आयसीसीने गेल्यावर्षी जाहीर केलेल्या दशकातील सर्वोत्तम एकदिवसीय महिला क्रिकेटपटूच्या पुरस्कारासाठी भारताची वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी हिला नामांकन मिळाले होते. २००२ साली भारतीय संघाकडून पदार्पण केलेल्या झुलनने अल्पावधीतच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपला ठसा उमटवला.
आंतरराष्ट्रीय महिला एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक बळींचा विक्रम नावावर असलेल्या झुलनने गेल्या दशकभर भारतीय महिला संघाच्या वेगवान माऱ्याची धुरा समर्थपणे सांभाळली. काही काळ तिने भारतीय संघाचं नेतृत्वही केलं. २५ नोव्हेंबर, १९८२ ला जन्म झालेली झुलन आज ३९व्या वर्षात पदार्पण करत आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया तिच्याबद्दलच्या काही खास गोष्टी –
१. विश्वचषकाचा अंतिम सामना पाहून झाली प्रेरित :
१९९७ सालचा महिला विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना कोलकताच्या इडन गार्डन्स मैदानावर खेळवण्यात आला होता. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड संघात झालेल्या ह्या सामन्यात झुलनने बॉल गर्ल म्हणून काम केले होते. बेलिंडा क्लार्क, डेबी हॉकली, कॅथरीन फित्झपॅट्रिक ह्या दिग्गज महिला क्रिकेटपटूंचा खेळ जवळून पाहिल्यानंतर झुलन अतिशय प्रभावित झाली होती. त्याच दिवशी तिने क्रिकेटमध्ये करियर घडविण्याचा निश्चय केला.
२. एमएस धोनीच्या हस्ते मिळाला पुरस्कार :
कसोटी तसेच एकदिवसीय क्रिकेटमध्ये २२ पेक्षाही कमी सरासरीसह सातत्याने किफायतशीर गोलंदाजी करणारी झुलन पदार्पणापासूनच भारतीय संघाचा प्रमुख आधारस्तंभ होती. ह्याच कामगिरीसाठी तिला २००७ साली आयसीसीच्या सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. हा पुरस्कार जेव्हा तिने एमएस धोनीच्या हस्ते स्वीकारला, तो क्षण कारकीर्दीतील एक अविस्मरणीय क्षण असल्याचं झुलन सांगते.
३. इंग्लंडमधील पहिल्या कसोटी मालिका विजयाची शिल्पकार :
२००६ सालचा इंग्लंड दौरा भारतीय महिला क्रिकेट संघासाठी अतिशय खास ठरला. ह्या दौऱ्यात भारतीय संघाने इंग्लिश भूमीवर पहिल्यांदाच कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम गाजवला. ह्या विजयात झुलन गोस्वामीचा सिंहाचा वाटा होता. भारताच्या गोलंदाजी फळीचं नेतृत्व करणाऱ्या झुलनने दोन्ही डावात ५ बळी घेत एकाच सामन्यात १० बळी घेण्याचा विक्रमही आपल्या नावे केला.
४. सर्वात वेगवान गोलंदाज :
चकदाह एक्सप्रेस म्हणून ओळखली जाणारी झुलन गोस्वामी आपल्या वेगासाठी प्रसिद्ध आहे. ५ फुट ११ इंच उंचीची झुलन प्रतितास १२० किमी वेगाने गोलंदाजी करू शकते. कॅथरीन फित्झपॅट्रिकच्या निवृत्तीनंतर झुलन ही महिला क्रिकेटमधील सर्वात वेगवान गोलंदाज असल्याचे मानले जाते.
५. आवडता प्रतिस्पर्धी इंग्लंड :
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वच संघांविरुद्ध झुलनने दमदार कामगिरी केली असली तरी इंग्लंड संघाविरुद्ध खेळताना तिची कामगिरी विशेष उंचावल्याचे दिसून येते. तिच्या २४० एकदिवसीय बळींपैकी सर्वाधिक बळी तिने इंग्लंडविरुद्ध घेतले आहेत. १८.८६ च्या सरासरीसह इंग्लंडविरुद्ध तिने एकूण ७४ बळी घेतले आहेत. मर्यादित षटकांच्या सामन्यातील तिची १६ धावात ५ बळी ही सर्वोत्तम कामगिरी देखील इंग्लंडविरुद्धच आहे.
६. संघर्षाचा काळ :
झुलनने वयाच्या पंधराव्या वर्षी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. कोलकात्यापासून ८० किमीवरील चकदाह गावात राहत असलेल्या झुलनला सुरुवातीच्या काळात सरावासाठी रोज पहाटे ४.३० च्या लोकल ट्रेनने प्रवास करावा लागत असे. इतर पालकांप्रमाणेच झुलनच्या पालकांचीही तिने अभ्यासावर अधिक लक्ष द्यावं, अशी इच्छा होती. मात्र प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर तिने ह्या संघर्षाच्या काळावरही मात केली.
७. विश्वचषक विजयाचं स्वप्न :
भारतीय संघाला आपल्या कारकिर्दीत विश्वचषक जिंकवून देण्याच झुलनचं स्वप्न आहे. २००९ आणि २०१७ सालच्या विश्वचषकात अंतिम सामन्यात पराभव पत्करावा लागल्याची खंत झुलनला आहे. त्यामुळे आगामी विश्वचषकात विजेतेपदाचं स्वप्न साकार करण्यासाठी तिच्यासह संपूर्ण भारतीय संघ कठोर मेहनत घेईल.
८. टोपणनाव :
झुलनच्या रुंद हास्यामुळे संघ सहकाऱ्यानी तिला ‘गॉझी’ हे टोपणनाव दिलं आहे. ह्यासह क्रिकेटविश्वात तिच्या वेगामुळे ती ‘चकदाह एक्सप्रेस’ म्हणून देखील ओळखली जाते.
९. आवड-निवड :
क्रीकफिट ह्या संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत झुलनने आपल्या अनेक आवडी निवडी सांगितल्या होत्या. चायनीज खाद्यपदार्थांची चाहती असलेल्या झुलनचं आवडत ठिकाण लंडन आहे. बॉलीवुड चित्रपट नेहमी पाहत असलेल्या झुलनचा आवडता अभिनेता आमीर खान आणि आवडती अभिनेत्री काजोल आहे. सगळ्यात आवडता खेळाडू म्हणून ती अर्जेंटिनाचे महान फुटबॉलपटू दियोगो मॅराडोना ह्यांच नाव घेते.
१०. आवडती कॉम्प्लिमेंट :
झुलनच्या एका जवळच्या नातेवाईकाने एकदा तिला म्हंटले होते की तू एक उत्तम क्रिकेटर आहेसच, पण तू त्याहून एक चांगली व्यक्ति आहेस. झुलन तिला मिळालेल्या सगळ्या कॉम्प्लिमेंटस् मधील ही सर्वोत्तम कॉम्प्लिमेंट मानते.
महत्त्वाच्या बातम्या –
“आमच्यावेळी गोमांस आणि पोर्क कधीही आहारात नव्हते”; माजी भारतीय क्रिकेटपटूचा खुलासा
दिल्ली कॅपिटल्सने केले श्रेयसला करारमुक्त; रिषभसह हे चौघे संघात कायम
ज्यूनियर हॉकी विश्वचषक: पहिल्याच सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा धक्का