येत्या ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात भारतीय संघ इंग्लंडचा दौरा करणार आहे. या दौऱ्यावर उभय संघ ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहेत. मायदेशात पाहुण्या इंग्लंडला कसोटी मालिकेत ३-१ ने चारीमुंड्या चित केल्यानंतर त्यांच्याच भूमीत त्यांचाच पराभव करण्याचे आवाहन भारतीय संघापुढे असणार आहे. अशात एका अष्टपैलू खेळाडूमुळे भारतीय संघापुढील अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. हा अष्टपैलू म्हणजे, इंग्लंडचा ३३ वर्षीय मोईन अली होय.
फलंदाजीसह गोलंदाजीत माहीर असलेला हा खेळाडू सध्या दमदार फॉर्ममध्ये आहे. या फिरकीपटूची क्रिकेटविश्वातील दिग्गज फिरकी गोलंदाजामध्ये गणना केली जाते. याखेरीज त्याची इंग्लंडच्या मैदानांवरील कसोटी आकडेवारीही अतिशय उल्लेखनीय राहिली आहे. त्यामुळे भारतीय फलंदाज त्याच्यापुढे संघर्ष करताना दिसू शकतात.
मोईन अलीने आतापर्यंत ६१ कसोटी सामन्यात इंग्लंडचे प्रतिनिधित्व केले आहे. दरम्यान ३.६२ च्या इकोनॉमी रेटने त्याने तब्बल १८९ विकेट्स घेतल्या आहेत. यात त्याच्या एका सामन्यात १० विकेट्स घेण्याच्या कामगिरीचा समावेश आहे. याबरोबरच त्याने ५ वेळा एका सामन्यात ५ किंवा त्यापेक्षा विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे.
त्यातही इंग्लंडमधील साउथम्पटच्या द रोज बाउल स्टेडियमवर त्याने अविसमरणीय कामगिरी केली आहे. २०१४ साली याच मैदानावर भारताविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात मोईन अलीने ८ फलंदाजांना पव्हेलियनला धाडले होते. त्याच्या या योगदानामुळे इंग्लंडने तब्बल २६६ धावांनी तो सामना जिंकला होता. विशेष बाब म्हणजे, मोईन अलीचा तो भारताविरुद्धचा पहिलाच कसोटी सामना होता.
एवढेच नव्हे तर, २०१८ मध्येही साउथम्पटन येथे भारताविरुद्ध त्याने ९ कसोटी विकेट्स चटकावल्या होत्या. यासह इंग्लंडने ६० धावांनी या सामन्यात भारतावर मात केली होती. तसेच मोईन अली या सामन्यात सामनावीर ठरला होता.
मोईन अलीच्या भारताविरुद्धच्या संपूर्ण कसोटी आकडेवारीविषयी बोलायचे झाले तर, त्याने २०१४ ते २०२१ या कालावधीत भारताविरुद्ध १३ कसोटी सामने खेळले आहेत. दरम्यान ३.४८ च्या इकोनॉमी रेटने त्याने भारताच्या ४९ फलंदाजांना तंबूत धाडले आहे. त्याची भारताविरुद्धची ही कसोटी आकडेवारी आणि सध्याच्या दमदार फॉर्मला पाहता, आगामी कसोटी मालिकेत तो भारतीय फलंदाजांना गुडघे टेकण्यास भाग पाडताना दिसू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या-
कसोटी चॅम्पियनशीप फायनल: दमदार प्रदर्शनानंतरही ‘या’ ३ भारतीय खेळाडूंना बसावे लागू शकते बाकावर
तो कधीही जिंकता सामना खेचून घेऊ शकतो; भारताच्या ‘या’ धुरंधराची इंग्लिश दिग्गजाला वाटते भिती
भारताचा श्रीलंका दौरा रद्द होण्याच्या मार्गावर, ‘या’ मोठ्या कारणामुळे आयोजन धोक्यात?






