सिडनी। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर पार पडला. या सामन्यादरम्यान अनेक घटना घडल्या, ज्याबद्दल क्रिकेट वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. त्यातीलच एक घटना म्हणजे सोमवारी (११ जानेवारी) या सामन्याच्या शेवटच्या दिवशी स्टीव्ह स्मिथचा एक व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यात अनेकांनी केलेल्या दाव्यानुसार तो भारतीय यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतचा बॅटींग मार्क हटवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. आता याबाबत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनने मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
सोमवारी व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये असे दिसत होते की ड्रिंक्स ब्रेक दरम्यान ४९ क्रमांकाची जर्सी घातलेला ऑस्ट्रेलियन खेळाडू खेळपट्टीवर जाऊन क्रिजवरील भारतीय फलंदाजाचे बॅटिंग मार्क पायाने पुसत आहे. त्यावेळी रिषभ पंत आणि चेतेश्वर पुजारा फलंदाजी करत होते. क्रिजवरील बॅटिंग मार्क पुसल्यानंतर पंत तिथे फलंदाजी करण्यासाठी आलेलाही या व्हिडिओमध्ये दिसते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून ऑस्ट्रेलियन संघांमध्ये ४९ क्रमांकाची जर्सी स्मिथ वापरतो, त्यामुळे स्मिथच्या खेळ भावनेवर मोठ्या प्रमाणात प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
असे असतानाच आता पेनने पत्रकारांशी मंगळवारी बोलताना सांगितले आहे की ‘मी याबाबत स्टीव्ह स्मिथशी बोललो आहे. हे सर्व ज्या प्रकारे सर्वांसमोर आले, त्यामुळे तो निराश झाला आहे. जर तुम्ही स्टीव्ह स्मिथ कसोटी क्रिकेट कसा खेळतो हे पाहिले असेल तर लक्षात येईल तो सामन्यातील प्रत्येक दिवशी ५ ते ६ वेळा असे करतो. तो असं खुपदा करतो. तो नेहमीच क्रिजमध्ये असतो. आम्हाला माहित आहे ही स्मिथच्या नेहमीच्या सवयींपैकी एक आहे. त्यातील एक म्हणजे तो नेहमी त्याचे मार्क बनवत असतो.’
पेन पुढे म्हणाला, ‘तो जाणूनबुजून रिषभ पंतचा बॅटींग मार्क पुसत नव्हता. मी विचार केला की जर तो भारतीय खेळाडू असता तर भारतीय खेळाडूंनीही त्याचं समर्थन केलं असतं. मी स्मिथला कसोटीत असं करताना पाहिले आहे आणि त्याच्या विरुद्ध खेळतानाही त्याला असे करताना पाहिले आहे.’
तसेच पेन म्हणाला, ‘त्याला तो कसा खेळणार आहे, याबाबत कल्पना करायला आवडते. काल तुम्ही त्याला डावखरी फलंदाजाचे शॉट खेळताना पाहिले, ज्यावेळी त्याला वाटत होते की तिथे नॅथन लायनने बॉल टाकावा.’
After drinks break Aussie comes to shadow bat and scuffs out the batsmen's guard marks.
Rishabh Pant then returns and has to take guard again.#AUSvIND #AUSvsIND #AUSvINDtest pic.twitter.com/aDkcGKgUJC
— James Buttler | Cricket Badger Podcast 🏏🦡🇺🇦 (@cricket_badger) January 11, 2021
आता या प्रकरणाबाबत अजून तरी आयसीसी, बीसीसीआय किंवा क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून अधिकृत भाष्य करण्यात आलेले नाही. त्यामुळे हे प्रकरण कसे वळण घेणार, हे पाहावे लागेल.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात पुढील सामना १५ जानेवारीपासून ब्रिस्बेन येथे होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
मोठी बातमी! जसप्रीत बुमराह चौथ्या कसोटीला मुकण्याची शक्यता, ‘हे’ आहे कारण
‘त्याने’ टाकलेला चेंडू कोणीही खेळू शकला नसता, चेतेश्वर पुजाराची प्रतिक्रिया