संघांमध्ये सर्वाधिक आश्चर्यकारक नाव होते ते म्हणजे अक्षर पटेलचे. कारण अक्षरला आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी संघात संधी देण्यात आली आहे. त्याने भारतीय संघाकडून खेळताना केवळ १२ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने केवळ ९ विकेट घेतल्या आहेत.
अक्षरने भारताकडून त्याचा शेवटचा सामना इंग्लंड विरुद्ध मायदेशातील मालिकेत खेळला होता. तेव्हा त्याला केवळ एकच सामना खेळण्याची संधी मिळाली होती. या नावावर आश्चर्य व्यक्त होण्याचे कारण म्हणजे संघात अनुभवी असलेले युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांसारख्या महत्त्वाच्या फिरकीपटू गोलंदाजांऐवजी भारतीय संघाने अक्षर पटेलला संघात संधी दिली. यामुळे अनेक चाहते बीसीसीआयच्या या निर्णयावर प्रश्न देखील उपस्थित करत आहे.
त्यामुळे आता भारतीय संघात आधीपासूनच रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन यांसारखे अनुभवी फिरकीपटू गोलंदाज आहे. अशात भारतीय संघ अक्षर पटेलला केव्हा, कधी आणि कसे वापरतात हे बघण्याजोगी ठरेल.
वरुण चक्रवर्ती –
इंडियन प्रीमियर लीगमध्ये कोलकाता नाइट रायडर्स संघाकडून खेळणारा वरुण चक्रवर्ती याची देखील आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी संघात निवड झाली आहे. चक्रवर्तीला मिस्ट्री स्पिनर म्हटले जाते. मात्र चक्रवर्तीच्या निवडीवर देखील अनेकांनी प्रश्न केला आहे.
नुकत्याच झालेल्या श्रीलंका दौऱ्यात देखील चक्रवर्तीचे म्हणावे तसे प्रदर्शन राहिले नाही. या मालिकेत चक्रवर्तीने ३ सामन्यात केवळ २ विकेट्स घेतल्या होत्या. परंतु, चक्रवर्तीने आयपीएलमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे. यामुळेच त्याला श्रीलंका दौर्यात देखील निवडण्यात आले होते.
मात्र असे असले तरी, संघातील अनुभवी फिरकीपटू गोलंदाजांऐवजी बीसीसीआयने या नव्या गोलंदाजाला संधी देण्याचे ठरवले.
महत्त्वाच्या बातम्या –
–टी२० विश्वचषकासाठी ‘या’ ३ खेळाडूंची भारतीय संघातील निवड ठरली ‘सरप्राईज एन्ट्री’
–बांगलादेशच्या गोलंदाजाने आपल्याच गोलंदाजीवर हवेत सूर मारत पकडला अप्रतिम झेल, पाहा व्हिडिओ
–धोनी मेंटर बनण्यामुळे टीम इंडियाला होऊ शकतात ‘हे’ ५ फायदे