मुंबई । विदर्भ एक्सप्रेस म्हणून प्रसिद्ध असलेला भारताचा कसोटी संघातील नियमित सदस्य उमेश यादव हा वेग आणि अचूक यॉर्करसाठी प्रसिद्ध आहे. उमेशने नुकतेच एका संकेतस्थळाशी बोलताना आपल्या जीवनातील संघर्ष आणि वैयक्तिक आयुष्यातील काही किस्से क्रिकेट फॅन्सबरोबर शेअर केले.
उमेश यादव म्हणाला की, “लहानपणी मी फार खोडकर होतो. मित्रांसोबत आंब्याच्या बागेत जायचो आणि तिथले आंबे चोरुन आणायचो. मी नेहमीच अभ्यासापासून दूर राहिलो. मोठा झाल्यावर मला घरातून पैसे मिळत नव्हते. स्वतःला बॅट आणि स्पाइकचे बूट खरेदी करायचे होते. तेव्हा कडक उन्हामध्ये एकाच दिवशी तीन- तीन सामने खेळायचो. खूप संघर्ष केला आहे.”
उमेश यादव आपल्या सुरुवातीच्या काळात स्थानिक सामन्यांमध्ये क्रिकेट खेळताना ‘यॉर्कर’मुळे चर्चेत आला होता. तेव्हा नागपूर जिल्हा क्रिकेट संघटनेच्या सचिवांनी त्यास एका सामन्यात खेळण्याची संधी दिली. पहिल्या सामन्यार त्याने भेदक गोलंदाजी करत तब्बल आठ गडी बाद केले. त्याची ही गोलंदाजी पाहून उन्हाळी शिबिरामध्ये बोलवण्यात आले.
या उन्हाळी शिबिरात घडलेला किस्सा तो कधीच विसरू शकत नाही. या घडलेल्या घटनेनंतर तो क्रिकेट खेळणे सोडून देणार होता. उमेश यादव उन्हाळी शिबिरात गेला तेव्हा तेथील प्रशिक्षकांनी त्याला त्याच्याकडे बुट आहेत का? याची विचारणा केली. तेव्हा त्याने त्याच्याकडे बूट नसल्याचे सांगितले. कुठून येतात माहित नाही. कोणा कोणाला बोलावतात हे लोक, तेव्हा त्या प्रशिक्षकांनी अशी प्रतिक्रिया दिली होती.
या घटनेनंतर उमेश यादव क्रिकेट खेळणे सोडून देण्याच्या विचारात होता. मात्र, मित्रांच्या विनवणी नंतर क्रिकेट खेळणे सुरू ठेवला. रणजी संघात स्थान देण्यासाठी कर्णधारांनी खूपच प्रयत्न केला. नेहमीच मला स्पोर्ट करायचे. त्यानंतर माझ्या क्रिकेटला सुरुवात झाल, असेही त्याने नमूद केले.