भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने रविवारी (२२ मे) दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. आयपीएल २०२२मध्ये जबरदस्त प्रदर्शन केलेल्या उमरान मलिक आणि अर्शदीप सिंग यांना पहिल्यांदाच भारतीय संघात निवडले गेले. बीसीसीआयने जाहीर केलेल्या संघात एक नाव असे होते, जे पाहून अनेकांनी प्रश्न उपस्थित केले. हे नाव म्हणजे अष्टपैलू वेंकटेश अय्यर.
वेंकटेश अय्यर (Venkatesh Iyer) आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा खेळाडू आहे. केकेआरने आयपीएल २०२२च्या मेगा लिलावापूर्वी त्याला ८ कोटी रुपयांमध्ये रिटेन केले होते. मागच्या आयपीएल हंगामात वेंकटेशने केकेआरसाठी जबरदस्त प्रदर्शन केले होते आणि संघाला अंतिम सामन्यात स्थान मिळवून दिले होते. याच प्रदर्शनाच्या जोरावर त्याच्यासाठी भारतीय संघाचे दरवाजे उघडले गेले होते. असे असले, तरी चालू हंगामात मात्र त्याने चाहत्यांची चांगलीच निराशा केली.
चालू आयपीएल हंगामात वेंकटेशने खेळलेल्या १२ सामन्यांमध्ये १६.५५च्या सरासरीने १८२ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या एका अर्धशतकाचा समावेश आहे. वेंकटेशच्या सततच्या खराब प्रदर्शामुळे केकेआरच्या संघ व्यवस्थापनाने त्याला सालामीला न पाठवता खालच्या फळीत फलंदाजीसाठी पाठवले होते, तर काही सामन्यांमध्ये प्लेइंग इलेव्हनमध्ये संधीही दिली नव्हती. परंतु या खराब प्रदर्शनानंतर देखील त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मायदेशातील मालिकेत संधी मिळाली आहे. चाहते आणि जाणकार भारतीय संघाच्या निवडकर्त्यांच्या निर्णयाबाबत आश्चर्य व्यक्त करत आहेत.
दरम्यान, दक्षिण आफ्रिकेविरुद्धची ही टी२० मालिका पाच सामन्यांची असेल. बीसीसीआयने रविवारी यासाठी १८ सदस्यांचा संघ घोषित केला. खराब फॉर्ममधील वेंकटेशला जरी संघात संधी मिळाली असली, तरी संघातील इतर खेळाडू सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह या तीन दिग्गजांना विश्रांती दिली जाणार असून ते या टी२० मालिकेत सहभाग घेणार नाहीत. या तिघांना आयपीएलमध्ये देखील अपेक्षित प्रदर्शन करता आले नव्हते.
वेगवान गोलंदाज उमरान मलिक आणि अर्शदीप सिंग यांनी आयपीएलमध्ये केलेल्या प्रदर्शनामुळे त्याना पहिल्यांदाच भारतीय संघात संधी मिळाली आहे. या मालिकेतून हे दोघे आंतरराष्ट्रीय पदार्पण देखील करू शकतात. दिग्गज अष्टपैलू हार्दिक पंड्या आणि अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक यांनी देखील मोठ्या काळानंतर संघात पुनरागमन केले आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारीच ना! एबी डिविलियर्स पुन्हा दिसणार आरसीबी संघात, स्वत:च केलाय ‘मोठा’ खुलासा
पाकिस्तानच्या बाबर आझमवर आयपीएलमध्ये ‘या’ टीमने लावले असते कोट्यवधी, अख्तरचा दावा