टी20 विश्वचषक 2024 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात बांग्लादेशचा पराभव झाला. या पराभवानंतर सामन्यातील अंपायरिंगवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. महमदुल्लाहला एलबीडब्ल्यू आऊट दिल्यामुळे बांग्लादेशला लेग बायच्या चार धावा मिळाल्या नाहीत. यानंतर आता संघाचा आघाडीचा फलंदाज तौहीद हृदय यानं मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्यानं या सामन्यातील अंपायरिंगवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
बांग्लादेशच्या डावाच्या 17 व्या षटकात अंपायरनं महमदुल्लाहच्या विरोधात चुकीचा निर्णय दिला होता, ज्यामुळे बांग्लादेशला 4 धावांचा फटका बसला. अखेरीस त्यांचा केवळ 4 धावांनी पराभव झाला. या षटकातील दुसरा चेंडू महमदुल्लाहच्या पॅडला लागला आणि दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज ओटनीलनं अपील केलं. यानंतर पंचांनी महमदुल्लाला बाद घोषित केलं.
यावर महमदुल्लाहनं रिव्ह्यू घेतला, ज्यामध्ये तो नाबाद असल्याचं दिसून आले. महमदुल्लाहला एलबीडब्ल्यू घोषित करण्यात आलेला चेंडू त्याच्या पॅडला स्पर्श करत सीमारेषेपर्यंत गेला होता. मात्र, पंचांनी बाद घोषित केल्यामुळे बांग्लादेशला त्या 4 धावा मिळाल्या नाहीत. महमदुल्लाला नंतर नाबाद घोषित करण्यात आलं असलं तरीही संघाला लेग बायच्या चार धावा मिळाल्या नाहीत.
सामन्या संपल्यानंतर बोलताना तौहीद हृदयनं पंचांच्या या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले. तो म्हणाला, “पंचांनी आमच्या विरोधात अतिशय कठोर निर्णय घेतला. त्या चार धावा झाल्या असत्या तर सामन्याचा निकाल वेगळा लागला असता. आयसीसीचे नियम आमच्या हातात नाहीत, पण त्या चार धावा आमच्यासाठी खूप महत्त्वाच्या होत्या. याशिवाय किमान दोन-तीन वाइड बॉल्स होते, जे अंपायरनं दिले नाही. अशा कमी धावसंख्येच्या सामन्यात या एक-दोन धावा खूप महत्त्वाच्या असतात. ज्या चेंडूवर मी आऊट झालो तोही अंपायरचा कॉल होता. या सगळ्यात सुधारणेची गरज आहे.”
महत्त्वाच्या बातम्या –
आयसीसीच्या नियमामुळे झाला बांग्लादेशचा पराभव? पंचांच्या निर्णयानंतर गोंधळ
पाकिस्तान क्रिकेटमध्ये खळबळ! शाहिद आफ्रिदीचा मोठा दावा; म्हणाला, विश्वचषकानंतर संघातील रहस्य उघड करेन
3 खेळाडू ज्यांना शिवम दुबेच्या जागी टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळू शकते