पुणे, १२ जुलै २०२३ : हाय व्होल्टेज टेबल टेनिस सामन्यांसाठी व्यासपीठ सज्ज झालं आहे. अल्टिमेट टेबल टेनिस सीझन ४ ला गुरूवारपासून पुण्यातील महाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे सुरुवात होत आहे.
टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडिया (TTFI) च्या संयुक्त विद्यमाने निरज बजाज आणि विटा दाणी यांनी २०१७मध्ये ही फ्रँचायझी लीग प्रमोट केली. ही लीग भारतीय टेबल टेनिससाठी गेम चेंजर ठरली आहे आणि चौथ्या हंगामातही लीग यश मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे. अल्टिमेट टेबल टेनिस सीझन ४ मध्ये १२ आंतरराष्ट्रीय खेळाडूंसह एकूण ३६ खेळाडू १८ दिवसांच्या कालावधीत रोमांचकारी खेळ खेळतील. एकूण ३६ खेळाडूंपैकी १४ ऑलिम्पिकमध्ये खेळले आहेत, तर नऊ खेळाडूंनी राष्ट्रकुल स्पर्धेत आपले सामर्थ्य दाखवले आहे.
गतविजेता चेन्नई लायन्स ३० जुलैपर्यंत चालणाऱ्या सीझन ४च्या पहिल्या सामन्यात पुणेरी पलटण टेबल टेनिस संघाविरुद्ध जेतेपदाच्या बचावाची सुरुवात करतील. भारताचा स्टार खेळाडू अचंता शरथ कमल याच्या नेतृत्वाखाली चेन्नई लायन्स खेळणार आहे. या दोन संघांसह सीझन ४ च्या जेतेपदासाठी बंगळुरू स्मॅशर्स, दबंग दिल्ली टीटीसी, गोवा चॅलेंजर्स आणि यू मुंबा टीटी हे संघ जेतेपदासाठी शर्थीचे प्रयत्न करताना दिसतील.
“अल्टिमेट टेबल टेनिस सीझन ४ परत आल्याचा आम्हाला आनंद आहे. यूटीटी हा खेळ खरोखरच रोमांचक बनवते म्हणून आम्ही सर्वजण काही टॉप टेबल टेनिस ऍक्शन पाहण्यासाठी तयार आहोत. अनेक तरुण खेळाडू देखील याचा भाग बनले आहेत आणि भारतीय टेबल टेनिससाठी ही खरोखरच मोठी गोष्ट आहे,” असे शरथ कमलने प्री-सीझन पत्रकार परिषदेत सांगितले.
दुसरीकडे, पुणेरी पलटण टेबल टेनिसची खेळाडू हाना मातेलोव्हा देखील भारतात खेळण्यासाठी उत्साहित आहे आणि या हंगामात फ्रँचायझीला नवीन उंचीवर नेण्यासाठी तिला सर्वोत्तम द्यायचे आहे. मातेलोव्हा म्हणाली, “पुन्हा UTT कुटुंबाचा एक भाग बनणे ही एक सन्मानाची गोष्ट आहे आणि UTT सीझन २ मध्ये जशी कामगिरी केली तशीच मला करायची आहे. मी माझ्या सहकाऱ्यांसोबत खेळण्यासाठी उत्सुक आहे आणि आम्ही जास्तीत जास्त पुढे जाण्याचा प्रयत्न करू.”
भारताची स्टार मनिका बात्रा ही देखील सीझन ४ चे मुख्य आकर्षण आहे आणि ती बंगळुरू स्मॅशर्सचे प्रतिनिधित्व करेल. “मी या मोसमात यूटीटीमध्ये खेळण्यासाठी खूप उत्सुक आहे. सीझन ४ मध्ये बरेच नवीन चेहरे आहेत आणि त्यांच्यासोबत खेळणे हा एक रोमांचक अनुभव असेल, कारण ते सर्व खरोखर प्रतिभावान आहेत. बंगळुरू स्मॅशर्स त्यांच्या प्रत्येक सामन्यात सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करतील,” असे बात्राने म्हटले.
