भारतीय संघ विश्वचषक 2023 स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा सामना करत आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये रंगलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. दुसऱ्या डावात दवाचा फायदा मिळू शकतो, यामुळे कमिन्सने हा निर्णय घेतला आहे. कर्णधार रोहित शर्मा याने या सामन्यात पुन्हा एकदा संघाला शानदार सुरुवात करून दिली. यासह त्याने खास विक्रमही नावावर केला. तो स्पर्धेच्या 48 वर्षांच्या इतिहासात असा पराक्रम करणारा पहिलाच कर्णधार बनला आहे.
भारतीय संघाने या सामन्यात 76 धावांवर 2 विकेट्स गमावल्या होत्या. यामध्ये रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या विकेटचाही समावेश होता. रोहितने या सामन्यात 31 चेंडूत 47 धावांची तुफानी खेळी केली. त्याच्या खेळीत 3 षटकार आणि 4 चौकारांचा समावेश होता. विशेष म्हणजे, भारतीय संघाने स्पर्धेत आतापर्यंत एकही सामना न गमावता सलग 10 सामने जिंकले आहेत.
रोहितचा विक्रम
रोहित शर्मा विश्वचषक 2023 स्पर्धेत 10 सामने खेळताना 54.27च्या सरासरीने 597 धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याने 1 शतक आणि 3 अर्धशतकेही झळकावली आहेत. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 126चा राहिला आहे. आता रोहित कर्णधार म्हणून एका विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. अशाप्रकारे त्याने हा मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. 48 वर्षांच्या विश्वचषक इतिहासात रोहित 590हून अधिक धावा करणारा एकमेव कर्णधार आहे. यापूर्वी हा विक्रम न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विलियम्सन याच्या नावावर होता. त्याने 2019च्या विश्वचषकात 9 डावात 83च्या सरासरीने 578 धावा केल्या होत्या. यामध्ये 2 शतके आणि 2 अर्धशतकांचाही समावेश होता. मात्र, अंतिम सामन्यात इंग्लंड संघाने बाऊंड्री काऊंटच्या आधारे विजय मिळवला होता.
पाच खेळाडूंनी बनवले 500 हून अधिक धावा
एका वनडे विश्वचषकात सर्वाधिक धावा करणाऱ्या कर्णधारांविषयी बोलायचं झालं, तर 5 खेळाडूंनी 500हून अधिक धावा केल्या आहेत. त्यात रोहित शर्मा आणि केन विलियम्सन यांच्याव्यतिरिक्त श्रीलंकेचा माहेला जयवर्धने, ऑस्ट्रेलियाचा रिकी पाँटिंग आणि ऍरॉन फिंच यांचा समावेश आहे. जयवर्धनेने 2007मध्ये 548, पाँटिंगने 2007मध्ये 539 आणि फिंचने 2019मध्ये 507 धावा केल्या होत्या. रोहितपूर्वी भारतीय कर्णधार म्हणून सौरव गांगुली याने 2003मध्ये 465 धावा केल्या होत्या.
रोहित शर्माचा हा तिसरा विश्वचषक आहे. त्यापूर्वी त्याने 2015 आणि 2019 विश्वचषकातही भारताचे प्रतिनिधित्व केले होते. त्याने आतापर्यंत 28 डावांमध्ये 61च्या सरासरीने 1580 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 7 शतके आणि 6 अर्धशतकांचाही पाऊस पाडला. 140 ही त्याची यादरम्यानची सर्वोत्तम खेळी राहिली आहे. (icc odi world cup 2023 final rohit sharma became captain with most runs in a world cup team)
हेही वाचा-
“मला World Cup Final साठी आमंत्रण नाही”, कपिल देव यांचा BCCI वर गंभीर आरोप
भारतीयांचा हार्ट ब्रेक! World Cup Final मध्ये अर्धशतकानंतर कोहली तंबूत, आता अपेक्षा राहुलकडून