भारतात येऊन भारताला नडणारे अनेक क्रिकेटपटू होऊन गेले आणि आहेतसुद्धा. अनेक परदेशी क्रिकेटपटूंनी भारतीय फलंदाज आणि गोलंदाजांना नाकी नऊ आणल्याचे आपण ऐकले किंवा वाचले आहे. असाच एक खेळाडू आहे, ज्याने भारतीय फलंदाजांची भंबेरी उडवली. तो खेळाडू इतर कुणी नसून ऑस्ट्रेलियाकडून पदार्पण करणारा टॉड मर्फी आहे. ऑस्ट्रेलिया संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील पहिला कसोटी सामना नागपूर येथे खेळला जात आहे. या मैदानावर भारतीय संघाच्या डावात मर्फीने अशी काही गोलंदाजी केली की, त्याच्या नावावर थेट विक्रम नोंदवला गेला.
टॉड मर्फीने घेतलेल्या विकेट्स
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी त्यांची सुरुवात खराब झालीच, शिवाय त्यांना मोठी धावसंख्याही उभारता आली नाही. त्यांना सर्व विकेट्स गमावत अवघ्या 177 धावा करता आल्या. यानंतर फलंदाजीला उतरलेल्या भारतीय संघाकडून डावाची सुरुवात रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि केएल राहुल (KL Rahul) याने केली. मात्र, राहुल यावेळी काही खास कामगिरी करू शकला नाही. तो 20 धावा करत 23वे षटक टाकत असलेल्या टॉड मर्फी (Todd Murphy) याच्या पाचव्या चेंडूवर बाद झाला. अशाप्रकारे मर्फीने पदार्पणातील पहिली विकेट खिशात घातली.
त्यानंतर मर्फी नियमित अंतराने विकेट्स घेत राहिला. त्याने 40.1 षटकात दुसरी विकेट आर अश्विनची (23) घेतली. त्यानंतर तिसरी विकेट अवघ्या 4 षटकांनंतर म्हणजेच 44.1 षटकात चेतेश्वर पुजाराची (7) घेतली. पुढे त्याने विराट कोहली याला 52.1 षटकात 12 धावांवर चौथ्या विकेटच्या रूपात बाद केले. त्यानंतर 83.1 षटकात त्याने पदार्पणवीर केएस भरत याला 8 धावांवर तंबूत धाडत पाचवी विकेट घेतली. त्याने सहाव्या विकेटसाठी 118.2 षटकात चांगल्या लयीत असलेल्या रवींद्र जडेजा याला 70 धावांवर बाद केले. पुढे मर्फीला सातवी विकेट मोहम्मद शमीच्या रूपात 132.4 षटकात मिळाली.
https://twitter.com/cricketcomau/status/1624290410431651840
मर्फीचा विक्रम
अशाप्रकारे मर्फीने पदार्पणाच्या कसोटीतील पहिल्याच डावात 7 विकेट्स घेण्याची सर्वोत्तम कामगिरी केली. त्यामुळे तो भारताविरुद्ध कसोटी पदार्पण करताना सर्वोत्तम गोलंदाजी करणाऱ्या परदेशी गोलंदाजांच्या यादीत सामील झाला. त्याने 124 धावा खर्च करत 7 विकेट्स नावावर केल्या.
त्याच्यापूर्वी 1996मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या लान्स क्लुसनर याने भारताविरुद्ध कसोटी पदार्पण करताना 64 धावा खर्च करत 8 विकेट्स घेतल्या होत्या. यादीत दुसऱ्या स्थानी असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या जेसन क्रेझा याने 2008मध्ये भारताविरुद्ध कसोटी पदार्पण करताना 215 धावा खर्च करत 8 विकेट्स घेण्याची कामगिरी केली होती. याव्यतिरिक्त तिसऱ्या स्थानी असलेल्या इंग्लंडच्या जॉन लिव्हर याने 1976मध्ये भारताविरुद्ध कसोटी पदार्पण करताना 46 धावा खर्च करत 7 विकेट्स घेतल्या होत्या.
भारताविरुद्ध पदार्पण करताना सर्वोत्तम गोलंदाजी करणारे परदेशी खेळाडू
8/64- लान्स क्लुसनर (दक्षिण आफ्रिका, 1996)
8/215- जेसन क्रेझा (ऑस्ट्रेलिया, 2008)
7/46- जॉन लिव्हर (इंग्लंड, 1976)
7/124- टॉड मर्फी (ऑस्ट्रेलिया, 2023)*
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नागपूरमध्ये भारताचे पारडे जड! कसोटीच्या पहिल्या डावात घेतली तब्बल ‘इतक्या’ धावांची आघाडी
कपिल देवपेक्षा जडेजा-अश्विनचे प्रदर्शन वरचढ! नागपूर कसोटीत रचला गेला नवा विक्रम






