क्रिकेटच्या मैदानावर आज टीम इंडिया जगातली सर्वात टॉप टीम दिसतेय. फॉर्मेट कोणताही असो, देशात खेळू नाहीतर परदेशात खेळू, टीम इंडियाला विजयापासून कोणी लांब ठेवू शकले नाही. प्लेयर्स वैयक्तिकरित्या विक्रमांची रास घालतायेत. दुसरीकडे टीमच्या नावावरही ही बरेच रेकॉर्ड जमा झालेत. सध्या टीम इंडिया नाव गाजवत असली तरी, याच टीम इंडियाच्या नावावर क्रिकेटमधील असेही काही विक्रम आहेत, जे खरे तर आपल्याला नकोसे वाटतील. आज त्याच नकोशा वाटणाऱ्या लाजिरवाण्या विक्रमांवर आपण नजर टाकणार आहोत.
भारताची सध्याची टेस्ट टीम भल्याभल्यांना पाणी पाजतेय. भारत सलग तीन वर्ष टेस्ट रँकिंगमध्ये टॉपला राहिला. पहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळला. मॉडर्न क्रिकेटमध्ये टीम इंडियाने २०१८ ला अफगाणिस्तानविरुद्ध टेस्ट खेळताना अफगाणिस्तानला एकाच दिवशी दोनदा ऑल-आऊट करण्याची किमया केली होती, पण कदाचित अगदी कमी लोकांना माहीत असेल की, वर्ल्ड क्रिकेटमध्ये सर्वात पहिल्यांदा अशी नामुष्की आपल्यावरच आलेली. १९५२ ला इंग्लंडने मँचेस्टर टेस्टमध्ये, विजय हजारे कॅप्टन असलेल्या इंडियन टीमला मॅचच्या तिसऱ्या दिवशी ५८ ओव्हरमध्ये १४० रनांत दोनदा ऑल-आऊट केलेले.
हेही पाहा- हे असे विक्रम जे टीम इंडियाला नेहमीच लाजवतात
मागील जवळपास एका तपाचा विचार केला तर, टीम इंडिया वनडेतील सर्वात सक्सेसफुल टीम दिसते. एक वर्ल्डकप, एक चॅम्पियन्स ट्रॉफी आणि दोन वर्ल्ड कप सेमी फायनल असा टीम इंडियाचा वनडेतील प्रवास राहिला. टीम इंडियाने वनडे क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत २९ वेळा ३५० पेक्षा जास्त रन्स बनवलेत. हा एक वर्ल्ड रेकॉर्ड आहे. तुम्ही हा रेकॉर्ड ऐकून आनंदी झाला असेल पण, याची दुसरी बाजू म्हणजे आपल्याच बॉलर्सनीही १४ वेळा ३५० रनांचा प्रसाद वाटला आहे. नजीकच्या काळात श्रीलंकन बॉलर्सनी बऱ्याच वेळा, ३५० रनांची खैरात वाटल्याने हा नकोसा वर्ल्ड रेकॉर्ड आता त्यांच्या नावे गेलाय.
भारत आणि पाकिस्तान हे पारंपारिक प्रतिस्पर्धी जेव्हा केव्हा मैदानावर उतरतात, तेव्हा विक्रम होणे निश्चित असते. सध्या तरी हे दोन्ही संघ फक्त आयसीसीच्या टूर्नामेंटमध्ये भेटतात. उभय संघांमधील शेवटची टेस्ट मॅच २००७ ला बेंगलोरमध्ये झालेली. नाट्यमयरीत्या ती टेस्ट ड्रॉ झाली, पण पहिली टेस्ट जिंकलेल्या टीम इंडियाने २७ वर्षानंतर पाकिस्तानविरुद्ध आपल्या देशात सिरीज आपल्या नावावर केली. अनेक अर्थांनी आठवणीत असलेली ती टेस्ट, टीम इंडियाच्या नावावर एक नकोसा विक्रम मात्र नोंदवून गेली. त्या मॅचमध्ये टीम इंडियाने दोन्ही डावात मिळून तब्बल ७६ एक्स्ट्रा रन्स दिल्या. शिस्तीसाठी ओळखल्या जाणाऱ्या टेस्ट क्रिकेटमध्ये हा आकडा खूप मोठा आहे. टीम इंडियाच्या बॉलर्सनी ३५ बाईज, २६ लेग बाईज आणि १५ नो बॉल टाकलेले. विशेष म्हणजे भारताकडून एकही वाईड बॉल टाकला गेला नव्हता.
पहिलावहिला टी२० वर्ल्डकप जिंकल्यावर भारत क्रिकेटच्या या सर्वात लहान फॉर्मेटचा आश्रयदाता बनला. अवघ्या सहा महिन्यात जगातील सर्वात मोठी टी२० लीग, आयपीएलच्या रूपाने भारताने उभी केली. टी२० त अनेक दिग्गज तयार झाले. भारताने या फॉर्मेटला आपलस केल असला तरी, याच टी२० तील एक लाजीरवाणा रेकॉर्ड टीम इंडियाच्याच नावावर आहे. २००९ मध्ये नागपूरच्या स्टेडियमवर भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी२० मॅचमध्ये श्रीलंकन बॅटर्सनी तब्बल २९ चौकारांचा प्रसाद भारतीय बॉलर्सला दिलेला. हा अजूनही टी२० च्या एका इनिंगमध्ये सर्वाधिक फोर्सचा वर्ल्ड रेकॉर्ड आहे.
लाजिरवाण्या विक्रमांच्या यादीतील खऱ्या अर्थाने सर्वात लाजिरवाणा विक्रम टीम इंडियाच्या नावावर जमा झाला १७ डिसेंबर २०२० ला. ऑस्ट्रेलियाने ऍडलेड टेस्टमध्ये टीम इंडियाचा डाव अवघ्या ३६ धावांवर संपवत मॉडर्न डे टेस्ट क्रिकेटमधील सर्वात खराब विक्रम भारताच्या नावावर जमा केला. भारत सर्वात कमी टेस्ट धावसंख्येच्या या यादीत सातव्या क्रमांकावर असला, तरी वरील सहा धावसंख्या या १९५५ च्या आधी झालेल्या आहेत. त्यामुळे मागील ६७ वर्षांचाच विचार केला तर, हा खराब विक्रम टीम इंडियाला आपल्या खात्यात जमा करून घ्यावा लागला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कितीही ट्रोल केला गेला असला, तरी पॉंटिंगला भावलेला डिंडा भारतासाठी खेळलाच
‘त्या’ एका निर्णयाने जडेजासह मुंबई इंडियन्स आलेली गोत्यात
काव्या मारन ते प्रीती झिंटा, ‘या’ आहेत ग्लॅमरचा तडका लावणाऱ्या आयपीएल संघांच्या मालकीणबाई