World Cup 2023: आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेचा किताबी सामना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात रविवारी (दि. 19 नोव्हेंबर) खेळला गेला. 1 लाख 32 हजार प्रेक्षक क्षमतेच्या नरेंद्र मोदी स्टेडिअम येथे पार पडलेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने 6 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. यासह ऑस्ट्रेलियाने 6व्यांदा विश्वचषकाचा किताब आपल्या नावावर केला. या विश्वचषकात अनेक खेळाडूंनी बॅटमधून शानदार प्रदर्शन केले. मात्र, सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप 5 फलंदाजांमध्ये भारत आणि न्यूझीलंडचे प्रत्येकी 2, तर दक्षिण आफ्रिकेच्या एका खेळाडूला स्थान मिळवण्यात यश आले. चला तर, स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंची यादी पाहूयात…
विश्वचषक 2023मध्ये सर्वाधिक धावा करणारे 5 फलंदाज
1. विराट कोहली
भारतीय संघाचा दिग्गज खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) विश्वचषक 2023 स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने आपल्या विस्फोटक फलंदाजीने भल्याभल्या खेळाडूंचे विक्रम मोडीत काढले आहेत. विराटने या स्पर्धेत 11 सामन्यात फलंदाजी करताना तब्बल 95.62च्या सरासरीने सर्वाधिक 765 धावा केल्या. एवढ्या धावा 48 वर्षांच्या विश्वचषक इतिहासात कधीही बनवल्या गेल्या नव्हत्या, पण विराटने हा पराक्रम केला. विराटने या धावा करताना 3 शतके आणि 6 अर्धशतकेही झळकावली. 117 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे.
2. रोहित शर्मा
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने फलंदाज म्हणूनही स्पर्धा गाजवली. रोहित विश्वचषक 2023 स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा विराटनंतर दुसरा फलंदाज आहे. रोहितने 11 सामन्यात 54.27च्या सरासरीने 597 धावा केल्या आहेत. त्याने या धावा करताना 1 शतक आणि 3 अर्धशतकेही केली आहेत. 131 ही रोहितची सर्वोत्तम खेळी आहे.
3. क्विंटन डी कॉक
दुसऱ्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभूत होऊन स्पर्धेबाहेर पडणाऱ्या दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉक (Quinton De Kock) या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. डी कॉकने 10 सामने खेळताना 59.40च्या सरासरीने 594 धावा धावा केल्या आहेत. त्याने या स्पर्धेत सर्वाधिक 4 शतके झळकावली आहेत. 174 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.
4. रचिन रवींद्र
विश्वचषक 2023 स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत चौथे स्थान न्यूझीलंडचा अष्टपैलू रचिन रवींद्र (Rachin Ravindra) याने पटकावले आहे. त्याने 10 सामने खेळताना 64.22च्या सरासरीने 578 धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याच्या बॅटमधून 3 शतके आणि 2 अर्धशतकेही निघाली आहेत. नाबाद 123 ही त्याची स्पर्धेतील सर्वोत्तम खेळी आहे.
5. डॅरिल मिचेल
रचिन रवींद्र याच्यानंतर सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत त्याचाच सहकारी डॅरिल मिचेल (Daryl Mitchell) आहे. त्याने 10 सामन्यातील 9 डावात फलंदाजी करताना 69च्या सरासरीने 552 धावा केल्या आहेत. त्याने यादरम्यान 2 शतके आणि 2 अर्धशतके केली आहेत. 134 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे.
हेही वाचा-
बुमराहामुळे चाहत्यांना आठवली 2003 वर्ल्डकप फायनल, वेगवान गोलंदाजाची आकडेवारी चिंता वाढवणारी
भलेभले आले, पण 48 वर्षांच्या World Cup इतिहासात ‘असा’ पराक्रम रोहितशिवाय कुठल्याच कर्णधाराला नाही जमला, वाचा