आता 2022 हे वर्षे सर्वांचा निरोप घेत आहे. यावर्षात भारतीय क्रिकेट संघासाठी महत्त्वाचे ठरले. टी20 विश्वचषक लक्षात घेऊन यावर्षी भारताच्या ताफ्यात अनेक प्रयोग झाल्याचे पाहायला मिळाले. याचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो की, विराट कोहली याने नेतृत्वाचा राजीनामा दिल्यानंतर भारतीय संघाचे कर्णधार रोहितव्यतिरिक्त इतर 5 खेळाडूंवर सोपवण्यात आले. याव्यतिरिक्त काही नवीन खेळाडूंनीही आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. चला तर यावर्षी भारतीय संघाकडून पदार्पण करणाऱ्या 5 खेळाडूंबद्दल जाणून घेऊया…
सन 2022मध्ये भारतीय संघाकडून पदार्पण करणारे 5 खेळाडू
1. वेंकटेश अय्यर
भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू वेंकटेश अय्यर (Venkatesh Iyer) याने आयपीएल 2021च्या दुसऱ्या टप्प्यात चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे त्याला भारताच्या मर्यादित षटकाच्या संघात दुखापतग्रस्त हार्दिक पंड्या याच्या जागी सामील करण्यात आले होते. मध्यप्रदेशच्या या खेळाडूने मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये आंतरराष्ट्रीय टी20 पदार्पण केले, तर यावर्षी जानेवारी महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आपले वनडे पदार्पण केले.
अय्यरने आतापर्यंत भारताकडून 2 वनडे सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 12च्या सरासरीने आणि 60च्या स्ट्राईक रेटने 24 धावा केल्या आहेत. यादरम्यान गोलंदाजी करताना त्याने 5 षटके टाकली, पण त्याला एकही विकेट घेण्यात यश आले नाही. आयपीएल 2022मध्ये खराब कामगिरी केल्यानंतर अय्यर राष्ट्रीय निवडकर्त्यांच्या रडारवरून बाहेर झाला. दुसरीकडे, हार्दिक पंड्या यानेही धमाकेदार पुनरागमन केले. अशात जर अय्यरला पुनरागमन करायचे असेल, तर आयपीएल किंवा देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल.
2. अर्शदीप सिंग
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) याने यावर्षी टी20 आणि वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने द रोज बाऊल येथे झालेल्या टी20 सामन्यात इंग्लंडविरुद्ध टी20 पदार्पण केले होते. पदार्पणाच्या टी20 सामन्यात त्याने 3.3 षटके गोलंदाजी करताना 18 धावा देत 2 विकेट्स नावावर केल्या होत्या. यानंतर त्याने नोव्हेंबर 2022मध्ये ऑकलंड येथे न्यूझीलंडविरुद्ध वनडे पदार्पण केले होते. पदार्पणाच्या सामन्यात त्याने 8.1 षटके गोलंदाजी करताना 68 धावा दिल्या होत्या. यावेळी त्याला एकही विकेट मिळाली नव्हती.
अर्शदीपने आतापर्यंत 3 वनडेत एकही विकेट घेतली नाहीये. मात्र, त्याने टी20 क्रिकेटमध्ये 21 सामने खेळताना 8.17च्या इकॉनॉमी रेटने 33 विकेट्स घेतल्या आहेत.
3. उमरान मलिक
जम्मू काश्मीरचा वेगवान गोलंदाज उमरान मलिक (Umran Malik) यानेही यावर्षीय भारतीय संघात पदार्पण केले होते. त्याने जून 2022मध्ये आयर्लंड दौऱ्यावर आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्या सामन्यात त्याने 1 षटक टाकत 14 धावा खर्च केल्या होत्या. मात्र, त्याला एकही विकेट घेता आली नव्हती.
त्यानंतर त्याने न्यूझीलंडविरुद्ध ऑकलंड येथे वनडे सामन्यात पदार्पण केले होते. या सामन्यात त्याने 10 षटके गोलंदाजी करताना 66 धावा देत 2 विकेट्स नावावर केल्या होत्या. त्याने आतापर्यंत 5 वनडे सामन्यात 7 आणि 3 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात 2 विकेट्स घेतल्या आहेत.
4. ऋतुराज गायकवाड
भारताच्या युवा प्रतिभावान खेळाडूंमध्ये ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) याच्या नावाचाही समावेश होतो. ऋतुराजने श्रीलंका दौऱ्यावर जुलैमध्ये भारताच्या टी20 संघात पदार्पण केले होते. मात्र, त्याला पहिल्या सामन्यात फक्त 21 धावाच करता आल्या होत्या. त्यानंतर त्याने ऑक्टोबरमध्ये लखनऊ येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे पदार्पण केले होते. मात्र, त्या सामन्यात ऋतुराजला खास कामगिरी करता आली नव्हती. त्याने 42 चेंडूत फक्त 19 धावा केल्या होत्या. या सामन्यात भारतीय संघाला 9 धावांनी पराभवाचा धक्का बसला होता. दुसरीकडे, ऋतुराजच्या खराब फलंदाजीमुळे त्याच्यावर जोरदार टीकाही झाली होती.
ऋतुराजने भारताकडून 1 वनडे आणि 9 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. वनडेत त्याने 19, तर टी20त 135 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याला फक्त 1 अर्धशतक करण्यात यश आले आहे.
5. रवी बिश्नोई
युवा फिरकीपटू रवी बिश्नोई (Ravi Bishnoi) याला टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेत भारतीय संघाच्या राखीव खेळाडूंमध्ये सामील केले गेले होते. मात्र, त्याला खेळण्याची संधी मिळाली नव्हती. त्याने यावर्षी फेब्रुवारीमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध आंतरराष्ट्रीय टी20 पदार्पण केले होते. पदार्पणाच्या टी20 सामन्यात त्याने 4 षटके गोलंदाजी करताना 17 धावा देत 2 विकेट्स घेतल्या होत्या. यानंतर त्याने ऑक्टोबर महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेपूर्वी वनडे पदार्पण केले होते.
रवी बिश्नोई याने भारतीय संघाकडून 1 वनडे सामना आणि 10 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने वनडेत 1 विकेट आणि टी20त 16 विकेट्स घेतल्या आहेत. (these 5 indian cricketers who made their odi debut in 2022 see list)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कमबॅक्स इन 2022! विराटचे शतक, इंग्लंडचे बझबॉल आणि बरचं काही…
मुंबई इंडियन्सच्या सपोर्ट स्टाफमध्ये आणखी एका दिग्गजाची एन्ट्री! निभावणार ‘ही’ जबाबदारी