भारतीय क्रिकेटसाठी 2022 हे वर्ष चांगले- वाईट ठरले. कारण, यादरम्यान भारताचे अनेक खेळाडू दुखापतींमुळे महत्त्वाच्या सामन्यांना मुकले, तर काही जणांनी शतक- द्विशतक झळकावत भारताच्या गोटात आनंदाचे वातावरण आणले. भारताचे असे 5 खेळाडू आज आपण पाहणार आहोत, ज्यांनी 2022मध्ये परदेशात फलंदाजी करताना वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा चोपल्या. या 5 खेळाडूंमध्ये दिग्गज खेळाडूंचाही समावेश आहे. चला तर यादी पाहूयात.
परदेशात यावर्षी वनडेत सर्वाधिक धावा करणारे 5 भारतीय खेळाडू
5. ईशान किशन
सन 2022मध्ये परदेशात वनडे क्रिकेट गाजवणाऱ्या भारतीय फलंदाजांमध्ये ईशान किशन (Ishan Kishan) हा पाचव्या स्थानी आहे. ईशानने यादरम्यान मिळालेल्या संधीचं सोनं करून दाखवलं. युवा फलंदाज ईशानने परदेशात 4 सामन्यातील 3 डावात फलंदाजी करताना 88.66च्या शानदार सरासरीने एकूण 266 धावा केल्या. यामध्ये त्याने त्याचे पहिले वनडे शतकाचे रुपांतर द्विशतकात केले. त्याने बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या वनडेत फलंदाजी करताना तब्बल 210 धावांची खेळी केली होती. ही त्याची वनडे कारकीर्दीतील सर्वोत्तम धावसंख्या ठरली. ईशानने 266 धावा करताना 1 शतक आणि 1 अर्धशतकही साकारले.
4. विराट कोहली
भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) या यादीत चौथ्या स्थानी आहे. विराटसाठी हे वर्ष चांगले ठरले. त्याने यावर्षी परदेशात वनडे क्रिकेटमध्ये (ODI Cricket) खेळताना 8 सामन्यात 34.50च्या सरासरीने एकूण 276 धावा केल्या. 113 ही त्याची यादरम्यानची सर्वोत्तम धावसंख्या होती. विराटने यादरम्यान 1 शतक आणि 2 अर्धशतके झळकावली होती. यावर्षी 10 डिसेंबरमध्ये विराटने बांगलादेशविरुद्ध शतक झळकावले होते. हे त्याचे 72वे आंतरराष्ट्रीय शतक होते.
3. श्रेयस अय्यर
भारतीय संघाचा मधल्या फळीतील विश्वासू फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) यानेही शानदार खेळी साकारल्या. त्याने परदेशात वनडेत खेळताना 13 सामन्यात 11 डावात फलंदाजी केली. यादरम्यान त्याने 41.18च्या सरासरीने 453 धावा चोपल्या. त्यामुळे तो या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. श्रेयसने एकूण 4 अर्धशतके नावावर केली. यादरम्यान 82 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या होती.
2. शुबमन गिल
परदेशात वनडे क्रिकेटमध्ये खेळताना सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये युवा खेळाडू शुबमन गिल (Shubman Gill) दुसऱ्या स्थानी आहे. शुबमन या पाचही फलंदाजांमध्ये सर्वोत्तम सरासरीने सर्वाधिक धावा करणारा दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज आहे. त्याने परदेशात खेळलेल्या 9 वनडे सामन्यात 93च्या सरासरीने तब्बल 558 धावा चोपल्या. या धावा करताना त्याने 1 शतक आणि 4 अर्धशतके झळकावली. विशेष म्हणजे, 130 ही त्याची यादरम्यानची सर्वोत्तम धावसंख्या राहिली. यादरम्यान तो 3 वेळा नाबाद राहिला होता.
1. शिखर धवन
भारतीय संघाचा विस्फोटक फलंदाज शिखर धवन (Shikhar Dhawan) हा या यादीत अव्वलस्थानी आहे. धवनने परदेशात वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने परदेशात खेळलेल्या 18 सामन्यांमध्ये 40च्या सरासरीने सर्वाधिक 653 धावा चोपल्या आहे. या धावा करताना त्याने 6 अर्धशतकेही झळकावली आहेत. धवनच्या नावावर शतकही झाले असते, पण तो 97 धावांवर बाद झाला. हीच त्याची यादरम्यानची सर्वोत्तम धावसंख्या होती. यावर्षी धवन वनडेत खेळलेल्या 18 सामन्यांमध्ये 2 वेळा नाबाद राहिला होता. (Top 5 Indian players who score highest overseas ODI runs in 2022)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वर्षभरात ‘या’ 5 भारतीय धुरंधरांनी गाजवली परदेश वारी; अव्वलस्थानी अनपेक्षित खेळाडू
राम राम 2022: यावर्षी टीम इंडियाला मिळाले 5 हिरे; पाहा कशी होती कामगिरी