काल श्रीलंका दौऱ्यासाठी १९ वर्षाखालील भारतीय क्रिकेट संघात निवड झाल्यापासून जागतिक क्रिकेट वर्तूळात सर्वांच्या तोंडी अर्जून तेंडूलकर हे एकच नाव आहे.
अर्जूनच्या निवडीमुळे क्रिकेट रसिकांकडून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. इंग्लंडची क्रिकेटपटू डॅनियल वॅट आणि खुद्द आतंराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनेही ट्टिटरवरून अर्जूनचे अभिनंदन केले आहे.
अर्जूनच्या निवडीनंतर त्याचे गोलंदाजीचे प्रशिक्षक सुब्रतो बॅनर्जी यांनी पत्रकाराशी चर्चा करताना याविषयी आपली मते व्यक्त केली.
ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, ” मी अर्जूनला गेल्या दोन-अडीच वर्षांपासून प्रशिक्षण देतोय. अर्जून स्वत: त्याच्या गोलंदाजीवर कष्ट घेतोय. त्याने त्याच्या गोलंदाजीत प्रचंड सुधारणा केली आहे. त्याच्या या निवडीमुळे मी खुष आहे. ही केवळ सुरुवात आहे. ”
भारताचे माजी गोलंदाज सुब्रतो बॅनर्जी सचिनचे चांगले मित्र आहेत. सचिनच्या विनंतीवर त्यांनी अर्जूनला प्रशिक्षण द्यायला सुरूवात केली होती.
तसेच सुब्रतो बॅनर्जी यांनी भारताचा वेगवान गोलंदाज ऊमेश यादव आणि 2018 रणजी विजेत्या विदर्भ संघाचा गोलंदाज रजनीश गुरबानी यांना गोलंदाजीचे धडे दिले आहेत.





