---Advertisement---

सेफ हँड्स! भारत विरुद्ध इंग्लंडच्या मालिकेत सर्वाधिक झेल घेणारे ‘हे’ आहेत टॉप पाच खेळाडू

On: बुधवार, जानेवारी 27, 2021 12:41 AM
---Advertisement---

भारत विरुद्ध इंग्लंडच्या बहुचर्चित कसोटी मालिकेला येत्या ५ फेब्रुवारीपासून चेन्नईच्या मैदानावरील सामन्यापासून सुरुवात होणार आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत जाण्याची चुरस वाढली असल्याने या मालिकेला आता वेगळे महत्व प्राप्त झाले आहे. या मालिकेत उत्तम कामगिरी करण्यासाठी आता दोन्ही संघ कसून तयारी करत आहेत.

या तयारीत गोलंदाजी आणि फलंदाजी विभागात जशी मेहनत घेतली जाते आहे, तशीच मेहनत क्षेत्ररक्षणात देखील घेतली जाते आहे. ‘कॅचेस विन मॅचेस’ या उक्तीनुसार अचूक झेल टिपले जाणे, सामन्याच्या निकालाच्या दृष्टीने निर्णायक ठरत असते. त्यामुळेच दोन्ही संघाचे क्षेत्ररक्षक या कौशल्यावर आगामी मालिकेच्या दृष्टीने विशेष मेहनत घेतील.

याच निमित्ताने आजच्या लेखात आपण भारत विरुध्द इंग्लंडच्या दरम्यान आजवर खेळवण्यात आलेल्या कसोटी मालिकेत सर्वाधिक झेल घेणाऱ्या खेळाडूंचा आढावा घेणार आहोत. अनेक दिग्गज खेळाडूंचा या यादीत समावेश असून आपण त्यातील टॉप पाच खेळाडू बघणार आहोत.

१) अॅलिस्टर कूक –

इंग्लंडचा माजी कर्णधार अॅलिस्टर कूक एक लाजवाब क्षेत्ररक्षक होता. त्यानेच भारत विरुद्ध इंग्लंडच्या कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक झेल घेण्याच्या यादीत अव्वल स्थान पटकाविले आहे. कूकने ३० सामन्यातील ५७ डावात ३७ झेल घेतले आहे. कूकची स्लीपमधील भरवशाचा क्षेत्ररक्षक म्हणून ओळख होती.

२) सुनील गावसकर –

भारताचे माजी महान फलंदाज सुनील गावसकर हे यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. गावसकर हे महान फलंदाज म्हणून ओळखले जात असले तरी ते अतिशय सुरक्षित क्षेत्ररक्षक देखील होते. त्यांनी इंग्लंडविरुद्धच्या ३८ सामन्यातील ६५ डावात ३५ झेल घेतले आहेत.

३) राहुल द्रविड –

‘द वॉल’ म्हणून ओळखला जाणारा राहुल द्रविड स्लिपमधील सार्वकालीन महान क्षेत्ररक्षक देखील आहे. विशेषत: अनिल कुंबळेच्या गोलंदाजीवर राहुल द्रविडने झेल पकडणे, हे नेहमीचे दृश्य असायचे. द्रविडने इंग्लंडविरुद्धच्या २१ सामन्यातील ३८ डावात ३० झेल घेण्याची किमया केली आहे.

४) एकनाथ सोलकर –

या यादीत चौथ्या क्रमांकावर माजी खेळाडू एकनाथ सोलकर यांचे नाव आहे. एकनाथ सोलकर हे भारतातीलच नव्हे तर जगातील सार्वकालीन महान क्षेत्ररक्षक मानले जातात. फॉरवर्ड शॉर्ट लेगच्या जागेवर हमखास झेल पकडण्याची त्यांची हुकमत वादातीत होती. त्यांनी इंग्लंडविरुद्धच्या १२ सामन्यातील २१ डावात २२ झेल पकडले आहेत.

५) सचिन तेंडुलकर –

सुनील गावसकर यांच्या प्रमाणेच सचिन तेंडुलकरच्या फलंदाजीतील प्रतिभेपुढे त्याची क्षेत्ररक्षणातील कामगिरी दुर्लक्षिली गेली. परंतु सचिन हा अतिशय चपळ क्षेत्ररक्षक होता. त्याने इंग्लंडविरुद्धच्या ३२ सामन्यातील ६० डावात २२ झेल घेतले आहेत.

महत्वाच्या बातम्या:

भारताविरुद्धच्या दौऱ्यातून संघाबाहेर काढल्याने बेअरिस्टोची घेतली डीकेवेलाने फिरकी, म्हणाला

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी : गतविजेत्या कर्नाटकाचा पराभव, पंजाबचा उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश

IND Vs ENG: विराट कोहलीसाठी डोकेदुखी; अश्विन, सुंदर आणि कुलदीपमध्ये कुणाची करावी निवड? 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---