भारत विरुद्ध पाकिस्तान सामना म्हटले की खेळाडूंमध्येच नाही तर प्रेक्षकांमध्येही वेगळीच उर्जा भरल्याचे दिसून येते. हा सामना नेहमीच सर्वांचे लक्ष वेधून घेत असतो. त्यातही तो जर विश्वचषकातील सामना असेल तर त्यातील चूरस ही एका वेगळ्या स्तरावर जाते. असाच बरोबर ३ वर्षांपूर्वी २०१९ च्या विश्वचषकात मँचेस्टर येथे भारत विरुद्ध पाकिस्तान सामना पार पडला होता. या सामन्यात भारताने विजय मिळवला होता.
हा वनडे विश्वचषक इतिहासातील भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील ७ वा सामना होता. त्याआधी झालेल्या ६ सामन्यांत भारतीय संघच विजयी ठरला होता. त्यामुळे यावेळीही हा पराक्रम कायम ठेवण्याच्या उद्देशाने भारतीय संघ मैदानात उतरला होता. तर पाकिस्तान संघ इतिहास बदलण्याच्या इराद्याने मैदानात उतरले होता.
साल २०१९ विश्वचषकाच्या साखळी फेरीतील हा २२ वा सामना होता. या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमदने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाकडून केएल राहुल आणि रोहित शर्मा यांची जोडी सलामीला खेळण्यास आली.
या दोघांनीही मिळून १३६ धावांची शतकी भागीदारी रचली. पण राहुल ५७ धावांवर बाद झाला. पण रोहितने त्याचा शानदार खेळ पुढे चालू ठेवत १४० धावांची शतकी खेळी केली. या खेळीत त्याने १४ चौकार आणि ३ षटकार मारले. त्याला राहुलनंतर कर्णधार विराट कोहलीने चांगली साथ दिली. विराटने ७७ धावांची अर्धशतकी खेळी केली. तसेच हार्दिक पंड्याने १९ चेंडूत २६ धावांची छोटेखानी खेळी केली. त्यामुळे भारताने ५० षटकात ५ बाद ३३६ धावांचा डोंगर उभा करत पाकिस्तानला ३३७ धावांचे आव्हान दिले होते.
पाकिस्तानकडून गोलंदाजी करताना मोहम्मद अमिरने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. तसेच हसन अली आणि वहाब रियाजने प्रत्येकी १ विकेट घेतली.
त्यानंतर ३३७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेला पाकिस्तान संघ ३५ षटकात ६ बाद १६६ धावांवर असताना पावसाचा व्यत्यय आला. त्यामुळे पाऊस थांबल्यानंतर पाकिस्तानचा डाव डकवर्थ लूईस नियमानुसार ४० षटकांचा करण्यात आला. तसेच पाकिस्तानसमोर ३०२ धावांचे आव्हान ठेवण्यात आले.
त्यानुसार पाकिस्तान पावसाच्या व्यत्ययानंतर फलंदाजीला उतरल्यावर त्यांच्यासमोर ५ षटकात १३६ धावांचे अशक्यप्राय आव्हान होते.
पाऊस पडण्याआधी पाकिस्तानकडून इमाम उल हकची(७) पहिली विकेट गेल्यानंतर बाबर आझम आणि फखर जमानने चांगली भागीदारी रचत पाकिस्तानचा डाव सावरला होता. या दोघांनी मिळून दुसऱ्या विकेटसाठी १०४ धावांची भागीदारी रचली होती.
पण त्यांची ही जोडी तोडण्यात कुलदीप यादवला यश आले. कुलदीपने आझमला ४८ धावांवर बाद केले. त्यानंतर कुलदीपने त्याच्या पुढच्याच षटकात फखरलाही ६२ धावांवर बाद केले. ही पाकिस्तानच्या डावातील सर्वोच्च खेळी ठरली.
हे दोघे बाद झाल्यानंतर पाकिस्तानच्या अन्य फलंदाजांनी नियमित कालांतराने विकेट गमावल्या. त्यामुळे पाकिस्तानला ४० षटकात ६ बाद २१२ धावाच करता आल्या. त्यामुळे भारताने डकवर्थ लूईस नियमानुसार ८९ धावांनी दणदणीत विजय मिळवला आणि विश्वचषकात पाकिस्तान विरुद्धच्या विजयी मालिकेत खंड पडू दिला नाही.
भारताकडून गोलंदाजी करताना विजय शंकर, कुलदीप यादव आणि हार्दिक पंड्याने प्रत्येकी २ विकेट घेतल्या.
भारताचा हा वनडे विश्वचषकात पाकिस्तानवर ७ वा विजय होता. वनडे विश्वचषकात सर्वात पहिल्यांदा १९९२ ला भारत आणि पाकिस्तान आमने-सामने आले होते. त्यानंतर १९९६, १९९९, २००३, २०११ आणि २०१५ या विश्वचषकांमध्येही भारत विरुद्ध पाकिस्तान संघात सामना झाला होता.
साल २०१९ च्या विश्वचषकात भारताने पुढे जाऊन उपांत्य सामन्यात प्रवेश केला. मात्र उपांत्य सामन्यात त्यांना न्यूझीलंडकडून पराभव स्विकारावा लागला. तर पाकिस्तानचे आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आले होते.
वनडे विश्वचषक इतिहासात भारत विरुद्ध पाकिस्तान संघात झालेले सामने –
१९९२ विश्वचषक – ४३ धावांनी भारत विजयी
१९९६ विश्वचषक – ३९ धावांनी भारत विजयी
१९९९ विश्वचषक – ४७ धावांनी भारत विजयी
२००३ विश्वचषक – ६ विकेट्सने भारत विजयी
२०११ विश्वचषक – २९ धावांनी भारत विजयी
२०१५ विश्वचषक – ७६ धावांनी भारत विजयी
२०१९ विश्वचषक – ८९ धावांनी भारत विजयी
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
‘ऍटिट्यूड कमी कर!’, पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने कोहलीला झापले
‘या’ बाबतीत इंग्लंडला भरावा लागलाय सर्वात जास्त दंड, भारतही काही मागे नाही
आयपीएल मीडिया राईट्स: प्रत्येक चेंडू अन् प्रत्येक षटकामागे मिळणारी रक्कम पाहुन व्हाल थक्क