‘गब्बर’ नावाने ओळखला जाणारा शिखर धवन मैदानावर जितका आक्रमक, तितकाच मैदानाबाहेर समजूतदार आणि शांत स्वभावाचा आहे. 2013 ते 2022 या काळात भारतासाठी वनडे क्रिकेटमध्ये धवन हा विराट कोहली आणि रोहित शर्मानंतर सर्वाधिक धावा करणारा तिसरा खेळाडू ठरला. रोहित शर्मा आणि शिखर धवन यांची सलामी जोडी, सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुलीनंतर भारतासाठी सर्वोत्कृष्ट ठरली.
पण 2022 मध्ये बांगलादेशविरुद्ध अखेरचा सामना खेळल्यानंतर शिखर धवनचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट प्रवास थांबला. यामागे एक निर्णायक क्षण ठरला. जेव्हा ईशान किशनने वनडेमध्ये दोनशे धावा केल्या. हिंदुस्तान टाइम्सशी दिलेल्या मुलाखतीत धवन म्हणाला, “ईशान किशनने जेव्हा दोनशे धावा केल्या, तेव्हाच मला जाणवलं की माझा करियर इथंच थांबणार. माझं अंतर्मन बोलत होतं आणि ते खरंच ठरलं.”
शिखर धवनच्या कारकिर्दीची सुरुवात काहीशी संथ झाली. 2010 ते 2013 दरम्यान केवळ 5 वनडे सामने खेळून 69 धावा आणि एका टी-20 सामन्यात 5 धावा इतकंच योगदान दिला. मात्र मार्च 2013 मध्ये मोहाली टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 85 चेंडूत शतक झळकावत त्याने आपल्या पदार्पणातच धमाका केला. या डावात त्याने 187 धावा केल्या.
यानंतर धवनने मागे वळून पाहिलेच नाही. 2013 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीत ‘प्लेयर ऑफ द टूर्नामेंट’, 2015 च्या वर्ल्ड कपमध्ये भारताचा टॉप स्कोरर, 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीत पुन्हा एकदा टॉप स्कोरर अशी सातत्यपूर्ण कामगिरी केली. त्याने 34 टेस्टमध्ये 7 शतकांसह 2315 धावा, 68 टी-20 सामन्यांत 1759 धावा तर वनडेमध्येही शानदार कामगिरी केली.
2021 मध्ये त्याचा टी20 करियर संपला आणि 2022 मध्ये शेवटचा वनडे खेळून त्याने अनोख्या पद्धतीने निरोप घेतला. 2023 वर्ल्ड कपमध्ये न निवडला जाणं त्याच्यासाठी मोठा धक्का होता, पण त्याने कोणालाही कॉल केला नाही. धवन म्हणला, “माझे मित्र मला धीर देत होते, पण मी मस्तीत होतो, चिल करत होतो, कारण मला आधीच कळले होते की हे शेवट आहे.”
धवनच्या करियरवर नजर टाकली तर वाटते की कदाचित त्याच्या सोबत थोडसं अन्याय झाला, पण त्याने कधीच कुठल्याही प्रकारची तक्रार केली नाही. ज्या सहजतेने तो मैदानावर फलंदाजी करत होता, त्याच सहजतेने त्याने आपला शेवटही स्वीकारला. त्यामुळेच तो केवळ एक क्रिकेटपटू नाही, तर प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वही आहे.






