इंडियन प्रीमियर लीग २०२१ ला कोविड-१९ महामारीचा जोरदार फटका बसला आहे. ९ एप्रिलपासून सुरू झालेल्या आयपीएलच्या या हंगामाला २९ सामने झाल्यानंतर अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले आहे. त्यामुळे सर्व सहभागी क्रिकेटपटू आणि इतर कर्मचारी आपापल्या मायदेशी परतनाना दिसत आहेत. अशात न्यूझीलंड संघाचा यष्टीरक्षक फलंदाज टीम सिफर्ट याच्या संकटात वाढ झाली आहे.
आयपीएल २०२१ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचे प्रतिनिधित्व करणारा हा शिलेदार कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. त्यामुळे त्याला अजून काही दिवस भारतातच थाबांवे लागणार आहे.
इएसपीएन क्रिकइंफोने दिलेल्या माहितीनुसार, भारत सोडण्यापुर्वी सिफर्टची पीसीआर चाचणी करण्यात आली. या चाचणीत सिफर्टचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे त्याला इतर क्रिकेटपटूंसोबत चार्टर्ड विमानात न्यूझीलंडला जाण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. त्याला अहमदाबाद येथे विलगीकरणात राहावे लागणार आहे. लवकरच त्याला चेन्नईला हलवण्यात येईल, जेणेकरुन तिथे मोठ्या खाजगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार करता येतील.
“सिफर्टने त्याचा विलगीकरण कालावधी पूर्ण केला आणि तो निगेटिव्ह आढळला की, त्वरित त्याला न्यूझीलंडला पाठवण्याची व्यवस्था केली जाईल. परंतु तिथे गेल्यानंतरही त्याला १४ दिवसांच्या क्वारंटाईन कालावधीतून जावे लागणार आहे. चेन्नई सुपर किंग्जचे फलंदाजी प्रशिक्षक माइक हसी यांना दिले गेलेले सर्व उपचार त्यालाही दिले जातील,” असे एका अधिकाऱ्याने सांगितले आहे. नुकताच माइक हसी यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे.
न्यूझीलंड बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेविड व्हाईट सिफर्टविषयी बोलताना म्हणाले की, “हे सिफर्टचे दुर्दैवच आहे. आम्ही त्याला लवकरात लवकर मायदेशी परत आणण्यासाठी प्रयत्न करु. अपेक्षा करतो की, लवकरच त्याला कोरोना अहवाल निगेटिव्ह येईल आणि तो रुग्णालयातून डिस्चार्ज मिळवत मायदेशी परतेल.”
आयपीएल २०२१ मध्ये सिफर्टला कोलकाता संघाने मुळ किंमतीसह आपल्या ताफ्यात जागा दिली होती. परंतु त्याला या हंगामात एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
अवघ्या ६ सामन्यात ८६१ धावा कुटत आला प्रकाशझोतात, आता इंग्लंडमध्ये गरजणार ‘बंगालचा शेर’!
फॉर्मात असलेल्या पृथ्वीला भारतीय कसोटी संघात का मिळाली नाही संधी? प्रसिद्ध समालोचकाने सांगितले कारण