जमैका देशाचा आणि क्रिकेट यांचा घनिष्ठ संबंध आहे. या देशाने जगाला अनेक दिग्गज धावपटूंसोबतच अनेक दर्जेदार क्रिकेटपटू देखील दिले आहेत. त्यापैकीच एक म्हणजे जगातील सर्वात वेगवान धावपटू उसेन बोल्ट. बोल्टचे क्रिकेटप्रेमदेखील जगजाहीर आहे. त्याच क्रिकेटप्रेमाचा पुरावा देतानाचा एक व्हिडिओ बोल्टने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.
बोल्टने शेअर केला व्हिडिओ
जगातील सर्वात वेगवान धावपटू असा बिरूद मिरवणारा बोल्ट इतर जमैकन नागरिकांप्रमाणे क्रिकेट खेळामध्ये देखील चांगलाच पारंगत आहे. तो सातत्याने क्रिकेट खेळताना दिसत असतो. बोल्टने नुकताच आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो आपल्या मित्रांसोबत घराबाहेर क्रिकेट खेळताना दिसतोय.
या व्हिडिओमध्ये बोल्ट फलंदाजी करताना दिसत आहे. एका चेंडूवर त्याने बचावाचे तंत्र दाखवले तर दुसऱ्याच चेंडूवर त्याने कव्हर ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न केला. तिसऱ्या चेंडूवर मात्र त्याने कल्पकतेचा वापर करत अपर कट मारण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे.
क्रिकेटप्रेमी आहे बोल्ट
कमी पल्ल्याच्या शर्यतीतील जवळपास सर्व विश्वविक्रम आपल्या नावे केलेला बोल्ट मोठा क्रिकेटप्रेमी आहे. त्याला अनेकदा क्रिकेट खेळताना पाहिले जाते. भारताचा माजी दिग्गज अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग याच्यासोबत देखील त्याने क्रिकेटचा आनंद लुटला आहे. एका प्रदर्शनीय सामन्यात त्याने अंतिम चेंडूवर षटकार मारत आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता.
अनेक विश्वविक्रम आहेत बोल्टच्या नावे
उसेन बोल्ट याने आपल्या कारकिर्दीत तब्बल १९ ऑलिम्पिक पदके जिंकली आहेत त्यापैकी ८ सुवर्णपदके आहेत. सोबतच त्याने विश्व चॅम्पियनशिपमधील २१ पदके ही त्याने मिळवली आहेत. १०० मीटर शर्यतीत ९.५८ सेकंद अशी वेळ नोंदवत त्याने विश्वविक्रम केला आहे. बोल्टने २०१७ साली व्यावसायिक धावपटू म्हणून निवृत्ती जाहीर केली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
रोनाल्डोचेच आहे चाहत्यांच्या मनावर राज्य! असं ‘ही’ आकडेवारीच सांगतेय
महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी पुणे शहर संघाची निवड चाचणी ‘या’ दिवशी होणार