दबंग दिल्ली टीटीसीचा साथियान ज्ञानसेकरन म्हणाला, “मी यूटीटीच्या सर्व सीझनसाठी दबंग दिल्ली टीटीसीचा एक भाग आहे आणि संघासोबत येथे परत येणे म्हणजे घरवापसीसारखे वाटते. भारतीय प्रतिभेला जोपासण्यात लीगने मोठी भूमिका बजावली आहे. मी लहान वयात हा खेळ खेळायला सुरुवात केली आणि आता मी आंतरराष्ट्रीय सर्किटमध्ये भारताचा नियमित खेळाडू आहे. त्यामुळे, प्रत्येकासाठी ही एक उत्तम संधी आहे आणि आम्ही सीझन ४ ची वाट पाहत आहोत.”
“खेळाडूंना त्यांची प्रतिभा दाखवण्यासाठी एक योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी एवढी मोठी स्पर्धा आयोजित करण्याचा UTT आणि भारतीय टेबल टेनिसचा एक मोठा प्रयत्न आहे. हे आपल्या सर्वांसाठी खूप उपयुक्त आहे आणि मी UTT सीझन ४ मध्ये माझ्या सहकाऱ्यांसोबत खेळण्यास उत्सुक आहे,” असे गोवा चॅलेंजर्सच्या अल्वारो रॉबल्सने सांगितले.
U Mumba TT’ लिली झँग देखील भारतात खेळण्यासाठी खूप उत्साहित आहे आणि तिला विश्वास आहे की, अल्टिमेट टेबल टेनिस सीझन ४ भारतीय टेबल टेनिसला जगाच्या नकाशावर आणेल.
“भारतात येऊन चांगलं टेनिस खेळण्यासाठी मी खूप उत्साहित आहे. मी येथे सीझन २ मध्ये खेळलो आहे आणि खूप छान वाटत आहे, की यूटीटी यावेळी पुन्हा नव्या चेहऱ्यांसह परतले आहे. या स्पर्धेतील सांघिक भावना आणि वातावरण खरोखर चांगले आहे. मी आकर्षक टेबल टेनिस ऍक्शनची वाट पाहत आहे,”असे लिली झँगने सांगून समारोप केला. सीझन ४ चे सर्व सामने स्पोर्ट्स १८ आणि JioCinema वर संध्याकाळी ७.३० वाजल्यापासून पाहता येतील.तिकिटे BookMyShow वर उपलब्ध आहेत.
अल्टिमेट टेबल टेनिस बद्दल –
अल्टिमेट टेबल टेनिस ही भारतातील प्रमुख टेबल टेनिस लीग आहे आणि २०१७ मध्ये स्थापन झाल्यापासून ती भारतातील खेळासाठी गेम चेंजर आहे. फ्रँचायझी-आधारित लीगचा प्रचार निरज बजाज आणि विटा दाणी यांनी टेबल टेनिस फेडरेशनच्या संयुक्त विद्यमाने केला आहे. भारतातील आणि उर्वरित जगातील अव्वल खेळाडू आणि प्रशिक्षकांना लीगचा मुख्य भाग बनवल्यामुळे यूटीटी खऱ्या अर्थाने जागभरात यशस्वी झाली आहे. मनिका बत्रा, साथियान ज्ञानसेकरन, मानव ठक्कर, सुतीर्थ मुखर्जी या भारतातील स्टार खेळाडूंना योग्य व्यासपीठ मिळालं. सीझन ४ मध्ये बंगळुरू स्मॅशर्स, चेन्नई लायन्स, दबंग दिल्ली टीटीसी, गोवा चॅलेंजर्स, पुणेरी पलटण टेबल टेनिस आणि यू मुंबा टीटी या संघांमध्ये १३ ते ३० जुलै दरम्यान जेतेपदासाठी १८ हाय-व्होल्टेज सामने पुण्यातील महाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात खेळले जाणार आहेत. स्पोर्ट्स १८ आणि JioCinema वर सामन्यांचे थेट प्रक्षेपण होणार आहे. चाहते तिकिटे BookMyShow वर देखील बुक करू शकतात.