-महेश वाघमारे
लॉर्ड्स….
कोणत्याही सच्चा क्रिकेटप्रेमींची सुप्त इच्छा असते की, या मैदानावर एक दिवस आपल्याला सामना पहायचा आहे. क्रिकेटचा मक्का म्हणून प्रसिद्ध असलेले हे ठिकाण क्रिकेटसंबंधी सर्वच लोकांना पवित्रच आहे.
ज्याप्रमाणे, क्रिकेटप्रेमींना या मैदानाचे आकर्षण असते त्याचप्रमाणे क्रिकेट खेळाडूंना या मैदानाच्या ऐतिहासिक “अॉनर्स बोर्ड” वर आपले नाव पाहण्याची अनामिक ओढ असते. कितीतरी दिग्गज “अॉनर्स बोर्डवर आपले नाव लावू शकले नाहीत आणि कितीतरी सरासरी खेळाडूंनी दोन दोन वेळा आपले नाव त्या अॉनर्स बोर्डवर लावले आहे. भारतातर्फे सौरव गांगुली, दिलीप वेंगसरकर, रवी शास्त्री, कपिल देव, अजित आगरकर या खेळाडूंनी आपली नावे त्या ऐतिहासिक फलकावर कोरली आहेत.
१९९६ चा भारताचा इंग्लंड दौरा. विश्वचषकातील उपांत्य सामन्यातील पराभवानंतर भारत इंग्लंडला गेला. अनुभवी खेळाडूंबरोबरच बरेचशे नवीन आणि ताज्या दमाचे युवा खेळाडू सुद्धा त्या दौऱ्यावर गेले होते. भारतीय क्रिकेटची पुढील चार वर्षे कशी असतील ते हा दौरा ठरवणार होता.
पहिल्या बर्मिंघम कसोटीत एकाच वेळी सुनील जोशी, पारस म्हांब्रे, विक्रम राठोड आणि व्यंकटेश प्रसाद या चौघांना पदार्पणाची संधी मिळाली. इंग्लंडच्या धरतीवर गेल्यावर सहजासहजी विजय मिळत नाही, यावेळीही तसंच झाल. पहिल्याच सामन्यात भारताने सपाटून मार खाल्ला. सचिनचे शतक आणि पदार्पण करणाऱ्या प्रसादचे दोन्ही डावात मिळून सहा बळी एवढ्याच काय त्या सुखावह गोष्टी.
दुसरा सामना ऐतिहासिक लॉर्ड्सच्या मैदानावर होता. आधीच्या चार युवा खेळाडूंसोबतच अजून दोन खेळाडू सुद्धा त्या संघात होते. तसंतर ते, भारतासाठी १-२ वनडे खेळलेले पण कसोटीत अजून पदार्पण केलेले नव्हते. घरेलू क्रिकेटची दोन मोठी नावे. सौरव गांगुली आणि राहुल द्रविड.
पहिल्या सामन्यात पराभव झाल्याने, त्या सामन्यातील संजय मांजरेकर आणि सुनील जोशी यांना डच्चू देऊन या दोघांना संघात निवडले. त्यावेळी आदल्या दिवशीच संघनिवड सांगितली जात असल्याने, त्यांना ही बातमी सामन्याच्या पूर्वसंध्येला दिली गेली. दोघांनाही आनंद झाला आणि जरासे टेन्शन सुद्धा आले. कारण, पहिलाच सामना आणि तो देखील लॉर्ड्सवर. स्वप्न सत्यात उतरणे काय असते तर हे.
आदल्या रात्री, राहुल द्रविड आणि व्यंकटेश प्रसाद गप्पा मारत असताना अचानक लॉर्ड्सवरील अॉनर्स बोर्डचा विषय निघाला. बोलता-बोलता दोघांच्यात पैज लागली, त्या अॉनर्स बोर्डवर आपले नाव झळकावून दाखवण्याची.
लॉर्ड्स मैदानावरील, अॉनर्स बोर्डवर शतक करणाऱ्या फलंदाजाचे आणि एका डावात पाच बळी घेणाऱ्या गोलंदाजाचे नाव लिहिले जाते. अनेक वर्षाची ही परंपरा आहे. क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्सवरील अॉनर्स बोर्डवर नाव येणे म्हणजे सगळे काही कमावले इतपत क्रिकेटपटूंसाठी असते.
द्रविड आणि प्रसाद यांची पैज नक्की झाली. इंग्लंडची पहिली फलंदाजी होती. पहिला चान्स प्रसादकडे आला. त्याने लावलेल्या पैजेला जागत ५ बळी मिळवले. आपल्या दुसऱ्याच कसोटीत प्रसादचे नाव ऑनर्स बोर्डवर लिहिले गेले.
भारताचा डाव सुरु झाला. नयन मोंगिया व विक्रम राठोडने खराब सुरुवात केली. पहिली मॅच खेळणारा गांगुली तिसऱ्या क्रमांकावर आला. भारतीय संघाचे आधारस्तंभ सचिन, जडेजा आणि अझरुद्दीन स्वस्तात बाद झाले. गांगुली एका बाजूला ठामपणे उभा होता. चार वर्षानंतर मिळालेल्या संधीचं त्याला सोनं करायचं होतं.
सातव्या क्रमांकावर आपली पहिली इनिंग खेळण्यासाठी राहुल द्रविड दाखल झाला. भारताची युवा जोडी इंग्लंडच्या गोलंदाजांना दमवू लागली. घरेलू क्रिकेटमध्ये खोऱ्याने धावा काढणारे गांगुली व द्रविड लॉर्डसवर पाय रोवून उभे राहिले आणि भारतीय संघाला सावरून पुढे जाऊ लागले.
