ऑस्ट्रेलियात झालेल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमधील दुसऱ्या कसोटी सामन्यात गोलंदाजी करत असताना, भारतीय संघाचा मुख्य जलद गोलंदाज उमेश यादव याला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला उर्वरित कसोटी मालिकेतून माघार घ्यावी लागली होती. याच कारणामुळे त्याला भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या २ कसोटी सामन्यासाठी संघात स्थान दिले गेले नव्हते.
अशातच २४ फेब्रुवारीपासून भारत आणि इंग्लंड यांच्यात अहमदाबादमध्ये तिसरा कसोटी सामना होणार आहे. या सामन्यासाठी यादवची निवड करण्यात आली आहे. तत्पुर्वी भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी येत्या दोन दिवसात यादवची फिटनेस चाचणी घेतली जाणार आहे. ही चाचणी त्याने यशस्वीरीत्या पार केल्यानंतर त्याला अंतिम एकादशमध्ये स्थान मिळणार की नाही? यावर निर्णय घेतला जाणार आहे.
मोहम्मद सिराज आणि उमेश यादवला मिळू शकते संधी
तिसरा कसोटी सामना हा डे-नाईट कसोटी सामना असल्यामुळे भारतीय संघ ३ जलद गोलंदाजांसोबत मैदानात उतरू शकतात. अशातच फिरकीपटू कुलदीप यादवला बाकावर बसवून उमेश यादव किंवा मोहम्मद सिराज या दोघांपैकी एकाला संधी मिळू शकते. त्यातही यादवचा कसोटी क्रिकेटमधील अनुभव पाहता त्याला प्राधान्य दिले जाण्याची शक्यता आहे.
उमेश यादवची कामगिरी
उमेश यादवने भारतीय संघासाठी आतापर्यंत एकूण ४८ कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याला १४८ गडी बाद करण्यात यश आले आहे. तसेच त्याला ३ वेळा, ५ किंवा त्यापेक्षा अधिक गडी बाद करण्यात यश आले आहे. तसेच त्याने एकूण ७५ एकदिवसीय सामने खेळले आहेत. यात त्याने १०६ गडी बाद केले आहेत. याचबरोबर ७ टी -२० आंतरराष्ट्रीय सामन्यात ९ गडी बाद करण्यात त्याला यश आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
किती ते दुर्दैव! एका षटकात दिले ५ षटकार अन् हिरोचा झाला झिरो, आयपीएल लिलावातही मिळाला नारळ
दिल्ली कॅपिटल्सला मोठा झटका! आयपीएल सोडून देशासाठी क्रिकेट खेळणार कागिसो रबाडा?