कोरोना विषाणूमुळे गेल्या वर्षभरात अनेक क्रीडा स्पर्धांना फटका बसला. ऑलिम्पिक आणि विश्वचषका सारख्या मोठ्या स्पर्धा देखील कोरोनाचा फटका बसल्याने रद्द कराव्या लागल्या किंवा पुढे ढकलाव्या लागल्या. आयपीएलचा यंदाचा हंगाम देखील कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याने मध्यातच रद्द करावा लागला होता.
आता अजून एक मोठी टी२० लीग याच कारणामुळे स्थगित करण्यात आली आहे. अमेरिकेतील मेजर लीग क्रिकेट टी२० स्पर्धा ही कोरोनाच्या धोक्यामुळे स्थगित करण्यात आली आहे. साल २०२३ सालापर्यंत ही स्पर्धा स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा अमेरिकन क्रिकेट बोर्डाच्या सदस्यांनी केली आहे.
अमेरिकेतील मेजर लीग क्रिकेट टी२० स्पर्धा याच वर्षी पहिल्यांदा आयोजित करण्यात येणार होती. काही महिन्यांपूर्वीच अमेरिका क्रिकेट आणि एमएलसीने संयुक्तपणे या लीगसाठी फ्रँचायझी साठी अर्ज भरण्याचे आवाहन केले होते. याबाबत प्रेस रिलीज पण जाहीर करण्यात आले होते. यानुसार कोलकाता नाईट रायडर्स ग्रुपने संघ खरेदी करण्यात रस दाखवला होता. कोलकाता ग्रुपकडे आयपीएल आणि कॅरेबियन प्रीमियर लीग या लीगमधील संघांची देखील मालकी आहे.
ही लीग दुसऱ्यांदा पुढे ढकलावी लागली आहे. मात्र अमेरिकन क्रिकेट बोर्डातील अधिकाऱ्यांच्या दाव्यानुसार २०२३ सालापूर्वी देखील ही लीग सुरु होऊ शकते. २०२२ साली प्रदर्शनीय सामन्याचे आयोजन करून ते ह्याला सुरुवात करू शकतात. त्यांनतर २०२३ साली सहा संघाच्या सहभागाने ही लीग सुरु होऊ शकते.
मागील वर्षी डिसेंबर महिन्यात आलेल्या वृत्तानुसार शाहरूख खानच्या कोलकता नाईट रायडर्स ग्रुपने लॉस एंजिलिस संघाच्या मालकीबाबत उत्सुकता दाखवली होती. या लीग मध्ये लॉस एंजिलिस व्यतिरिक्त न्यूयॉर्क, सॅन फ्रॅन्सिस्को, वॉशिंगटन डीसी, शिकागो आणि डलास या संघांचा देखील समावेश असेल. ये लीगमध्ये सामील होण्यासाठी उत्सुक असलेल्या खेळाडूंमध्ये भारताकडून १९ वर्षांखालील संघाकडून खेळलेले उन्मुक्त चंद, समित पटेल आणि हरमीत सिंग यांचाही समावेश आहे. याशिवाय इतरही जवळपास ३०-४० परदेशी खेळाडू या लीगमध्ये सामील होऊ शकतात.
महत्त्वाच्या बातम्या –
मोठी बातमी! दोन वेळचा ऑलिंपिक पदक विजेता सुशील कुमारला सागर धनखड हत्येप्रकरणी अखेर अटक
केवळ ५० रुपयांनी झाली ‘हिटमॅन’च्या क्रिकेट प्रशिक्षणाला सुरुवात; अशी आहे रोहितची संघर्षगाथा