गांगुलीने पदार्पणातच लॉर्ड्सवर शतक केले होते. द्रविडसुद्धा अर्धशतक पार गेला. शतकानंतर गांगुली झटपट खेळायच्या नादात बाद झाला. राहिलेले बळी लवकर मिळवून फलंदाजी करण्याचा इंग्लिश खेळाडूंचा मानस द्रविडने मोडून काढला. तळाच्या फलंदाजांना हाताशी घेऊन त्याने डाव पुढे नेला. गांगुली पाठोपाठ द्रविडसुद्धा शतक करणार असे वाटत असतानाच द्रविड बाद झाला. द्रविडच्या नावापुढे ९५ धावा लागलेल्या. शतक हुकले होते आणि प्रसादसोबत लागलेली पैसेसुद्धा तो हरला होता. तो खूप नाराज झाला.पण, त्याने एक ना एक दिवस माझे नाव या बोर्डवर लागेल असा दृढनिश्चय सुद्धा केला.
१९९६ नंतर भारतीय संघ अनेकदा इंग्लंड दौऱ्यावर गेला. पण, द्रविडला अॉनर्स बोर्डवर नाव नोंदवता आले नाही. द्रविडचा काय सचिन, लक्ष्मण सुद्धा अॉनर्स बोर्डवर नाव नोंदवू शकले नाही. सर्वांच्या कारकिर्दीची अखेर होत आली होती.
२०११ चा इंग्लंड दौरा, या दिग्गजांचा अखेरचा इंग्लंड दौरा ठरणार होता. जागतिक क्रिकेटमधील २००० वी आणि भारत-इंग्लंड दरम्यानची १०० वी कसोटी लॉर्ड्सवर होणार होती. हीच दौऱ्याची सुरुवात. भारत नुकताच वनडेमध्ये विश्वविजेता बनवून आल्याने पूर्ण क्रिकेटविश्व या दौऱ्यासाठी उत्साहित होते.
केविन पीटरसनच्या २०२ धावांच्या जोरावर इंग्लंडने पहिल्या डावात ४७४ धावा बनविल्या. भारतीय गोलंदाजांची पिसे काढली होती. दौऱ्याची अशी सुरुवात कोणालाही अपेक्षित नव्हती.
भारत प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज होता. अभिनव मुकुंद आणि गौतम गंभीर यांनी डावाची सुरवात केली. गंभीरने १५ धावा काढत तंबूचा रस्ता पकडला. आता मैदानावर ” द वॉल ” राहुल द्रविडचे आगमन झाले. मुकुंद आणि द्रविडने एकेरी दुहेरी करत धावफलक चालू ठेवला. वैयक्तिक ४९ धावांवर मुकुंद बाद झाला. द्रविडच्या साथीला त्याचा जुना आणि विश्वासू साथीदार सचिन आला. परंतु, तिशी ओलांडताच त्यानेदेखील साथ सोडली. त्यानंतर प्रत्येक जण फक्त हजेरी लावायचे काम करू लागला.
गेली १५ वर्ष न थकता, न दमता, अविरतपणे भारतीय क्रिकेटचा गाडा हाकणारा, संघ देईल ती जबाबदारी हसत हसत स्वीकारून त्यातही १०० टक्के योगदान देणारा जॅमी, द वॉल राहुल द्रविड आजही एकटाच उभा होता. संघासाठी उभा होता पण संघ सहकारी साथीला नव्हते. शेवटचा गडी म्हणून जहीर खान सोबतीला होता.
संघाच्या २८१ धावा झाल्या असता. द्रविडने ख्रिस ट्रेमलेटचा चेंडू लॉंग ऑनला ढकलत दोन धावा पूर्ण केल्या. राहुल द्रविडचे शतक पूर्ण झाले होते. पूर्ण संघ लॉर्ड्सच्या बाल्कनीत उभा राहून टाळ्या वाजवत होता. १५ वर्षापूर्वी लावलेली पैज देखील पूर्ण झाली होती.
त्या सायंकाळी द्रविडने प्रसादला फोन केला आणि आपल्या पैजेची आठवण करून दिली. संयम म्हणजे काय हे द्रविडने पुन्हा सिद्ध केले होते.
ड्रेसिंग रूम सिक्रेट्स लेखमालेतील अन्य लेख-
-ड्रेसिंग रूम सिक्रेट्स भाग १०: “जित्या, कपिल पाजींची तब्येत अचानक बिघडली आहे, चल लवकर.”
ड्रेसिंग रूम सिक्रेट्स भाग ९: खेळाडू शांत व्हायचे नाव घेत नव्हते, अखेर सुत्र सचिनने हाती घेतली
–ड्रेसिंग रूम सिक्रेट्स भाग ७: …आणि १८ वर्षांचा विराट पडला सचिनच्या पाया
–ड्रेसिंग रूम सिक्रेट्स भाग ४: …अगदी ठरवुन त्यांनी गांगुलीला रडवले
–ड्रेसिंग रूम सिक्रेट्स भाग ५- त्यादिवशी भारताच्या ड्रेसिंग रूममध्ये निवडणूक झाली
–ड्रेसिंग रूम सिक्रेट्स भाग ३: दादा गुडनाईट बोलून निघून गेला परंतू युवराज मात्र पूरता घाबरला
–ड्रेसिंग रूम सिक्रेट्स भाग २: लक्ष्मणच्या अंघोळीने थांबला होता चालू कसोटी सामना
–ड्रेसिंग रूम सिक्रेट्स भाग १: सेहवाग रडत होता तर जॉन राईट शेजारच्या खोलीत सिगरेट ओढत होते